मराठी गझल

सखे तुझ्या केसांमधले

Submitted by मिल्या on 14 April, 2014 - 07:02

सखे तुझ्या केसांमधले गजरे दरवळतात किती
जीभ, कान, डोळे माझे नाकावर जळतात किती

पर्वत बघुनी कळते का, उन्हे त्यास छळतात किती
असंख्य डोळ्यांतुन त्याच्या अश्रू ओघळतात किती

घातलेस तू माझ्यावर जगावेगळे घाव असे
खपल्या धरल्यावर सुद्धा जखमा भळभळतात किती

प्रवासात आयुष्याच्या, पदोपदी हे जाणवते
मी सरळच चालत असतो पण रस्ते वळतात किती

तुझ्यासारखा गाव तुझा, आहे पवित्र अन् निर्मळ
झरे सोड डबकीसुद्धा, इथली खळखळतात किती

एक असा क्षण येतो की, स्तब्ध किनारा होते मन
शब्दांच्या उत्कट लाटा, येउन आदळतात किती

दारावर येते जेव्हा, मोहमयी ही झुळुक तुझी
भले भले निश्चय माझे, तेव्हा डळमळतात किती?

विषय: 

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

Submitted by अभय आर्वीकर on 12 April, 2014 - 19:38

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

''जगाला दावण्यासाठी तरी तू घाव मोठा दे''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 11 April, 2014 - 02:40

जरी मोठा न आवाका जिवाला आव मोठा दे
( नको छोटे शहर वसण्याकरीता गाव मोठा दे )

शिकस्तीने जराशा जाहले हतबल जगज्जेते
पराभव काय असतो जाणण्या पाडाव मोठा दे

नको टोचूस वारंवार जखमाही दिसत नाहित
जगाला दावण्यासाठी तरी तू घाव मोठा दे

कसा सल काळजामधला कुण्या ओळीमधे मांडू
लिहाया वेदना सारी पुरेसा ताव मोठा दे

पुरे झालीत सारी आडवळणे जीवनामधली
सहल संपायला रस्ता जरा भरधाव मोठा दे

कधी जिंकायचा ''कैलास'' नाही,जाणतो आहे
पराभुत व्हायच्या साठी तरी तू डाव मोठा दे

-- डॉ.कैलास गायकवाड

शब्दखुणा: 

माझे तुझे नाते कसे?

Submitted by मिल्या on 20 February, 2014 - 05:25

माझे तुझे नाते कसे?
शोलेतले नाणे जसे

झिडकारले त्यांनी मला
कवटाळले मी आरसे

मी सत्य साधे बोललो
धावून आली माणसे

रडलो जगासाठी जरा
झाले जगामध्ये हसे

मिळताच टाळ्यांची गुटी
धरले अहंने बाळसे

सोयरसुतक का बाळगू?
हा देह तर माझा नसे

होऊ कसा पडसाद मी?
बसले पहाडांचे घसे

अश्रूंस ओहोटी तरी
डोळ्यातले मिटले ठसे

विषय: 

अमेठीची शेती

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2014 - 13:46

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

टिकले तुफान काही

Submitted by अभय आर्वीकर on 27 December, 2013 - 14:06

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

मानायचो मी ज्यास माझा आरसा

Submitted by मिल्या on 3 December, 2013 - 07:22

मानायचो मी ज्यास माझा आरसा
पारा उडाला नेमका त्याचा कसा?

चिरकाल टिकणारे असे तू दु:ख दे
नाही मला दुसर्‍या कशाची लालसा

केले जरी हे विश्व पादाक्रांत मी
नाही कुठेही उमटवू शकलो ठसा

दगडास आपण ह्याचसाठी पूजतो
उरला कुठे आहे स्वतःवर भरवसा

आलो तुझ्या दारी भिकार्‍या ‌सारखा
काळोख मी, तू दे मला चांदणपसा

झोपेल हे मन शांतचित्ताने अता
होणार आहे राज्य त्याचे खालसा

मौनातुनी संवाद चाले आपला
वाती-दिव्याचा चालतो अगदी तसा

स्वागत असे तू संकटांचे कर जसे
फुलपाखरांना फूल म्हणते या... बसा

’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

Submitted by अभय आर्वीकर on 10 November, 2013 - 13:07

“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन

''वल्कले''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 October, 2013 - 22:56

भेटलो इथे न भेटणार ह्यापुढे
आठवण तुझी समेटणार ह्यापुढे

ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार ह्यापुढे

टाळतोय गुदगुल्या तुला न स्पर्शिता
स्वप्नरंजनात खेटणार ह्यापुढे

घाम फार पाहिला उन्हामधे चिते
पावसामधेच पेटणार ह्यापुढे

ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार ह्यापुढे

--डॉ .कैलास गायकवाड

शब्दखुणा: 

चीन विश्वासपात्र नाही.... (तरही)

Submitted by अभय आर्वीकर on 15 July, 2013 - 02:29

चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमणे नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल