मराठी गजल

वैश्विक खाज नाही

Submitted by अभय आर्वीकर on 19 April, 2015 - 03:37

वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

- गंगाधर मुटे ’अभय’

पाश तोडावे कसे?

Submitted by मुग्धमानसी on 30 January, 2015 - 05:07

रोज मी पुसते तिथे ते खोल रुजलेले ठसे...
उगवते तरिही तिथे जे... त्यास उपटावे कसे?

बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली
पण चुका अपराध हे पदरात मी घ्यावे कसे?

शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?

लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?

राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्‍या कुणाचे पाश तोडावे कसे?

आनंदी आयुष्याची एखादी ओळ..

Submitted by दुसरबीडकर on 9 November, 2014 - 09:06

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!

शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

हे असे आभासवाणे चांदणे(तरही)

Submitted by दुसरबीडकर on 12 October, 2014 - 22:26

तरही गझल...
मूळ मिसरा आदरणीय गझलकारा संगिताताई
जोशी ह्यांचा...!!
'हे असे आभासवाणे चांदणे आता नको..'

स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा..
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!!

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

अमेठीची शेती

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2014 - 13:46

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

टिकले तुफान काही

Submitted by अभय आर्वीकर on 27 December, 2013 - 14:06

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

बर्याचवेळा...

Submitted by दुसरबीडकर on 30 November, 2013 - 13:34

बर्याचवेळा..

भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..!!
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!

देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!

ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!

व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!

त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!

खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

गजल

Submitted by दुसरबीडकर on 30 November, 2013 - 03:56

कोठुनी शिकले असे हेे विस्तवाने?
आतल्या आतून जळते मन पहाने..!!

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने?
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..

Pages

Subscribe to RSS - मराठी गजल