योजनांच्या आखलेल्या वाटा धूसर होत असताना
स्वप्नांची बांधलेली घरं उध्वस्त होत दिसताना
थोडा निराश होऊ दे मला, थोडं उदास राहू दे मला..
नको सांगू मला की होईल सगळं नीट
की दुसऱ्यांना धीर देण्या आपणच व्हावं धीट
कपाळावरच्या आठ्यांवर आधीच भार आहे
हे जबाबदारीचं ओझं थोडं बाजूला ठेवू दे मला..
नको हसण्याचा अट्टाहास; मला थोडे अश्रू ढाळू दे
हरलेल्या डावांचे, मेलेल्या आशांचे; थोडे सुतक पाळू दे
मोक्ष मिळण्या कुणासही जरुरी अंत्यसंस्कार आहे
या उद्विग्न भावनांच्या चीतेला आग लावू दे मला..
तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?
माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील
आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील
तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील
माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील
तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील
उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...
वृत्त: : आनंदकंद
माझे काव्य
रुसलेल्या निद्रादेवीची आराधना
मी कधीच करत नाही
कारण या अवेळीच्या जागेपणीच
काव्य माझे जन्माला येत असते...
असह्य दु:खाने जगणे जेव्हा नकोसे होते
तेव्हाही मी जीव देत नाही
कारण हे नकोसे जगतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...
आठवणी पुराण्या बेचैन करतात
चुकलेल्या निर्णयांना दोष देतात
तरीही मी मला शिक्षा देत नाही, कारण तेव्हाही,
काव्य माझे जन्माला येत असते...
असंख्य विचारांचा मनात गुंता
तो सोडवण्याचा माझा धंदा,
कारण हा गुंता सोडवतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...
आपल्याकडे वागण्यात काही दोष
आढळलेल्या व्यक्तीला
किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला
अगदी सहज जनावर असं
संबोधलं जातं
म्हणजे मग हे संबोधणाऱ्यांना
असं सूचित करायचं आहे का की
जनावर
एखाद्याचं सत्य किंवा सज्जनता
खटकली म्हणून
त्याची हत्या करू शकते?
किंवा एखाद्याच्या अमानुष अत्याचाराला
कंटाळून आत्महत्या करू शकते?
जनावर एखाद्याच्या तत्व आणि निष्ठेवर
प्रहार करू शकते? किंवा
जनावर सामुहिक बलात्कार करू शकते?
जनावर अपमान करू शकते? किंवा
खोटा सन्मान करू शकते?
ओळखलं तिने मला..
इतकं अचूक ओळखलं तिने मला
असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं
मान्य केलं हे मी, पण मनोमन
प्रत्यक्षात तिच्या दाव्यांना मी फेटाळलंच होतं
तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार
आणि जोडले त्यातले काही माझ्याशी
त्या क्षणी जरूर वाटले बुरखा फाटला माझा
पण ते स्वतःपाशीही मान्य करणं मी टाळलंच होतं
भावनिक होऊन एकदा मी दिली तिला
संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी
पण यातही स्वातंत्र्य देण्याच्या हक्कांवरच
हक्क सांगणं माझं
तिने ओळखलंच होतं
कधी बिलगण्या वारा येतो
अश्रू पुसण्या पर्णही देतो
'ह्रदय तुझे दे तळहातावर
ते तिजला मी देईन' म्हणतो
अंतरीची धगधग जाणून तारा
येऊन कानी कुजबुज करतो
'तिच्या भेटीची कर व्यक्त इच्छा
पूर्ण ती करण्या तुटेल' म्हणतो
अधीर चंद्र अंगणी झेप घेतो
क्षणभराचा सोबती होतो
'सांग तुझी रे व्यथा मनाची
ती तिजला मी सांगेन' म्हणतो
घुसमटलेल्या भावनांचा मग उद्रेक होतो
तारा, वारा हळवा होतो
चंद्र पोचतो तिच्या अंगणी अन्
शक्य तसा तिज निरोप देतो
कितीशी असते अशी
एखाद्या विहिरीची जागा
एका वर्तुळा भोवती
सारा खोलीचा त्रागा
उन्मादत असते पाणी
खोल खोल डोहात
काढणारा मात्र असतो
आपल्याच उंचीच्या ओघात
मस्त सिमेंट काँक्रीटवर
हात जखडून ठेवतो
मान अर्धी खोलात
विस्कटणारे प्रतिबिंब बघतो
एवढ्या पाषाणी दगडात
ओलावा असेल तरी कसा
पडणारी एक एक भेग
जसा ओलावा देईल तसा
इतके अंदाज सारे
वरूनच कसे बांधायचे
स्पर्शविना इतके सारे
असेच कसे बोलायचे
तुझ्या येण्यानी सृष्टीसारी सुखावते
हे तू जरा विसरून गेलास का...???
एवढ्यात तू जास्त बरसलासं
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझं नेहमीचं पडणं म्हणजे
दोन महिने तीन महिने हेच का...???
पण यावेळी वेगळा वागला आहेस
हे तू जरा विसरून गेलास का...???
तुझ्या येण्याने माणसं सुखावून गेली
आनंदाने सगळीकडे उधाण आल का...???
नेहमी सारखं वागणं कस असतं
हे तू जरा विसरून गेलास का...???
चार दिवस पाहुणा असतो तू
हे विसरून यावेळी वागलास का...???
आनंदावर विरजण घालून गेलास
हे तू जरा विसरून गेलास का...???