वारी
पावसाची सुरू पुन्हा वारी
त्यास विठ्ठल जणू धरा सारी
आरशाचे सदैव का ऐकू?
एवढीही नकोच लाचारी
ह्या सुखाच्या महाग वस्त्रांचा
पोत नसतो कधीच जरतारी
आंधळी न्यायदेवता इथली
आणि सारेच देव गांधारी
मांजरासारखे अती लुब्रे
दु:ख येते पुन्हा पुन्हा दारी
दूर गेलीस खेद ना त्याचा
गंध का धाडलास माघारी?
स्वप्न माझे जळून गेले तर
राख सुद्धा खपेल बाजारी
दु:ख आले निघूनही गेले
सांत्वने एकजात सरकारी
मिलिंद छत्रे