सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा
रात्रभर प्रवास करून तिळवण गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. पहिला अर्धा तास बसमधून खाली उतरून शाळेच्या पटांगणात जमण्यातच गेला. त्यातच सर्व ट्रेकर मंडळींच्या नजरा 'वेगळ्याच पण अपेक्षित' ठिकाणाचा शोध घेत होत्या. अखेर, तसे ठिकाण काही सहजी सापडले नाही. (सह्याद्रीमधल्या अनेक गावांमध्ये अजूनही 'होल वावर इज अवर' हीच प्रथा सुरू आहे). अखेर शाळेच्या पटांगणात गोलाकार उभे राहून एक ओळखपरेड झाली.
माझा पहिलाच मेळावा असल्यामुळे सूनटून्या, मनोज, कुशल या दिग्गजांना 'याचि देही याचि डोळा' पाहून घेतलं. गेल्या काही वर्षांत आपले ट्रेक फार म्हणजे फारच कमी व्हायला लागले आहेत, ही जाणीव टोचलीच. आमची काहीशी औपचारिक ओळखपरेड सुरू असताना पटांगणातल्या घसरगुंडीवर ज्युनिअर ट्रेकर्सनी ओळख बिळख बाजूला ठेवून ठिय्या मांडला होता. लहान मुलांचं हे एक बरं असतं, ओळख वगैरे काही लागत नाही.
तिळवणमधली ही सुंदर शाळा -
तेवढ्यात चहा-पोह्यांची व्यवस्था ज्यांनी केली होती, ते विष्णू गुंजाळ भेटायला आले. त्यांनी तर चहा-नाष्ट्याचे पैसे घ्यायलाही नकार दिला होता. ('नाष्ट्यासाठी तीस लोकं काही आम्हाला जड नाहीत' - हे उत्तर!) हल्ली बर्याच किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावांमध्ये ट्रेकर्स आणि पर्यटकांची अक्षरशः लूट सुरू असते, त्यात हा अनुभव म्हणजे सुखद धक्काच! पण आम्ही मात्र खाल्या पोह्यांना जागून त्यांचे मानधन त्यांना दिलेच. मग चविष्ट पोहे आणि फक्कड चहा झाल्यावर आमच्या 'यजमानां'सोबत एक फोटोसेशन झाले.
नंतर ओंकारने 'बस चौल्हेरचा चढ जिथून सुरू होतो, त्या वाडी चौल्हेरमध्ये पार्क केल्या जातील' अशी घोषणा केली. गावातून दोन वाटाडे सोबत आले होते. तिळवणमधून दिसणारा किल्ले चौल्हेर -
बागलाण आणि नाशिक जिल्ह्याचा उत्तर-पश्चिम भाग म्हणजे आभाळात घुसणार्या सुळकाधारी/शिखरधारी किल्यांचे गोकुळच आहे. सह्याद्रीचं आगळं वैभव असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन पर्वतरांगा स्वतंत्रपणे दिसतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आधी सातमाळा रांग आणि नंतर सेलबारी-डोलबारी रांग. या दोन रांगांच्या मधल्या भागातही काही किल्ले स्वतंत्रपणे वसलेले आहेत. चौल्हेर हा त्यातलाच एक. चौल्हेर या किल्ल्याची चौरगड, तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला अशीही नावे आहेत. चौल्हेरची उंची साधारण ११२५ मीटर (३७०० फूट). गड चढायला सोपा असला तरी काही ठिकाणी अंगावर येणारा चढ आहे. हा किल्ला तत्कालीन स्वराज्यात असला तरी छत्रपतींनी बांधलेला मात्र नाही. सुरतेच्या स्वारीच्या काळामध्ये थोरले राजे या किल्ल्यावर आले होते, अशी माहिती स्थानिक वाटाड्याने पुरवली.
सामुहिक वर्गणीतून या वर्षी हॅट घेण्यात आल्या होत्या. या कामी हिमांशू कुलकर्णी यांनी बरीच मेहनत घेतली. (त्याबद्दल मंडळाकडून त्यांचे आभार!) हॅटवाटपाचा कार्यक्रम पार पडल्यावर गड चढायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे बच्चेकंपनी सगळ्यात पुढे! पायांबरोबरच जिभेकडेही (चघळण्याचे) काम होते. पवन'काका'ने आणलेल्या इमल्या पोरांना (आणि थोरांनाही) फारच आवडल्या.
दोन तासात वर पोचलो. गडाचा दरवाजा प्रत्यक्ष समोर गेल्याशिवाय वाटेवरून कुठूनच दिसत नाही.
