चौल्हेर पिंपळा - सह्यमेळावा..!
मुंबई पुण्यातून एकेक बस भरून नाशिकच्या दिशेने सुटलेली.. नेहमीप्रमाणे प्रदीर्घ चर्चा झाडून, तारखा पाडून एकदाचा योग जुळून आला होता.. निमित्त सह्यमेळावा.. हेतू एकच.. नेहमी फक्त मोबाईल, इंटरनेट माध्यमातून होणाऱ्या भटकंती गप्पा प्रत्यक्षात भेटून मारायच्या..एकत्रीत ट्रेक करून आनंद लुटायचा.. पाऊस हवा म्हणून जुलै महिन्यात ठरवलेला यंदाचा हा तिसरा मेळावा.. ! आमचे सीएम उर्फ सह्यद्रीमित्र ओंकार ओक ने सुचवलेले ठिकाण सगळ्यांनी अगदी संसद भवनात शोभतील असे मुद्दाम आढेवेढे घेऊन मगच डनडनाडन केले.. आणि हतबल झालेल्या सीएम ने शेवटी मनातून शिव्या घालत 'चौल्हेर- पिंपळा' या आडवाटेवरील गडांवर शिक्कामोर्तब केले !