माझी गझल

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

Submitted by अभय आर्वीकर on 24 July, 2019 - 10:01

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!

या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे

त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे

नित्य येणे तिचे वादळासारखे
मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?

व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे

                 गंगाधर मुटे 'अभय'
==०==०==०= =०==०==०==

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

Submitted by अभय आर्वीकर on 12 April, 2014 - 19:38

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

डोह

Submitted by समीर चव्हाण on 25 March, 2013 - 08:20

कुणी येणार नसते वाट मी बघतो उगाचच
न टिकतो एक जागी ऊठबस करतो उगाचच

स्वतःला गुंतुनी घेतो न पटणा-या त-हांनी
न कुठले काम सामोरी तरी करतो उगाचच

पुढे जाऊन होइल काय, रेंगाळूनही काय
उभा राहू तरी कुठवर जरा बसतो उगाचच

कुठे जाऊ कळेना, पायही निघता निघेना
तरी वळणासवे बेखंत मी वळतो उगाचच

तुझे पाहून कौतुक केवढा अस्वस्थ होतो
जरा ओशाळतो, कोन्यात हळहळतो उगाचच

नवे आणू तरी कोठून, आणावे तरी का
कधी आटून जाइल डोह, घाबरतो उगाचच

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

निरास

Submitted by समीर चव्हाण on 18 March, 2013 - 05:08

तुझाच भास मला वेढतो अजून तिथे
तुझीच हाक सये ऐकतो अजून तिथे

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे
फिरून मीच मला शोधतो अजून तिथे

उगीच आस कुणी जागवू नयेच कधी
उगीच वाट कुणी पाहतो अजून तिथे

तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे

खणून आस पुढे पाहता निरास मिळे
समीर एक दिवा हालतो अजून तिथे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझी गझल