निरास

Submitted by समीर चव्हाण on 18 March, 2013 - 05:08

तुझाच भास मला वेढतो अजून तिथे
तुझीच हाक सये ऐकतो अजून तिथे

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे
फिरून मीच मला शोधतो अजून तिथे

उगीच आस कुणी जागवू नयेच कधी
उगीच वाट कुणी पाहतो अजून तिथे

तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे

खणून आस पुढे पाहता निरास मिळे
समीर एक दिवा हालतो अजून तिथे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे

सुरेख...

बाकी गझल ही छान आहे...

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे<<< या ओळीत काहीतरी गडबड जाणवली. 'कसा' तरी पाहिजे किंवा 'वळत' तरी पाहिजे. तसेच, रदीफ सर्व शेरात निभावली गेल्यासारखी वाटली नाही.

छान !

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे<<< या ओळीत काहीतरी गडबड जाणवली. 'कसा' तरी पाहिजे किंवा 'वळत' तरी पाहिजे. तसेच, रदीफ सर्व शेरात निभावली गेल्यासारखी वाटली नाही.

जमीन बिकट असल्याने व्याकरणाची सूट घ्यावी लागत आहे.
दोन्ही पाय अपेक्षित असल्याने कसा ऐवजी कसे बरोबर वाटते.
रदीफ निभावण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न केलाय.
लोकांनी ठरवावे की निभावला गेला की नाही.

ह्या वृत्तात भट सोडता मराठीत कुणी लिहिल्याचे स्मरत नाही.
हे वृत्त माहीत व्ह्यावे असाही ह्या पोस्टचा उद्देश्य.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

ह्या वृत्तात भट सोडता मराठीत कुणी लिहिल्याचे स्मरत नाही. >>> त्याने काय फरक पडतो?

वृत्त किंवा जमीन गझलेसाठी आहेत की गझल त्यांच्यासाठी??

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे
दोन्ही पाय अपेक्षित असल्याने कसा ऐवजी कसे बरोबर वाटते

एक पाय कसा वळे, दोन्ही पाय कसे वळे?

ह्या वृत्तात भट सोडता मराठीत कुणी लिहिल्याचे स्मरत नाही.
हे वृत्त माहीत व्ह्यावे असाही ह्या पोस्टचा उद्देश्य.<<<

ही गझल बघा:

http://www.maayboli.com/node/31958

===========================================

वळे = एकवचन

वळत = बहुवचन

असे मला वाटते. तसेही:

कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळत = हेही वृत्तात आहेच.

"तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे" >>> हा सर्वात आवडला.
---------------------------------------------------------------------------------------------------
"कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे" याबाबतचे समर्थन अजिबात पटले नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------
"हे वृत्त माहीत व्ह्यावे असाही ह्या पोस्टचा उद्देश्य. " >>>
कृपया या वृत्ताची माहिती द्याल का ?

गैरसमज नसावा.
सगळ्यांना एकेक करून उत्तरे देत आहे.

शामः

त्याने काय फरक पडतो?
काहीच नाही. वृत्त फारसे प्रचलित नाही हे म्हणायचे होते.
कदाचित माझ्या विधानाला आत्मस्तुतीचा वास येतोय.

वृत्त किंवा जमीन गझलेसाठी आहेत की गझल त्यांच्यासाठी??

जमीन हा गझलेचा मुख्य घटक आहे. त्यामुळे त्याचे आपले महत्त्व नाकारता येणार नाही.
ह्या संदर्भात भटांनी बाराखडीत मत दिले होते की वेगवेगळ्या वृत्तात लिहायला हवे.

भरतजी: प्रश्न लक्षात आला. माझ्याकडे उत्तर नाही.

भूषणः

वळे = एकवचन
वळत = बहुवचन

मला खरोखरच कल्पना नव्हती. खरेतर मला वळत आहेत असे म्हणायचे. वळत मुळे वृत्तात बसेल पण लय जाइल, असे वाटते. आपली गझल वाचली पण प्रामाणिकपणे सांगतो की लघु-गुरू क्रम टिकवूनही लयीत किमान मत्लातरी साफ फसलाय असे वाटते.

उल्हासजी:

"कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे" याबाबतचे समर्थन अजिबात पटले नाही.

मात्र वरील ओळ बरोबर असे मी समर्थन केलेच नाही. मी म्हटले की व्याकरणाची सूट घेतोय.

