झाड तर प्रेमदिवाणे.......
खांद्यावर पाखरांसंगे
ते मंजुळसे किलबिलते
वार्याच्या झुळकीसरसे
ते गीत अनामिक गाते
झेलताना पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे
शिशिराच्या साथीने ते
पान पान फेकून देते
कात का टाके जर्जर
नवतरुणपणाते ल्याते
ऋतुराज येता जवळी
अभिसारिका जशी ते खुलते
होउनिया बेधुंद
उरी शिरी कसे ते फुलते
ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानोपान सुखावलेले
ही कविता कशा संदर्भात आहे हे कळण्यासाठी -
वस्त्रातच स्वतःला पहातो जन्मापासून
"वस्त्र"च मी ओळख घेतली विना पारखून निरखून
किती तलम, किती सुंदर, वीण नाजुक किती छान
रंग कुठला का असो मला याचा खूप अभिमान
डोळ्यात तेल घालून वस्त्र ठेवी जपून
जरा कुठे उसवताच घेतो लगेच शिवून
आयुष्यभर वागवताना भार मुळीच होत नाही
लक्तरं-चिंध्या झाल्यावरही अभिमान सुटता सुटत नाही
वस्त्रच अखेर ते, कधीतरी विरणार...फाटणार...
विसरुन जाउन हे वास्तव मी रडणार, ओरडणार...
मोह पडतो या वस्त्राचा सोडता सोडवत नाही
अखेरीला थकून म्हणतो वस्त्र आता सोसवत नाही
पण तोपर्यंत उशीर खूप झालेला
वस्त्रविचारातच मी अगदी जखडलेला
साथ - संगत
खूप काळाची तुझी साथ एका क्षणात झाली नाहिशी
मनाची सवय थोडीच मोडणार आठवासरशी कासाविशी
तू नाहीस हे वास्तव मन पटवून घेत नाही
आठवांच्या डोहातून बाहेर मुळीच येत नाही
पुसलेल्या पाटीवरचे पाणी हलकेच उडून जाते
कोरड्या पाटीवर मागे ठसे मात्र कायम ठेवते
भर मध्यावर नाव उभी एक वल्हे हरवलेले
हेलकावे जबरदस्त तारू तर भरकटलेले
वल्हे हातात घेतले खरे तारू जरा सावरतंय
दुसरे वल्हे मारताना हे कोण दिसतंय
नाव आता खूपच स्थिर मार्ग पुढे काढते आहे
एकटे किती श्रमणार साथ-संगत जरूर आहे
सर्व कविवर्य, आदरणीय समीक्षक व रसिकांना,
कोणाविषयी आकस न ठेवता हे मांडले आहे. - हे वास्तव का अवास्तव - सुज्ञासि सांगणे न लगे. कृपया कोणी फार (?) मनाला लावून घेणार नाही अशी आशा करतो.
सर्व साहित्यकृतींना वाव देणारे - मा बो हे फार उत्तम व्यासपीठ आहे अशीच माझी धारणा आहे.
अवचित येती जुन्याच कविता उसळुनिया पहिल्या पानावर
प्रतिसादाने घडते जादू इथेच अपुल्या मायबोलीवर
पहिल्या पानासाठी झुंजी कलमबहाद्दर सरसावुनि उठले
रामायण घडतसे कधी तर महाभारती कोणी पडले
उदंड कवी समीक्षकही उदंड ते, रण येथे का सतत पेटले
अवचित कोणी रसिक कवी तर चांदणसुख पेराया झटले
अनंत यात्री
कितिक मरणे आलो झेलीत
कितिक जगणे आलो तुडवित
मार्ग न येथे कधी संपला
अनंताचा मी तो यात्रिक १
विजय पराजय ते हि चाखले
दु:ख कधी, कधि सुख अनुभवले
चालणे मात्र कधी न खुंटले
अनंताचा मी तो यात्रिक २
हर मुक्कामी नवे साथीला
कधि हितगुज कधि खटका उडला
बंध न त्याचे नव्या घडीला
अनंताचा मी तो यात्रिक ३
खंत कशाची आता उरली
आशा ती ही मागे पडली
प्रवास कसला यात्रा ही तर
अनंताचा मी तो यात्रिक ४
चालण्यात मौज अशी वाटे
असोत सुमने वा कधी काटे
आकर्षण ना थांबायाचे
अनंताचा मी तो यात्रिक ५
पथ मी येथे नसे रेखिला
अनुमान तरि धरु मग कुठला
सय
घरातून दूर जाता
सय घरट्याची येई
सय मावेना मनात
डोळ्यातून मुक्त वाही
सय येई चिमण्यांची
सय बाग गुलाबाची
सय होऊनी असह्य
ऊराचाची वेध घेई
जिवलगाचीही सय
वेळ साधूनिया घेई
मखमली क्षण सारे
नभ झाकोळून जाई
रान ओले पाहताना
मन चिंब होत राही
चैत्रपल्लवी फुलता
मनवेडे अंकुरेही
दिठी शोधतसे साथ
रान घाटमाथ्यातून
येई सामोरी साथीला
काटेसावरी फुलून
थेंबातून अवतरे
मेघचैतन्य सावळा
आसमंत धुंद सारे
भोगी आनंद सोहळा
थेंबाथेंबांची ही साद
पाखराच्या कंठी येई
सावळ्याच्या बासरीची
मुक्त तान रानी जाई
थेंब थेंब येता रानी
रत्न मोती लकाकती
झळाळून दावीतसे
सावळ्याची अंगकांती
थेंब थेंब टिपताना
राधा बावरुन जाई
सावळा की भास मना
मनी मोहरुन येई
थेंब कान्हा थेंब राधा
रास सर्वत्र रंगला
हरवले सृष्टीभान
सावळा की सृष्टीकळा
सखी
सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरी ते हास्य खुले
सावळ तरिही सतेज कांती जाईची जणु वेल झुले
पदन्यास तो दिसे मनोरम रसिकाला करतोच खुळे
रेखिव भिवई किंचित उडवुन नजरेला ती नजर मिळे
हृदयी वाजे सतार झिणझिण नजर फिरूनी तेथ खिळे
मनी उमटती शब्द कितितरी ओठावरती अडखळले
विलग अधर होताच तरी ते नि:श्वासी संपुन गेले
दुकानदार - आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे दिवाळी स्पेशल `नवे' फटाके आले. भाई भांगरेचे फटाके घ्या आणि सणाचा आनंद द्विगुणीत करा.
गिर्हाईक - का उगाच सणाच्या नावाखाली गिर्हाईकांना लुटताय.
दुकानदार - लुटायला मी काय दरोडेखोर आहे का ? काहीतरी बोलून का उगाच भरल्या बाजारात फटके खायला लावू नका. त्यापेक्षा आल्यासारखे फटाके घ्या. आले, आले सुप्रसिध्द भाई भांगरे यांचे फटाके आले.
गिर्हाईक - हे बघा आधी तुमची जाहीरातबाजी बंद करा. चांगलं वाईट लोकांना कळतं.