माझं अंगण

Submitted by Harshraj on 27 March, 2018 - 01:49

मी जेव्हा जेव्हा पहाटे अंगणात पाऊल टाकायचे, मला मोहवायचा तो नुकत्याच उमलणाऱ्या प्राजक्ताचा सुगंध...त्याच्या फुलांना वरदान लाभलेलं, कधी देवाच्या चरणी लीन होण्याचं..तर कधी कुणा एका वेड्या मुलीच्या ओंजळीत दरवळण्याचं, आपल्या नाजूक स्पर्शानं तिला मोहरून टाकण्याचं...त्याच्याकडे पाहिलं की त्याच्यासारखीच एक नाजूक जाणीव मनात उतरायची...जणू पानांवर अवतरलेल्या, लुकलूकणाऱ्या शुभ्र चांदण्याच... ज्यांना मी स्पर्श करताच हळुवार माझ्या हातावर उतरतील...

आणि मग शेजारी उभा असलेला चाफा उगीच माझ्यावर रुसल्यासारखा वागतो..त्याच्याकडे पाहिलं नाही म्हणून टपकन एखादं फुल डोक्यावर टाकून अस्तित्व जाणवून द्यायचा...त्याच्याकडे पाहून हलकं स्मित केलं की मग मात्र शुभ्र फुलांची बरसात करायचा..त्यातलंच एखादं फुल मी ओंजळीत घेतलं की आनंदानं डूलायचा, म्हणायचा,' अंग मी नसेन त्या प्रजक्तासारखा नाजूक,ना त्याच्यासारखा सुंदर रूप..
हळुवार माझ्या बाजूला आलीस की दाखवीन तुला या फांद्यामधून डोकावणाऱ्या चंद्राचं सौंदर्य.. आणि खरोखरच अगदी टक लावून पाहत राहायचे मी ते सौंदर्य.

पाहता पाहता अलगद एखादी झुळूक स्पर्श करून जायची..आणि कोपऱ्यातील रातराणी सुगंधबरोबर हलकेच निरोप पाठवायची..' मी सुद्धा आहे बरं का इथेच..!' मग अशी काही दरवळते की चांदण्यांनी भरलेला आसमंत सुद्धा किंचित थरारतो.. असं वाटतं डोळे झाकून तो सुगंध मनात साठवुन घ्यावा..

तिच्याकडे पावलं वळत असतानाच सळसळायाची बकुळ..कधीच न सुकणारी..न रुसणारी..असं वाटायचं विसरून सगळं मोठेपण, घ्याव्यात तिच्याभोवती गिरक्या..तिच्या खोडावर, फांद्यावर चढलेल्या जाईच्या वेलाचे झोके करून, उंच जावे आभाळात..त्या फुलांचा सडा पाहून भान विसरावं, वेचवित चारदोन फुलं त्या अगणित फुलातील आणि ठेवून द्यावीत कुपीत..अत्तराचे काय काम मग??

सोनचाफाही असाच वेडा..त्याच्या पिवळ्या फुलांचा सडा पाहिला की येणाऱ्या नव्या किरणांसोबत प्रसन्न होऊन जायचं मन.. मनातले कितीतरी प्रश्न, कितीतरी विचार त्याला सांगायचे नकळत.. आणि तोही जणू सगळे समजल्याचा आव आणून आणखी डोलायचा..
सगळे सोबतीच माझे..माझ्या मनाच्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देणारे..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users