राधेचा कन्हैया -

Submitted by विदेश on 28 August, 2013 - 05:15

इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी
झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी ..

फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी
इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी ..

पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी
हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी ..

लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी
पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी ..

मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी
जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी ..

पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी
उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी ..

लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी
गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users