अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तिथले दृष्य बघून मात्र मनात काहीतरी हलले.
फक्त एक घटना, एक चूक आणि अख्खं घर त्यात सोलवटून निघालं, हे ही आणि ते ही. समाधान, स्नेह, जिवंतपणा सगळं भस्म झालं.
जिवनेच्छाच संपली होती जणू, त्या घराची आणि त्याचीही. चमत्कारावर त्याचा विश्वासच नव्हता. 'डेड-एंड' म्हणतात तो हाच म्हणत 'कायमचा निरोप' घ्यायलाच आज तो इथे आला होता.
सवयीने 'तिकडे' लक्ष गेले तेव्हा, उजाड घराच्या त्या भिंतीतून कोवळी पालवी डोकावताना दिसली. तब्बल सहा महिन्यांनी डोळ्यात ओल जाणवली.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ..... फाटकाजवळ डेवलपरचा जेसीबी पाहून भितीने त्याची आतडी पिळवटली.
टेंपोवाल्याबरोबर वंगाळ करतांना पकडली म्हणून दोनच महिन्यांपूर्वी त्याने लक्ष्मी आणि तिच्या याराचा गळा चिरून प्रेतं शेजारच्या घराच्या परसातल्या खड्ड्यांत पुरली होती.
मग 'छिनाल, टेंपोवाल्याबरोबर पळून गेली' अशी बोंब मारत ठाण्यात रिपोर्ट सुद्धा लिहिला.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
दोघी एकमेकींकडे बघून सहेतुक हसल्या. ती आली आणि भरभरून बोलत सुटली, "अग, काय सांगू तुम्हाला... धमाल चालू आहे नुसती गणेशोत्सवाची. पाककला, झब्बू, कोडी, गाणी , चित्र, हस्ताक्षर एकापेक्षा एक कार्यक्रम चालू आहेत. "
" ..आता सगळ्यांना विसर पडला असेल ना राजकारण, धर्म, संस्कृती आणि इतर विषयांवरच्या वादाचा..?" दुसरी विचारत होती.
" एवढंच नाही, तर लोक अगदी भरभरून कौतुक पण करत असतील एकमेकांचे." - पहिली म्हणाली.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले….
"अरे हे काय... डोकं मागून फाटून गेलंय तुझं!"
"हो ना. तूच माझी टोपी दे ना नीट बसवून..."
"कुठून देऊ? माझाच हात तुटलाय बघ."
"आणि हे काय? तोंड काय रंगित करून ठेवलंय? केसांचं पार वाळकं गवत झालंय."
"या घरात आपण आलो तेंव्हा काय सुंदर दिसत होतो!"
"मी गोंडस गुबगुबीत, तू गोरीपान सडपातळ…. आणि आता..."
"आपल्या नशिबी असेच हाल. लहानग्या देवांना खेळवायचं, हसवायचं हेच आपलं सार्थक!"
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. 'अरे हे काय, हाताला बँडेज कसले? 'सैंयाने मरोडी बैंया? आँ'
चल चावट!.. ऑक्युपेशनल हॅझार्ड बाई.. कार्पल टनल सिंड्रोम. आजीची मनगटं जात्यावर मोडली, आईची पोळपाटावर. आता माझ्या नशिबात ह्या मनगट्या.. कीबोर्ड बडवून.
एs आपण एकाच बॅचच्या ईंजिनियर! मग वीस वर्षे प्रोग्रामिंग करत मनगटातली रग गमावून मी झाले काकूबाई टीम-मॅनेजर, आणि तू? सॉफ्टवेअर कंपनीची फॅशनेबल सीटीओ... तरीही तुझी मनगटं शाबूत?
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
उत्साहाने घराचे कुलूप उघडणाऱ्या जोडप्याकडे पाहून त्याने आपली नजर वळवली. आपल्या नजरेत पराकोटीचा विषाद , मुरलेली हतबलता त्यांना जाणवू नये ह्या पंचायतीत! त्याच्या बंद डोळ्यांसमोर त्याने आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने आकडेमोडीत घालवलेले कित्येक तास तरळून गेले. दुसऱ्या क्षणी मानेला हलकेच दिलेल्या झटक्यासरशी मनातले कडवट विचार बाजूला करत शेजाऱ्यांचे स्वागत करायला रघू हसून पुढे झाला.