rmd यांचे रंगीबेरंगी पान
चांदणस्पर्श
तावदान
आता तरी
आता मात्र मी तुला पूर्णपणे विसरले आहे
तुझ्या आठवणींना ओरबाडून दूर फेकले आहे
तुझ्या भेटी, तुझी पत्रं, सारं काही जाळलं
माझ्या विचारातलं तुझं असणं जाणीवपूर्वक टाळलं
तू समोर येऊ नयेस म्हणून मी गावच सोडला
आपल्यातला प्रत्येक बंध काळजीपूर्वक तोडला
नव्या मातीत रूजले, नव्या माणसांत रमले
लग्न केलं नाही अजून, बाकी सर्व जमले
पुन्हा पुन्हा पाहीलंय मी अगदी नीट तपासून
मनावरचा तुझा ठसा टाकलाय ना मी पूसुन?
उत्तर "हो" च मिळतं मला, कसे कुणास ठावे
स्वतःशी खरं बोलणं आता तरी शिकायलाच हवे
आसरा
ज्या वळणावर तू भेटलायस
तिथून पुढे मला नाही पहायचंय
तुझ्याबरोबर आता मला
कायमचं तिथेच रहायचंय
तुझ्या शोधात किती भटकले
अन् कितीदा रस्ता चुकले
तुझ्या शोधात धावत राहीले
माझ्या अस्तित्वालाही मुकले
आता थांबवायचंय सारं मला
आता... थांबायचंय जरा
माझ्या फिरस्त्या मनाला
देशील ना तुझा आसरा?
वर्तुळ
पुन्हा नव्या वाटा, नवी नावं
नवे चेहरे आणि नवी गावं
अव्याहतपणे चाललेलं हे चक्र...
एका वर्तुळातून दुसरं वर्तुळ
नवे व्यास पण केंद्रबिंदू तोच
परीघ मापणारी जुनीच पावलं
फिरून पहिल्याच बिंदूपाशी पोचणारी
नवी शिखरं, नवं आकाश
जुन्याचं काय करायचं सुचत नाही
अजून माझ्या मनाएवढी दुसरी जागा शोधायची आहे...
पुन्हा नवे अर्थ, नवे शोध
नवे शब्द, नवेच बोध
जुन्या वर्तुळात अडकून राहीलेला पाय
कुठवर जात राहणार हे असं?
असे वाटते...!
हातून सुटले सारे काही असे वाटते
आयुष्याला अर्थच नाही असे वाटते
सगळे विसरून पुढेच जावे असे ठरवले
शल्य तरीही उरात राही, असे वाटते
अशक्य स्वप्नांचे मनातील ओंगळ बोजे
फेकून द्यावे दिशांस दाही, असे वाटते
नकोत गुंते आठवणींचे, नको अडकणे
जगणे व्हावे पुन्हा प्रवाही, असे वाटते...!
कसं जमतं तुला?
मला चौकटीत बसवणारा तू
आणि माझी चौकट उसवणाराही तूच
लक्ष्मणरेषेची भलामण करणारा
पण आतून कीचकासारखा असणारा तू...
नावं वेगळी पण जात तीच...
बाईच्या जातीने कसं असावं हे टाहो फोडून सांगणारी
आणि त्याच वेळी तिला ओरबाडायला टपलेली
कौतुक आहे ते याच गोष्टीचं
स्वतःला देवत्वाच्या पायरीवर बसवून
राजरोसपणे असं अर्वाच्च्य जिणं
कसं जमतं तुला?
तू
मी या भरलेल्या आभाळाचा कुणीच नाही
तेव्हाच मोर होतो मी जेव्हा बरसतेस तू
सारेच सारखे ऋतू मला ना कौतुक त्यांचे
मी वसंत आला म्हणतो जेव्हा बहरतेस तू
मी दगड मानतो देवळांमधल्या मूर्तींना
पण आस्तिक होतो त्यांना जेव्हा विनवतेस तू
ना नाती मानत पण नकळत मी तुझाच होतो
वाळूत आपली नावे जेव्हा गिरवतेस तू
Dangling Pointer
माझं मन एक dangling pointer
ह्र्दयातल्या रिकाम्या जागेकडे डोळे लावून बसलेलं
ती जागा रिकामी आहे हे मान्य न करणारं...
एक dangling pointer!
location free झालंय...
पण memory free नाही झाली अजून
मी आपली उगाचच मनाची समजूत घालते
आणि memory reallocation ची वाट पाहते
मलाही माहीत्ये
जेव्हा त्या location ला असलेल्या memory वर
दुसर्या कोणाचा data लिहायला जाईन मी
तेव्हा येईल एक जोरदार error!
आणि मग न सापडणारे bugs आयुष्यभर!
memory बरोबर सगळ्या भावनाही होतील corrupt
आणि मग प्रत्येक टप्प्यावर येतील segmentation faults...
किंवा system instabilities!
Pages