किल्ल्याचा मुख्य दरवाजाच्या आतून घेतलेला फोटो -
फोटो काढल्याशिवाय हलायलाच तयार नाहीत मंडळी -
गडावर मोती टाक्याचे अप्रतिम चवीचे गारेग्गार पाणी प्यायलो आणि तिथेच खाण्याच्या पुड्या सोडल्या. काही मंडळी सकाळपासून अपूर्ण राहिलेले 'कार्य' करायला धावली. अर्ध्या पाऊण तासाने गड फिरायला निघालो. गड तसा छोटाच. मुख्य दरवाजातून वर गेल्यावर डाव्या आणि उजव्या हाताला गडाचे दोन भाग आहेत. डाव्या हाताला पठार आणि उजव्या हाताला गडमाथा. त्या वाटेवर पोटात मोती टाके. फक्त याच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाक्याच्या शेजारी अजून एक टाके आहे. त्यातले पाणी गहिरे हिरवट पिवळे असले तरी पिण्यायोग्य नाही.
गडमाथ्यावरून काय सुरेख नजारा दिसतो! जवळजवळ अख्खी सातमाळा रांग (हातगड व अचला वगळून) - धुरकट का होईना, पण दिसते. केवळ अप्रतिम व्ह्यू! वातावरण स्वच्छ नसल्यामुळे यातले अनेक किल्ले धूसर दिसले, पण एवढी विस्तृत रांग एका ठिकाणाहून बघणे हा आनंद औरच होता. एका बाजूला सातमाळ रांग तर दुसर्या बाजूला डोलबारी-सेलबारी रांग.
चौल्हेरवरून कुठले कुठले किल्ले दिसतात हे 'ओंकारून' पाहिल्यावर त्याने काही सेकंदात यादीच दिली - अजमेरा, साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, भिलाई, प्रेमगिरी, इंद्रमाळ डोंगर, सप्तशृंगीगड, मार्कंडेय, रवळ्या-जावळ्या, धोडप, लेकुरवाळी, हंड्या, कांचना, बाफळ्या, शिंगमाळ, कोळधेर, राजधेर, इंद्राई आणि पुसटसा चांदवड! आणि नुसती यादीच देऊन थांबला नाही, तर तिथे प्रत्यक्ष हे किल्ले दाखवलेही! हा एवढा विस्तीर्ण नजारा चौल्हेरवरून दिसतो.
चौल्हेरच्या जवळ पूर्वेकडे 'दीर-भावजय' या नावाचे वैशिष्ट्यपूर्ण सुळकेही दिसतात. (सुळक्यांना ह्या नात्याची नावे ऐकून 'कुछ तो गडबड है दया' असं मी स्वतःशीच म्हणून घेतलं).
हेच ते दीर-भावजय सुळके -
सातमाळ रांग समजावून देतांना नाशिकनिवासी दुर्गभ्रमणाधिपती रा. रा. हेमंत पोखरणकर उर्फ हेम -
अखेर आपले नाशिक जिल्ह्यातले फार म्हणजे फार कमी किल्ले बघून झालेत ही जुनी वेदना जागी झाल्यावर मुकाट माघारी फिरलो.
गडाच्या दक्षिणेकडील पठार (हाही गडाचाच भाग आहे) -
चौल्हेरच्या शेजारी असलेला हा कोथमिर्या डोंगर - ('डूबा'वरून राजगडचा बालेकिल्ला असाच दिसतो, नाही का?)
गडाच्या दुसर्या बाजूकडील पठाराच्या टोकापाशी असणारा सरळसोट कडा छाती दडपून टाकतो. तो अनुभव मनसोक्त घेऊन साडेबारा वाजता उतरायला सुरूवात केली.
काहीसा खडा आणि ''स्क्री''युक्त उतार उतरून वाडी चौल्हेरपर्यंत येईपर्यंत दोन वाजले. जेवणाची सोय सटाणा गावात एका खानावळीत केलेली होती. (तिळवण-सटाणा अंदाजे १३ किमी). वाटाड्याचे मानधन सुपूर्द करून बसेस सटाण्याच्या दिशेने निघाल्या. वाटेत कुठल्याशा वाहनामुळे जखमी झालेला शॅमॅलिऑन विव्हळत असलेला दिसला. त्याला पाणी पाजून राजेशने झाडीमध्ये सोडले. जाताजाता तशाही अवस्थेत त्याने रंग बदलून दाखवत आमचे आभार मानले (असावेत).
