थोडा निराश होऊ दे मला..

Submitted by अभिषेक_ on 22 July, 2023 - 01:28

योजनांच्या आखलेल्या वाटा धूसर होत असताना
स्वप्नांची बांधलेली घरं उध्वस्त होत दिसताना
थोडा निराश होऊ दे मला, थोडं उदास राहू दे मला..

नको सांगू मला की होईल सगळं नीट
की दुसऱ्यांना धीर देण्या आपणच व्हावं धीट
कपाळावरच्या आठ्यांवर आधीच भार आहे
हे जबाबदारीचं ओझं थोडं बाजूला ठेवू दे मला..

नको हसण्याचा अट्टाहास; मला थोडे अश्रू ढाळू दे
हरलेल्या डावांचे, मेलेल्या आशांचे; थोडे सुतक पाळू दे
मोक्ष मिळण्या कुणासही जरुरी अंत्यसंस्कार आहे
या उद्विग्न भावनांच्या चीतेला आग लावू दे मला..

सभोवताली पडलेले प्रयत्नांचे मुडदे
अन त्यांस लपवण्या पांघरलेले जिद्दीचे पडदे
उमेदीचा चष्मा घालून पुन्हा या साऱ्याकडे दुर्लक्ष करणार आहे
फक्त काही क्षण हा पसारा उघड्या डोळ्यांनी पाहू दे मला..

मी कुठे म्हटलं की मी धीर सोडला आहे?
कुठे मी अजून दिला शब्द मोडला आहे?
पण अपेक्षांच्या अरण्यात प्रश्नांची संततधार आहे
मौनाच्या आडोशाखाली थोडा विसावा घेऊ दे मला..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users