"हे वृत्त माहीत व्ह्यावे असाही ह्या पोस्टचा उद्देश्य. " >>>
कृपया या वृत्ताची माहिती द्याल का ?

ह्या वृत्ताचे नाव मला माहीत नाही. हे अक्षरगणवृत्त आहे. ह्याचा लघु-गुरू क्रम असा आहे:

लगाल | गाल | लगा | गालगा | लगाल | लगा

ह्यात महत्त्वाचे असे की दोन लल चिकटून घेतले की लय बदलण्याची शक्यता उदभवते. भूषण ह्यांच्या वर दिलेल्या गझलेत नेमके हेच झालेय. भटांची मूळ गझल पाहिल्यास हे लक्षात येईल.

धन्यवाद.

समीर चव्हाण

ह्यात महत्त्वाचे असे की शब्दनिवड अशी करावी लागते की दोन लल चिकटून घेतले की लय बदलण्याची शक्यता उदभवते. भूषण ह्यांच्या वर दिलेल्या गझलेत नेमके हेच झालेय.<<<

माझ्या गझलेत लय कुठे बदलली आहे ते कृपया नोंदवावे. कारण ते अक्षरगणवृत्त असल्याने व ते मी पाळल्याने माझ्यामते त्यात लय बदलली जाण्याची शक्यता नाही.

लयीत किमान मत्लातरी साफ फसलाय<<<

सुगंध खोवत वेणी करून दाट पुन्हा

लगाल गालल गागा लगाल गाललगा

तुझ्या कुशीत उजाडेल का पहाट पुन्हा'

लगा लगाल लगागाल गा लगाल लगा

या अक्षरगणवृत्तात एकच यती येत आहे. तो 'लगाल गाललगा गा - यती - लगाल गाललगा' येथे येत आहे व माझ्या मतल्यात यती पाळला गेलेला नाही आहे. मात्र तसाच तो तुमच्या वरील गझलेत :

>>>तुला कळून कळेना, मला जळून कळे
उरायचाच उरे प्रश्न तो अजून तिथे<<<

या शेरात पाळला गेलेला नाही आहे. तरीही ते जाणवत नाही याचे कारण या वृत्तात यती तितकासा महत्वाचा नाही, जसा तो आनंदकंद, रंगराग, शार्दुलविक्रीडित या वृत्तात ठळकपणे जाणवतो तसा.

धन्यवाद

माझ्यामते:

अक्षरगणवृत्त पाळल्यास लय चुकणे असंभव असते. यतीभंग शक्य असतो, पण बहुतांशी वृत्तात यती जाणवतही नाही इतका अस्पष्ट असतो. मात्र ज्या वृत्तात यती महत्वाचा व ठळकपणे जाणवणारा असतो अश्या काही वृत्तांची लगावली खाली देत आहे:

आनंदकंद -

गागा लगा लगागा - यती - गागा लगा लगागा

नुसती बघून जा की - यती - माझी भकास दुनिया

शार्दूलविक्रीडित -

गागागा ललगा लगा लललगा - यती - गागा लगागा लगा

काळोखात अनेक सूर्य बनले - यती - आपापल्या अंबरी

रंगराग -

गालगाल गागागा - यती - गालगाल गागागा

सोडणार आहे मी - यती - हे शहर तुझ्यासाठी

इतर अनेक वृत्तांत यती जाणवण्याइतका ठळकपणे उच्चारला जात नाही. त्यामुळे तो फार महत्वाचा मानू नये असे म्हंटले जाते. मात्र वरील वृत्तांमध्ये तो महत्वाचा असतो व पाळला नाही तर लय बिघडते.

Happy

लयीत किमान मत्लातरी साफ फसलाय>>>> समीरजी वर मी एका प्रसिद्ध गीताचे बोल दिलेत.. त्याच चालीत जरासे संथ लयीत दोन्हीही गझल म्हणून बघा.. मला तरी खूप मजा आली

सुगंध खोवत वेणी करून दाट पुन्हा
तुझ्या कुशीत उजाडेल का पहाट पुन्हा'....वरील लयीत अगदी सुंदर वाटतेय!!

मात्र वळत वर जीभ हवी तशी वळत नाही हेही खरे .. गोडंही वाटत नाही.