सटाणामधील 'आमंत्रण'चे जेवण केवळ अप्रतिम! भुकेल्या पोटी किती जास्त जेवलो ते आठवतच नाही. पुढचं डेस्टिनेशन होते - देवलाणा येथील प्राचीन मंदिर! सटाणापासून अंदाजे १६ किमी वर सटाणा-अजमेरसौंदाणे रस्त्यावर देवलाणा नावाच्या गावामध्ये एक हेमाडपंथी मंदीर असल्याची माहिती सकाळपासून आमच्यासोबत असणार्या 'दुर्गवीर' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. इथपर्यंत आला आहात तर ते मंदिरही बघाच असा आग्रहही केला. (अजिबात कष्ट नाहीयेत कारण मंदिराच्या दरवाजापर्यंत बस जाते, असा दिलासाही दिला). मग 'एकमताने' ते मंदिर बघायला निघालो. अजमेरसौंदाणे गावाचे रहिवासी असणार्या किशोर सोनावणे यांना 'दुर्गवीर'च्या कार्यकर्त्यांनी बोलावून आणले होते. त्यांनी अतिशय प्रभावीपणे मंदिराची माहिती दिली. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. खरं सांगायचं तर तो प्रत्यक्ष तिथे जाऊन बघण्याचाच विषय आहे) देवलाणा मंदिराची भेट ही सह्यमेळाव्यातली रन टाईम व्हॅल्यू अॅडिशन होती.
मंदिराच्या आवारात 'दुर्गवीर' संस्थेच्या बागलाण शाखेच्या प्रमुखांसोबत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत थोडावेळ गप्पा झाल्या. दुर्गवीर प्रतिष्ठान (मुंबई) ही संस्था दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी कार्यरत आहे. रायगड संरक्षक प्रभावळीतील ९ गडांचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम संस्थेमार्फत केले जाते. या अंतर्गत सुरगड, अवचितगड, मानगड या गडांवर गडाची डागडुजी, पाणी टाके साफसफाई, माहिती व दिशादर्शक फलक, गडाची स्वच्छता राखणे अशी बरीच कामे केली जातात. सोबत या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात शाळेमध्ये शालेय वस्तू वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेली ८ वर्ष दुर्गवीर प्रतिष्ठान आपले मराठी सण श्रमदान करत असलेल्या गडाच्या सहवासात करत आहे. (संदर्भ - http://www.durgveer.com/amchi_olakh.html)
नुकतीच या कार्यकर्त्यांनी साल्हेर किल्ल्यावर श्रमदान करून टाकीस्वच्छता, साल्हेरवाडीतून येणार्या वाटेची दुरुस्ती केली आहे. आमच्या या सह्यमेळाव्याच्या नियोजनामध्ये या बागलाण शाखेतील कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली. राहण्या-जेवण्याचे नियोजनापासून ते पूर्ण दिवसाचा वेळ आमच्यासाठी देण्यापर्यंत त्यांचं सहकार्य होतं. याबद्दलची कृतज्ञता आणि त्यांच्या दुर्गसंवर्धनाच्या कार्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्व उपस्थित सह्यभटक्यांतर्फे एक छोटीसं पाकीट त्यांच्याकडे सुपूर्द केलं.
'दुर्गवीर' बागलाण शाखेचा प्रमुख सागर सोनावणे माहिती देताना - (पदरमोड करून हे कार्यकर्ते दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहेत. कुठल्याही राजकीय आधाराविना हे कार्य करायचा यांचा मानस आहे). शेजारी आमचे लाडके सीएम उर्फ ओंकार ओक उर्फ ओंकिपीडिआ उर्फ गूगलोंकार -
या मदतीवरून आठवलं, काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीच्या आजाराबद्दल आणि मदतीबद्दल आवाहनाची पोस्ट आम्ही फेसबुक आणि इतर सोशल मिडिआवरून प्रसिद्ध केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे, त्या आवाहनाला तुडुंब प्रतिसाद मिळाला. त्यात अनेक ज्ञात-अज्ञात 'मायबोली'करही होते. एकूण एक लाखांहून अधिक रक्कम जमा झाली होती. त्या रकमेचा हिशेब आणि त्या चिमुरडीच्या पालकांचा कृतज्ञतापर संदेश सुनील पाटील याने कथन केला.
