आयुष्याची दोरी

Submitted by अभय आर्वीकर on 15 March, 2011 - 05:24

आयुष्याची दोरी

हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो,
कधीही, कुठेही आणि कसेही
आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे
तुझे अधिकार मान्य आहेत मला
पण सन्मानाने मरण्याचे अधिकार
मलाही असावेत की नाही?
हे “जीवन” तुझे असले तरी
“मी” तर “माझा” आहे ना?
तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी
मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून...
माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी
एक छोटीशी नाराजी आहे
आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण...
पण असा देहाला का छाटतोस रे?
तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे?
कधी चिंध्या, कधी लगदा,
कधी खाद्य मासोळ्यांचे
आणि कधीकधी तर आरपार
उमटतात छेद गोळ्यांचे
थांबायला नकोत काय हे
प्रताप तुझ्या सापळ्यांचे??
हे ऐकून
मृत्यू थोडा भांबावला
मग हळूच हसून म्हणाला
“ही तुझी तक्रार की कांगावा?
प्रथम विचार कर की
सल्ला कुणी कोणास सांगावा?
अरे! कृती तुम्ही करता
आणि विकृती माझी म्हणता?
“एक्सलेटर” दाबण्याआधी “ब्रेक” मारणे शिका
वेगासोबतची थांबवा फालतू अहमिका
ज्याचे हक्क त्याला द्यावे, लूट थांबायला हवी
नाहीतर अटळ आहे संघर्ष व यादवी
स्वावलंबी झाडावर बहरल्यात परावलंबी वेली
परावलंबीने स्वावलंबीची काय गत केली?
सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली
म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली
अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा......!! ”

गंगाधर मुटे
...........................................

गुलमोहर: 

Happy

मुटेजी,
ही 'आयष्याची दोरी ' अगदी प्रत्येकाने वाचावी आणि बोध घ्यावाच अशी.
Happy
अरे माणूस म्हणून जन्मलात
तर माणसावाणी वागा
जरा तरी फुलवून पाहा
सौजन्याच्या बागा......!!

वाह !