७ वर्षापुर्वी मी जेव्हा नुकताच मायबोलीवर आलो होतो.तेव्हा मायबोलीच्या माध्यमातूनच जमलेले एक टोळके भटकंती करायला जात असत... खरे तर याबद्दल आधी माहितच नव्हते पण नंतर मायबोलीवर नुकतीच ओळख झालेल्या इंद्रधनुष्य (इंद्रा) ने या ग्रुपबद्दल सांगितले.. दुर्दैवाने मला कधी त्यांच्याबरोबर जाणे जमले नाही.. जिएस, दिनेशदा, गिरिराज, आरती इत्यादी मंडळीबरोबर भटकंती करायची राहूनच गेली..
आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा...