धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
७ वर्षापुर्वी मी जेव्हा नुकताच मायबोलीवर आलो होतो.तेव्हा मायबोलीच्या माध्यमातूनच जमलेले एक टोळके भटकंती करायला जात असत... खरे तर याबद्दल आधी माहितच नव्हते पण नंतर मायबोलीवर नुकतीच ओळख झालेल्या इंद्रधनुष्य (इंद्रा) ने या ग्रुपबद्दल सांगितले.. दुर्दैवाने मला कधी त्यांच्याबरोबर जाणे जमले नाही.. जिएस, दिनेशदा, गिरिराज, आरती इत्यादी मंडळीबरोबर भटकंती करायची राहूनच गेली..
आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा...
१५.०७.२०१२
जून महिन्यात सुधागड परिसरात नाणदांड घाट - सुधागड ट्रेक केल्यानंतर जुलै महिन्यात कुठला ट्रेक करायचा हे ठरत नव्हते. ऑप्शन बरेच होते पण घाटवाट करायची म्हणजे जुलै महिना तसा गैरसोईचाच कारण ह्याच दिवसात वाटांवरचे गवत एवढे वाढते कि बस... पण शेवटी लाँग पेंडीग मध्ये असलेला मढे घाट आणि त्याला जोडून असलेला उपांड्या घाट करायचे असे ठरवले. ग्रुप मध्ये सर्वांना मेसेज टाकले पण बर्याच जणांना जमत नव्हते तरीही १२ जण जमलेच. मिपावर पण काही जणांना विचारले होते पण कोणाला जमत नव्हते पण अनपेक्षितरीत्या पिंगुचा "मी येतोय" असा रिप्लाय आला.
______________________________