रंग आणखी मळतो आहे
रंग आणखी मळतो आहे
रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे
गारपिटीचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे