वैभव वैराग्याचे..

Submitted by पुरंदरे शशांक on 14 March, 2011 - 03:40

वैभव वैराग्याचे

नको जाहली प्रेमकहाणी
गुळगुळीत झिजलेली नाणी
आज नका ऐकवू कुणीही
आर्तआर्तशी तीच विराणी

नकोत त्या पुष्पांच्या गोष्टी
झरे - निर्झरा नकोच दोस्ती
गर्द तुरे पानांचे ते ही
ऐकुनिया का होई कष्टी

निखळ कोरडे तरिही हसती
पत्थर छाती काढुनि पुढती
रोमातुनही निथळत होती
बेदरकार जिण्याची मस्ती

पर्जन्याच्या धारा झेलित
तप्त तेज सूर्याचे पेलित
उभे ठाकलो वर्षे अगणित
उन्नत माथा कदा न अवनत

कठीण वाटू जरि वरिवरिसे
अंतरात वात्सल्यचि वसते
मातीला आधारचि होऊ
करे बळकटे जखडुनि ठेऊ

जगणे असले उपेक्षिताचे
कोरडेच अन कठिणत्वाचे
प्रेम न लाभे एक तृणाचे
मिरवू वैभव वैराग्याचे.....

गुलमोहर: 

मस्त

निखळ कोरडे तरिही हसती
पत्थर छाती काढुनि पुढती
रोमातुनही निथळत होती
बेदरकार जिण्याची मस्ती

खरी सकारात्मक शक्ती दिसली
नुसते हे नको ते नको असे नाहीये
Happy

'करे बळकटे जखडुनि ठेऊ '

'बळकट करांनी जखडून ठेवू' असा भाव.
तर करें योग्य आहे (अनुस्वार अनेकवचनी ).
बळकटे असे लिहिण्याची गरज नाही.
ते संस्कृतमध्ये होते (विशेषणाला नामाची विभक्ती).
बघा पटतय का!