त्या दिवशीचा सूर्यास्त बसमधूनच पाहिला. सुरेख रस्ता, आजूबाजूला तुरळक लोकवस्तीची गावे, अधूनमधून दिसणारे शेळ्या-गुरांचे कळप, हळूहळू अंधारात अदृश्य होत चाललेले सह्याद्रीमधले कातळसुळके. कातरवेळेइतकी रम्य वेळ संपूर्ण दिवसात क्वचितच येत असेल. ही वेळ अशी असते की जी स्वतःसोबत(च) घालवावीशी वाटते. त्यादिवशी बसमध्ये मात्र वेगळाच नूर होता. दिवसभराच्या धावपळीमुळे बच्चेकंपनी कंटाळली होती. त्यात बसमध्ये टीव्ही दिसल्यावर तो चालू करण्याची फर्माईश झाली. डायवरने स्क्रीन ऑन केल्यावर एक उत्स्फूर्त कॉमेंट आली - "आता फक्त लग्नाची कॅसेट लावू नका". कॉमेंट करणार्याचे वय फक्त सहा वर्षे असून तो 'मल्ली'पुत्र रूद्राक्ष आहे हे कळल्यावर अख्खी बस हास्यात बुडाली. बच्चेकंपनीने संपूर्ण ट्रेकभर अशाच कॉमेंट्स करून हास्याचे धबधबे उडवले. (सगळ्याच कॉमेंट्स इथे लिहित नाही, पण नवीन पिढी इज व्हेरी स्मार्ट हं!)
देवलाणेहून पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला - 'सावरपाडा'ला, पोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. सावरपाड्यामध्ये रमेश ठाकरे आणि मित्रपरिवाराने जेवायची सोय केली होती. मुक्कामाला गावातली शाळा आणि शाळेसमोरचे मंदिर असा ऐसपैस मामला होता. शाकाहारी मंडळींसाठी वांगे-बटाटा रस्सा आणि सामिषपंथी मंडळींसाठी चिकनरस्सा असा बेत होता. जेवल्यानंतर अनेक विषयांवरची चर्चासत्रे आखलेली होती. त्यात आशुचे 'सायकलवरून पुणे ते कन्याकुमारी'चे अनुभव, सूनटून्याने आणलेल्या इक्विप्मेंट्सची माहिती, आहारातील तीन मुख्य शत्रूपदार्थांबद्दल हेमकडून अधिक वर्णन, असे अनेक खास मेळाव्यासाठी राखून ठेवलेले विषय होते. पण आदल्या रात्रीची अपुरी झोप, चौल्हेरची चढ-उतार आणि देवलाणेची सफर यामुळे बच्चेकंपनी तर कंटाळलेलीच होती, पण त्यांच्या जोडीला मोठी मंडळीही पेंगायला लागली. अखेर मंदिरामध्ये निवडक ट्रेकर्सच्या सहभागामध्ये "सह्यमेळावा: काल, आज आणि उद्या" याबद्दलचे चर्चासत्र तेवढे पार पडले. चर्चासत्र सुरू झाले तेव्हा मी जागा होतो. नंतर शास्त्रीय मैफलींमध्ये ब्याकग्राऊंडला जशी संवादिनी वाजत असते, तसा इथेही काहीतरी सूर हवा म्हणून झोपून गेलो. पुढचे काहीच आठवत नाही. रात्री उशीरा केव्हातरी सत्र संपले. रात्रभर प्रचंड वारे वाहत होते. मधूनच गावातली कुत्री भुंकत होती. बाकी सर्वत्र शांतता. सह्यमेळावा - दिवस पहिला यथासांग पार पडला होता. उद्याचे ध्येय होते - किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा!
(क्रमशः)
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2015/07/blog-post_4.html)
पहिल्या दिवसाचा वृत्तांत अगदी
पहिल्या दिवसाचा वृत्तांत अगदी मस्तच ….
@ "आता फक्त लग्नाची कॅसेट लावू नका"
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त वृतांत! पु.भा.प्र.
मस्त वृतांत!
पु.भा.प्र.
मस्त वृतांत !! "आता फक्त
मस्त वृतांत !!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"आता फक्त लग्नाची कॅसेट लावू नका" >>
मस्त रे मी खुप काही मिस्स
मस्त रे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी खुप काही मिस्स करतो आहे
भारी सुरुय. रुद्र आणि
भारी सुरुय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुद्र आणि मल्ल्याची उर्जा अफाट आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्यांच्याकडे पाहुन वाटत नाही हे एवढे दन्गेखोर असतील अस.
लै भारी रे ......
लै भारी रे ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नची वृत्तांत झकास... अगदी
नची वृत्तांत झकास... अगदी सविस्तर लिहित आहेस. मस्तच
@ "आता फक्त लग्नाची कॅसेट लावू नका" >>
मी खुप काही मिस्स करतो आहे >>> ह्ह्म्म्म
मस्त रे .... भट्टी मस्त जमली
मस्त रे .... भट्टी मस्त जमली आहे ... असेच पटापट येऊ दे पुढ्चे भाग.
