धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
आधी पोळणा-या उन्हांमुळे आणि आता धों-धों पावसामुळे, सह्याद्रीतल्या अनवट घाटवाटांचे ट्रेक्स करणं अवघड होऊन बसलेले.. आखडलेले पाय, धूळ खात बसलेली ट्रेकची पाठपिशवी अन् रोजच्या रूटीनमुळे आलेला अशक्य कंटाळा!!!
अरे अरे, इतकं काही वैतागायची गरज नाहीये.. खास धुवांधार पावसातही हुंदडायला उत्तम, अश्या घाटवाटा आहेत की. चला तर मग आपल्या राजगड-तोरणा किल्ल्यांजवळच्या ‘मढेघाट’ अन् ‘उपांड्या’ या घाटवाटांच्या भटकंतीला...
मढे अन् उपांड्या घाटवाटांना भेट द्यायची असेल, तर स्वतःचं वाहन सोबत असलेलं सोयीस्कर पडेल. पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट अश्या कुठल्याही मार्गे ‘वेल्हे’ गाव गाठायचं. ‘इस्पेशल चाय’चे घोट घेत गावापाठीमागे ढगात हरवलेल्या दुर्ग तोरण्याचा अंदाज घ्यायचा. पुढे ‘केळद’ गावचा गाडीरस्ता तोरण्याला प्रदक्षिणा घालत संथ निवांत वळणं घेतो. उजवीकडे गुंजवणी धरणाजवळ भू-आमरीच्या नाजूक गालिच्याचं कवतिक न्याहाळायचं.
उभ्या चढाचा झाडीभरल्या खिंडीतला रस्ता चढला की, जाधववाडीच्या धारेवर भर्राट वारा गारठवून टाकतो. पुढे पासली गावापासून सरळ गेल्यावर, छोटा घाट चढून गाडी केळद गावी पोहोचते. पाठपिशवीत पाणी-फळं-खाऊ असा सकस आहार, पायात उत्तम पकड देणारे बूट आणि अंगात पावसाळी जर्किन असा अवतार घेऊन, आपण कुडकुडतंच कारच्या उबेतनं बाहेर पडतो. आणि, सुरुवात होते आपल्या पावसाळ्यातल्या घाटवाटांच्या ट्रेकची!!! (गावात गाईड अन् जेवणाची व्यवस्था होवू शकेल.)
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
केळद गावाबाहेर वेळवन नदीवरचा पूल ओलांडून मढेघाटाकडे मोकळ्या-ढाकळ्या रस्त्यानं निघायचं. पाऊस आता ताडताड-ताडताड कोसळू लागला असतो. खरंच एवढ्या पावसात ट्रेक करायचांय का, हा विचार सतरा वेळा डोक्यातून काढून टाकायचा.
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
मढे घाटापाशी आसमंत दाट धुकटात हरवून गेला असतो. खळाळणा-या ओढ्यातून पलीकडे आलो, की आपण सह्याद्रीच्या धारेजवळ आलेलो असतो.
एका पाठोपाठ एक असे ढगांचे लोट सह्याद्रीच्या कातळमाथ्यांना धडकत राहतात. कोण्या एका मोठ्ठ्या धबधब्याचा ध्रोन्कार घुमू लागला असतो. पण ‘लक्ष्मी’ नावाचा हा धबधबा अजून तरी दिसला नसतो.
अन् मग अवचितंच आलेल्या वा-यामुळे ढगांची दुलई दूर सारून मढे घाटाची झाडीभरली घळ अन् धबधब्याचं सुरेख दर्शन होतं.
निसर्गाच्या या स्वच्छंद रूपाचं जवळून दर्शन घेण्याचा मोह आवरत नाही. धबधब्यापाशी जायचं, अर्थातंच व्यवस्थित काळजी घेऊन. पावसाचे बाण अन् पाण्याचे तुषार मुक्त उधळले असतात. मुक्तपणे कित्येक फूट खोल हिरव्याकंच दरीत झोकून देणा-या पाण्याचा मनस्वी हेवा वाटतो.
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
...मढे घाटात पावसाळी पर्यटनाच्या नावावर चालू झालेली बेताल पर्यटकांची जत्रा, तळीरामांचा स्वैराचार अन् दारूच्या बाटल्यांचा खच मात्र अतिशय अस्वस्थ करून जातो...
...पुन्हा एकदा ढग दाटून येतात, पुन्हा एकदा धबधब्याचा फक्त दणदण आवाज आसमंतात भरून राहतो...
लक्ष्मी धबधब्याचं पठार अन् पल्याडचा कातळमाथा यांच्यामधल्या घळीतून मढे घाटवाटेची सुरुवात आहे. ढग दाटले असले, तरी दगडां-धोंड्यांवरून अन् झाडा-झुडुपांमधून उतरणारी प्रशस्त वाट शोधणं अगदी सोप्पं आहे.
कुठे एखाद्या खडकावर इवलुश्या मातीच्या आधारानं उमलेली रानफुलं पाण्यात निथळत गारठून गपचीप थरथरत असतात. त्याच्यावरचा पाण्याचा थेंब उडवला, की लगबगीनं दुसरा थेंब जमा होतो.
मढेघाटाची वाट धबधब्याशेजारून असली, तरी ती दाट कारवीच्या दाटीतून धुक्यातून वाट उभी उतरत जाते.
माथ्यापासून निघाल्यापासून १०० मी उतार उतरला, की लक्ष्मी धबधब्याचं रौद्र रूप सामोरं येतं. दणदण आदळणा-या पाण्याचा आवाज, भोवतीचा गर्द दाट रानवा, पावसाच्या सरीसोबत धाडधाड वाढणारं पाणी, अंगात हुडहुडी भरवणारी थंडी - असा जबरदस्त माहोल!
इथून रानातून अजून १०० मी उतरल्यावर सपाटीवर – सह्याद्रीच्या पदरात पोहोचते. पाऊस क्षणभर उणावतो, अन् पाठीमागे वळून पाहिलं, तर गाढवकडा – मढेघाट – लक्ष्मी धबधबा - उपांड्या घाट सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून उठून दिसत असतात. नितांत सुंदर नजारा!!
गाढवकड्याचा देखणा पहाड अन् त्याच्या आतल्या बाजूस दडलेला अजस्र्त केळेश्वर धबधबा जाणवतो.
आणि समोरंच मढेघाटाचा देखणा धबधबा अविरत कोसळताना दिसतो.
मढे अन् उपांड्या या दोघी सख्या घाटवाटा सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून निघतात तर मोठ्ठ्या तोऱ्यात स्वतंत्रपणे. पण वेगळं जाणं त्यांना फार काही जमत नाही. जेमतेम २०० मी उतरल्यावर सह्याद्रीच्या पदरात एकमेकींना बिलगतात, अन् ‘कर्णवडी’ गावात भेटतात. मढेघाटानं उतरल्यावर सपाटी लागली की पूर्वेकडे पदरातल्या बैलगाडीवाटेनं आडवं जायचं. वाटेतला मातकट ओढा पार करायचा..
मग लक्षात येतं, अरेच्चा हा तर आहे मढेघाटात भेटलेल्या धबधब्याचाच ओढा आहे..
चिखलाळलेली बैलगाडी वाट १५-२० मिनिटं तुडवली, की शेतातली दो-चार घरं लागतात. (टीप: इथून पुढे भटकंतीचा अजून एक पर्याय म्हणजे याच वाटेनं सरळ ‘कर्णवडी’ गावातून उतरून ‘रानवडी’ गाव गाठायचं. अन् डांबरी रस्त्यानं ८-१० किलोमीटरवर शिवथरघळ गाठायची.) भात-लावणीच्या दिवसात गावकरी शेतात विखुरले असतात, त्यामुळे उपांड्या घाटाची नेमकी वाट सांगायला कोणी भेटायची शक्यता कमी. त्यामुळे डावीकडे थंडगार विहीर ही आपली खुणेची जागा.
जवळपासच्या एखाद्या घरांचा आडोसा बघून दोन घास खाऊन घ्यायचे. पावसाची रानटी सर रानात कोसळत राहते. थोडं उणावलं की दूरवरच्या गाढवकड्यापासून मढे घाट अन् पुढे उपांड्या घाट, असा परत सह्याद्रीचा नजारा डोळ्यासमोर येतो...
ढगांचे लोट सह्याद्रीच्या भिंतीला धडका देऊ लागतात..
सह्याद्रीच्या भिंतीच्या वर जाण्यासाठी उपांड्या घाटाची वाट डावीकडच्या बेचक्यातून वर काढली आहे. पाईपशेजारून वाट उभी झपझप चढू लागते.
अवघ्या पाऊण तासात उपांड्या घाट चढून आपण सह्याद्रीमाथ्यावर पोहोचतो. परतीचा प्रवास सुरू झाला, तरी पावसाळ्यातल्या सह्याद्रीच्या घाटवाटांची दृश्यं डोळ्यांसमोरून हलत नसतात...
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्यांचे रान आले एका एका पानावर
आले जल गेले जल झाले जल आरपार
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
समर्थ रामदास स्वामींनी केलेल्या शिवथर घळीच्या वर्णनातल्या ओळी आठवाव्यात, असे एकसे बढकर एक धबधबे: "गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे.."
