वैभव वैराग्याचे
नको जाहली प्रेमकहाणी
गुळगुळीत झिजलेली नाणी
आज नका ऐकवू कुणीही
आर्तआर्तशी तीच विराणी
नकोत त्या पुष्पांच्या गोष्टी
झरे - निर्झरा नकोच दोस्ती
गर्द तुरे पानांचे ते ही
ऐकुनिया का होई कष्टी
निखळ कोरडे तरिही हसती
पत्थर छाती काढुनि पुढती
रोमातुनही निथळत होती
बेदरकार जिण्याची मस्ती
पर्जन्याच्या धारा झेलित
तप्त तेज सूर्याचे पेलित
उभे ठाकलो वर्षे अगणित
उन्नत माथा कदा न अवनत
कठीण वाटू जरि वरिवरिसे
अंतरात वात्सल्यचि वसते
मातीला आधारचि होऊ
करे बळकटे जखडुनि ठेऊ
जगणे असले उपेक्षिताचे
कोरडेच अन कठिणत्वाचे
प्रेमभाव तुकोबाचा.....
चिपळी वाजतसे करी
वीणा शोभे खांद्यावरी
नेत्री भक्तीभाव झरी
मुखे विठ्ठल उच्चारी ||
ऐसे शोभले बरवे
ध्यान तुकोबाचे साचे
वाचे उच्चारिता तुका
विठू आनंदला देखा ||
चित्तामाजी होय सुख
गाथा वाचूनिया देख
कंठी तुकाचे अभंग
हरिखला पांडुरंग ||
व्हावी विठ्ठलाची कृपा
वाटे जीवाचिया जीवा
तरी ध्यावे तुकोबाते
ध्यान तेचि विठोबाचे ||
सांठवोनि तुका आंत
गावे तुकोबाचे गीत
त्वरे येईल धावत
विठू सोडोनि वैकुंठ ||
खरी खरी साथ दे (Valentine day special)
(सर्व मित्रांना प्रेमळ विनंती)
आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?
अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते
अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?
कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे
भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे
"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे
झाड मजेत उभे उन्हात
पाखरांसोबत गाणे गात
आला वारा इकडून तिकडून
सळसळ वाजली पानातून
वारा हळूच काढी खोडी
झाडासोबत झिम्माफुगडी
गरगर गरगर झाडा फिरवून
पाने दिली की भिरकावून
वार्याला वाटे मोठी मौज
सोबतीला घेई ढगांची फौज
पाहून वार्याची घुसळणकुस्ती
गरजले ढग - "बास ही दंगामस्ती"
ओरडूनही ऐकत नाही बेटा
पाठीत बसला वीजेचा रट्टा
वीजेचा रट्टा गारांचा मारा
वार्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा
रडत रडत पळाला वारा
झाड म्हणाले "उतरला का तोरा ?"
कविता अन् दाद
माझ्या प्रत्येक कवितेची पहिली वाचक
तूच........
तू कविता वाचत असतेस....
अन मी तुझा चेहरा......
तिथेच उमटतो तुझा अभिप्राय,
रुक्ष समीक्षकाचा वा उथळ रसिकतेचा आव न आणता सहज उदगारलं जाणारं... एखादं
वा....
छान...
हं...
फारंच मस्त जमलीये......
मोजकेच शब्द, पण माझ्यासाठी....जमली का नाही हे नेमके सूचित करणारे....
कधी तुला त्रस्त करते एखादी शारीरिक व्याधी
पण त्या व्याधीपेक्षा तू जास्त खिन्न होतेस माझी व मुलींची आबाळ होताना पाहून
अन्
आपसूकच होतो मी आई...
तू मुलगी....
किती कमी काळाकरता हे नातं निर्माण होतं.....
आईचा बर्थ डे
आईचा बड्डे आलाच की परवा
प्रेझेंटचे काय कुणीतरी ठरवा
साडी काय टॉप्स काय सारेच तिचे नावडते
ग्रीटिंग्ज - बांगड्यांना नाके मात्र मुरडते
फुलंच तिला आवडतात फार !
बुकेच आणूयात एक का चार !
केकचा तुकडा भरवताच तिला
डोळे का लागले तिचे वहायला
जवळ घेऊन म्हणते कशी मला
"मी का आता लहान आहे बाळा
कशाला प्रेझेंट, फुले नि केक
गोड पापी तुझी हीच मला भेट"
चांदोबाची गमाडी - गम्मत !
चांदोमामा गोलम गोल
गोल गोल ढोल मटोल
केला आईकडे हट्ट खूप
कमी झाले साखरतूप
साखरतूप कमी झाले
चांदोबा बिचारे रडू लागले
रडता रडता मुळुमुळु
चांदोबा वाळले हळुहळु
रुसुन चांदोबा दडून बसले
कोणालाही नाही दिसले
आईने पुन्हा देता खाऊ
चांदोबा हसून लागले डोकाउ
हसतात कसे ओठातून
चंद्रकोर दिसते उठून !
निसर्गस्वर
अवचित आला मेघ कुठुनसा
बरसून जाई आनंदरेषा
रेषांनी त्या लाजून अवनी
झाकून घे मुख पानफुलांनी
फुलाफुलांचे गोड गोडुले
मधुकुंभ भर-भरुनि वाहले
वाहत तेथील गंध मंदसा
भ्रमर द्विजगणा हाकारितसा
हाक ती जरि असली अनामिक
परस्परांची होते जवळिक
जवळिक होते गीत मधुरसे
गुंजत राही मनीमानसे
मनात घुमता हे आलापीगत
आमचे काही गॄहसदस्य -
हे सर्व छायाचित्रण माझ्या मुलीने केलेले आहे-
भामटी - ही त्या लाडी - गोडू ची आई.
लाडी
गोडू
शेअरिंग .....व्हॅलेंटाईन निमित्त