'दीर-भावजय' या नावाबद्दल वाटाड्याने सांगितलेली माहिती:
कधि ते नक्की महिती नाही पण बर्याच वर्षांपुर्वी घडलेली गोष्ट. त्या डोंगराच्या पायथ्याशी शेतात काम करणारा शेतकरी आपल्या दुपारच्या जेवणाची वाट बघत होता. त्याची बायको रोज दुपारी त्याच्या साठी जेवण घेऊन येत असे. पण त्यादिवशी खुप उशीर झाला तरी ती आली नव्हती. खुप वेळाने शेतात काम करता करता त्याला पाठीमागे चाहुल जाणवली..... बायको जेवण घेऊन आली असे समजुन त्याने तिला उशिरा आल्या बद्दल शिव्या द्यायला सुरवात केली ... नाही नाही ते बोलला.. पण बायकोने काही उत्तर दिले नाही .... बायको काही बोलत का नाही हे बघण्या साठी त्याने मागे मागे वळुन बघितले तर त्याची बायको आलीच नव्हती.... जी आली होती ती त्याची "भावजय" होती... आपण भावनेच्या भरात आपल्या भावजय ला नको ते बोललो याची टोचणी त्या शेतकर्याच्या मनाला लागली. तो तडक बाजुच्या डोंगरावर गेला आणि त्याने तेथुन जिव दिला आणि नकळत का होईना आपल्यामुळे आपल्या "दिराला" जिव द्यावा लागला हि गोष्ट भावजय च्या मनाला लागली म्हणून तिनेही त्याच डोंगरा वरुन जिव दिला. म्हणून त्या डोंगराला "दीर-भावजय" चा डोंगर असे नाव पडले.
झकास ओघवता वृत्तांत.....
झकास ओघवता वृत्तांत.....
शागं, अगदी मस्त आणि
शागं, अगदी मस्त आणि appropriate लोककथा आहे...
मस्त लेख नची त्या भन्नाट
मस्त लेख नची त्या भन्नाट दिवसाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'दीर-भावजय' या नावाबद्दल
'दीर-भावजय' या नावाबद्दल वाटाड्याने सांगितलेली माहिती>>
प्रश्न असा पडतो की जर त्या दोघांनी त्या घटनेनंतर जिव दिला तर मग ही घटना अश्याप्रकारे घडली हे कसं कळलं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तच. लग्नाची कॅसेट पुलेशु.
मस्तच. लग्नाची कॅसेट![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पुलेशु.
मस्त लेख !
मस्त लेख !
भारीच! लग्नाची कॅसेट
भारीच!
लग्नाची कॅसेट![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त वृतांत !
मस्त वृतांत !
भारी नचि.. मस्त लिव्हलयस..
भारी नचि.. मस्त लिव्हलयस..
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलय फोटो एकदम झक्कास
मस्त लिहिलय फोटो एकदम झक्कास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं वृ मल्लीपुत्राची कमेन्ट
मस्तं वृ
मल्लीपुत्राची कमेन्ट एकदम भारी.... ज्युनिअर कट्टर लगे रहो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खूपच छान वृतांत. फोटोसुद्धा
खूपच छान वृतांत. फोटोसुद्धा मस्तं. पुढच्या भागाची वाट बघतेय.
छान वृत्तांत नचिकेत!! लगे
छान वृत्तांत नचिकेत!! लगे रहो, पुढचा भाग कधी?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नचिकेत, वेलकम पुन्हा एकदा
नचिकेत, वेलकम
पुन्हा एकदा ह्या भट्कंतीच्या मायाजालात स्वागत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खर तर सर्व भाग लिहून झाल्यावर प्रतिसाद देणार होते पण .....
मस्त जमलेत दोन्ही भाग..... ब्रेक नंतर येऊनही तुझा लिखाणाचा बाज तसाच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे सगळ्यांना नाही जमत.
आता पुढच्या भागाची प्रतिक्षा -----
आणि तुला अजुन भट्कंती करण्याची "खुमखुमी" येतच राहो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मनापासुन शुभेच्छा -- लिखणालाही आणि भटकंतीलाही
मस्त वृत्तांत!! प्रचिही
मस्त वृत्तांत!! प्रचिही सुरेख!!
मस्त मस्त वृत्तांत!
मस्त मस्त वृत्तांत!
नचि, वृत्तांत आणि फोटो एक
नचि, वृत्तांत आणि फोटो एक नंबर!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लग्नाची कॅसेट![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)