अंगण
माझं अंगण
मी जेव्हा जेव्हा पहाटे अंगणात पाऊल टाकायचे, मला मोहवायचा तो नुकत्याच उमलणाऱ्या प्राजक्ताचा सुगंध...त्याच्या फुलांना वरदान लाभलेलं, कधी देवाच्या चरणी लीन होण्याचं..तर कधी कुणा एका वेड्या मुलीच्या ओंजळीत दरवळण्याचं, आपल्या नाजूक स्पर्शानं तिला मोहरून टाकण्याचं...त्याच्याकडे पाहिलं की त्याच्यासारखीच एक नाजूक जाणीव मनात उतरायची...जणू पानांवर अवतरलेल्या, लुकलूकणाऱ्या शुभ्र चांदण्याच... ज्यांना मी स्पर्श करताच हळुवार माझ्या हातावर उतरतील...
मंजुळ्यांची तुळसा
घराचं अंगण अगदी कुणाच्या खिजगीणतीतही नसलेला विषय...पण तरी यावर लिहावंसं वाटतंय...घराला अंगण असणारे किती भाग्यशाली असतात हे पुण्या मुंबईत फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला विचारा? हा लेख लिहीत असताना कदाचित मी त्यांच्या दुखऱ्या भागावरील खपल्याही काढत असेल याबद्दल क्षमस्व!!! पर्यायाने माझ्याही...
अंगणात माझिया ( आमचं खळं )
मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का ग, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल ......
आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेंव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा ....
पोळ्या करताना गॅस जवळ उभं राहुन चिवचिवलयं अगदी, मी आता दहा मिनीटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय. ....
खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्या साठी अमृत कोकम पाठवा.....
असं आमचं खळं ( कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे. ) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षा ही अधिक वापरात असलेलं , सगळ्यांचचं लाडकं .... आमचं खळं
आभाळ आणि अंगण
गर्जुन कधी तडकुन-बिडकुन चालून येतं आभाळ
अनावरून अंगणात मग बरसुन जातं आभाळ
भरून आलं खूप की अन मनात येईल तेव्हा
भुळूभुळू गळत मुळूमुळू होतं आभाळ....
थेंब न थेंब झेलत तेव्हा भिजत रहातं अंगण
शांतपणे आभाळाचं ऐकुन घेतं अंगण
धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण
थोपटून परत पाठवतं अंगण सावरलेलं आभाळ
अंगण मिठीत घेऊ कधी पहातं मग आभाळ
आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण
-- शलाका
अंगण
अंगण
छान सुबकसे जर्जर अंगण
मऊ मुलायम कुठे न खडवण
ओलावा अलवार राखते
धूळ न उसळे कधीही तेथून
छुमछुमले पैंजण कधी येथे
कंकण हिरवे चमकत होते
चिउ-काउच्या गोष्टी ऐकून
पिले उडाली सोडून घरटे
गर्द सावली उन्हे तळपली
ऋतुमानाची चाके फिरली
वादळवर्षा सुसाटवारे
सुरकुत थोडी दिसू लागली
दिसू लागता सांजसावल्या
अंगण अंतरी कातर कातर
तुळशीवृंदावन सामोरी
मंद मंद ज्योतीची थरथर
एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी