तो दिवस मला आजही लक्षात नाही. ती वेळ मला आजही आठवत नाही. 'यंदाचा सह्यमेळावा केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा' हा वरकरणी साधाच प्रश्न कुणीतरी वॉट्सअॅप गृपवर पोस्ट केला आणि 'हर हर महादेव!'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना! वॉट्सअॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता.