ये, सखये ये ....

Submitted by अवल on 31 July, 2013 - 02:46

तसे केव्हाच तुला बुडवले
तळ्यात , खोल खोल आत
तुझे गुदमरणे, तुझे हुंदके
अगदी गिळून टाकले कधीचे

तुझ्या जिवंतपणाचे लक्षणी बुडबुडे
वर येऊन फुटू नयेत म्हणून
तळ्यावरच सा-या,
बांधली मोठी कबर;

सणसणीत व्यवहाराची, दिखाऊ, सुबक
त्यावरल माळले कित्येक साज, फुले
तेही शोभेचे,
फुलण्याचा शाप नको म्हणून

हुश्श्य...
मोठा श्वास घेतला,
चला आता काळजी मिटली
एक मोठा उसासा टाकला,

अन झाले,
तू तशीच
पुन्हा वर,
जिवंत

तशीच जळजळीत सत्य घेऊन,
भळभळणा-या वेदना घेऊन,
टोचणा-या संवेदना घेऊन
अन सोबत माझ्या जिवंतपणाचा दाखलाही घेऊन

ये, सखये ये ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users