माझे काव्य!

Submitted by पराग र. लोणकर on 14 August, 2020 - 00:54

माझे काव्य

रुसलेल्या निद्रादेवीची आराधना
मी कधीच करत नाही
कारण या अवेळीच्या जागेपणीच
काव्य माझे जन्माला येत असते...

असह्य दु:खाने जगणे जेव्हा नकोसे होते
तेव्हाही मी जीव देत नाही
कारण हे नकोसे जगतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...

आठवणी पुराण्या बेचैन करतात
चुकलेल्या निर्णयांना दोष देतात
तरीही मी मला शिक्षा देत नाही, कारण तेव्हाही,
काव्य माझे जन्माला येत असते...

असंख्य विचारांचा मनात गुंता
तो सोडवण्याचा माझा धंदा,
कारण हा गुंता सोडवतानाच
काव्य माझे जन्माला येत असते...

सुखाच्या क्षणांची कधी होते बरसात
चिंब भिजताना त्या वर्षावात
देहभान विसरुन जाते जेव्हा,
काव्य माझे जन्माला येत असते...

काव्यधारांच्या सरीवर सरी
कधी अचानक बरसू लागतात
अचंबित मी हतबुद्ध होतो, तरी
काव्य माझे जन्माला येत असते...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults