अनंत यात्री
कितिक मरणे आलो झेलीत
कितिक जगणे आलो तुडवित
मार्ग न येथे कधी संपला
अनंताचा मी तो यात्रिक १
विजय पराजय ते हि चाखले
दु:ख कधी, कधि सुख अनुभवले
चालणे मात्र कधी न खुंटले
अनंताचा मी तो यात्रिक २
हर मुक्कामी नवे साथीला
कधि हितगुज कधि खटका उडला
बंध न त्याचे नव्या घडीला
अनंताचा मी तो यात्रिक ३
खंत कशाची आता उरली
आशा ती ही मागे पडली
प्रवास कसला यात्रा ही तर
अनंताचा मी तो यात्रिक ४
चालण्यात मौज अशी वाटे
असोत सुमने वा कधी काटे
आकर्षण ना थांबायाचे
अनंताचा मी तो यात्रिक ५
पथ मी येथे नसे रेखिला
अनुमान तरि धरु मग कुठला
चालण्याविण मार्ग न उरला
अनंताचा मी तो यात्रिक ६
पथदर्शी जरि कुणी भेटला
त्याचा माझा मार्ग निराळा
चरैवेति मंत्र तरि दिधला
अनंताचा मी तो यात्रिक ७
उत्सव झाला या यात्रेचा
शब्दे काही वर्णायाचा
चालताचि तो अनुभवण्याचा
अनंताचा मी तो यात्रिक ८
...............अनंताचा मी तो यात्रिक........
शशांक.. खुपच चाललास..
शशांक.. खुपच चाललास.. "यात्रिक १०" ट्प्पा पूर्ण करायचा ना?....! "यात्रिक८" जरा अपुर्ण वाट्तंय
बाकी सुंदर जमलीय कवीता.
"हर मुक्कामी नवे साथीला कधि
"हर मुक्कामी नवे साथीला
कधि हितगुज कधि खटका उडला
बंध न त्याचे नव्या घडीला
अनंताचा मी तो यात्रिक"
.... छान
नमस्कार चातक -अभिप्रायाबद्दल
नमस्कार चातक -अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. काय अपूर्णता वाटते - जरा सविस्तर सांगणार का -मलाही काही शिकता येईल याच्यातून.
उल्हासकाका - सस्नेह नमस्कार.