भूषणजींनी वर दिलेल्या वृत्तांखेरिज , ''विद्युल्लता'' वृत्तातही यति पाळावा लागतो.

http://www.maayboli.com/node/41975

ही गझल पहावी!

शेवटी ज्या वृत्तात शायर कंफर्टेबल फील करतो, त्यात लिहावे! अन्यथा वृत्तशरणता स्पष्ट दिसून येते व शायराची केविलवाणी हबेलंडी व फरपट वाचकास बोचते! स्वत: शायरच शेरात गुदमरल्यागत वाटतो!

संपूर्ण गझल सुंदर असली तरी वैगुण्याची ओळच खटकत रहाते ! आकृतीबंधाचा परिणामच असा असतो.
>> कळे न पाय कसे त्याच त्या दिशेस वळे >>
याऐवजी
'' कळे न पाउल का त्याच त्या दिशेस वळे '' केले तर ?
यातही पाऊलचं पाउल केलंय,मान्य,पण एकवचनाचा घोळ मिटतोयसे वाटते.

गझलप्रेमी साहेबांच्या प्रतिसादातील शेवटच्या भागावरून, नुकतेच डच्चू मिळालेले एक आत्मशरण प्राध्यापक आठवले. बरे लिहायचे कधी कधी. पण गाशा गुंडाळावा लागला. Sad

मी निराश झालो ही गझल वाचताच !!

प्रतिसाद मात्र खूपकाही शिकवणारे असे आहेत त्याकरिता बेफीजीना विशेष धन्स

भारतीताईंनी पर्याय उत्तम दिलाय

नवखे /वेगळे वृत्त हाताळले(प्रयत्न केलात :))हे मात्र स्तुत्यच आहे ताबद्दल अभिनंदन

सगळ्यांचे आभार.
भारतीजींचे विशेष आभार.

अनेक प्रतिसाद गझलेला नसून माझ्या प्रतिसादांना आहेत ह्यामुळे वाईट वाटले.
तेही मी व्याकरणात सूट घेतली हे मान्य केल्यावरही.

एक किस्सा सांगतो.
नेमके आठवत नाही मात्र एकदा शायर हनीफ सागर अगोदर केलेल्या विधानाशी विसंगत विधान करीत होते.
मी हे लक्षात आणून दिल्यावर उत्तर देताना सागरसाहेब हसत-हसत म्हटले मेरे मुंह में खुदा हो जैसे
अर्थात तोंडातून निघालेला उदगार म्हणजे अंतिम सत्य थोडेच असते.
कवी वावरताना माणूसच असतो.

एखादे बिकट वृत्त मराठी गझलेत popular व्हावे ह्यात काय गैर आहे.
प्रामाणिकपणे ज्याने-त्याने विचार करावा की किती लोकांना हे वृत्त माहीत होते.
उल्हासजींसारखे फारच थोडे: काहीतरी नवे माहीत होतेय वा शिकायला मिळते तर कोणताही अहंभाव वा संकोच न ठेवता विचारावे-शिकावे ही वृत्ती फार भावली. हे निश्चितच शिकण्यासारखे आहे.
अजून सांगायचे म्हटले तर एखाद्या वृत्तात लिहिले नाही तर कसे समजणार की त्यात आपण comfortable आहोत की नाही.

धन्यवाद.

समीर

समीर याच वृत्तात काल आम्ही एक गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पाहशील का? आम्हाला हे वृत्त ठाऊक नव्हते! पण परत परत गुणगुणल्यावर तिच्यातील लय कळली व तिची गोडीही भावली!
गझलेचा मतला आहे...........
अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?
अजून थेट मला पाहतात लोक कुठे?

हिंदीत एक गझल आहे ती बहुतेक या वृत्तात आहे का?
झुकी झुकीसी नजर बेकरार है कि नहीं
दबा दबासा सही दिलमें प्यार है कि नहीं?

ही गझल गुणगुणल्यावर आम्हास या वृत्तात गझल लिहिणे सोपे गेले!
टीप: सदर गझल काल आम्ही एकटाकी लिहिली, परमेश्वर कृपेने!
तुझी मते कळवशील का? वाचायला आवडेल!

वैभवा, तुझी गझल वाचली!
एका गुरूचे २लघु ब-याच ठिकाणी वापरल्याने वृत्तात ओबडधोबडपणा जाणवला
शेरांचे आशय दिलखेचक वाटले नाहीत!