जाईन विचारित रानफुला ...
(प्र.चि. साभार - अभिजीत देसले)
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी माझ्या राजा रं
आमच्या मावळात ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ अश्या वर्षाधारा एका मागोमाग एक कोसळत राहतात...
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटांचा असा सुंदर ट्रेक केल्यानंतरही ट्रेकची धम्माल बाकी असते.. केळदमध्ये भेटतात जुने-नवे दर्दी आणि तज्ज्ञ ट्रेकर मित्र.. मायबोलीच्या सह्यमेळाव्यामुळे हा बोनस मिळाला असतो... सह्याद्रीतल्या थोडक्या क्षणांच्या भेटींनीही जुळणारे ऋणानुबंध आपल्या संगे कायम राहतात..
निवडक दहात!!!! अ प्र ति
निवडक दहात!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ प्र ति म!!!!!
फोटो, वर्णन, पाऊसगाणी सगळंच भन्नाट.
सुरेख फोटो ! डोळे अगदि निवले
सुरेख फोटो ! डोळे अगदि निवले !
अ प्र ति म!!!!! अरे इथूनच आपण
अ प्र ति म!!!!!
अरे इथूनच आपण गेलो ना रे...च्यायला यातल्या निम्या गोष्टी आपल्याला दिसल्याच नाहीत....
हे काय गौडबंगाल आहे
आशु, तुझं लक्ष लेकांत! साई,
आशु, तुझं लक्ष लेकांत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साई, एक्क्दम मस्त माहिती असलेला लेख आणि प्रचिसुद्धा झक्कास.
पुणे- केळद गाडीरस्ता अंतर किती?
मढेघाटानंतर शेवत्या घाट नां? मढेघाट उतरल्यावर शेवत्याच्या पायथ्यापर्यंत अंतर किती कोण सांगेल?
सुंदर फोटो! मस्त!
सुंदर फोटो! मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम फोटो! विहीरीचा फोटो
अप्रतिम फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विहीरीचा फोटो मस्तच आलाय.
मढेघाट उतरल्यावर शेवत्याच्या
मढेघाट उतरल्यावर शेवत्याच्या पायथ्यापर्यंत अंतर किती कोण सांगेल?
>>> ते तू मनोजला (स्वछंदी) विचार. तो घाटवाटांचा बाप माणुस आहे.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
DS... सुंदर वर्णन
DS... सुंदर वर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी प्रज्ञा१२३ वैद्यबुवा म
जिप्सी
प्रज्ञा१२३
वैद्यबुवा
मामी
श्री
इंद्रधनुष्य
खूप धन्यवाद मंडळी!!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशुचँप: अरे इथूनच आपण गेलो ना
आशुचँप:
हीच सह्याद्रीची गंमत आहे.. प्रत्येक दिवशी नवनवीन गुपितं उलगडतात...
अरे इथूनच आपण गेलो ना रे...च्यायला यातल्या निम्या गोष्टी आपल्याला दिसल्याच नाहीत.... हे काय गौडबंगाल आहे
>>
हेम:: पुणे- केळद गाडीरस्ता
हेम::
पुणे- केळद गाडीरस्ता अंतर ८० कि.मी.
मढेघाटानंतर शेवत्या घाट नां? मढेघाट उतरल्यावर शेवत्याच्या पायथ्यापर्यंत अंतर किती कोण सांगेल?
>>
केळद >> मढे घाट >> पडळकोंड गाव >> शिवथरघळ रस्ता >> उभी चढाई करून नाणेमाची >> शेवत्या गाव >> ३ तास शेवते घाट >> गुग्गुळशी गाव >> केळद असा १२ – १४ तासांचा ट्रेक आहे. (संदर्भ: मित्रवर्य - बंकापुरे)
धन्यवाद रे डिस! ह्यो दत्तू
धन्यवाद रे डिस!
ह्यो दत्तू ईडं कांम्हून नाय लिवत??????????
अहाहा ! हें इथं बघूनही किती
अहाहा ! हें इथं बघूनही किती बरं वाटलं !! धन्यवाद.
साई.. खूपच छान.. ! तुझ्या
साई.. खूपच छान.. ! तुझ्या लेखाची आवर्जून वाट बघत होतो.. मस्त ! त्या 'लक्ष्मी' धबधब्याचे अगदी जवळून दर्शन घ्यायचे राहूनच गेले..
ह्यो दत्तू ईडं कांम्हून नाय लिवत?????????? >> त्याला झाले सांगून बर्याचदा.. इकडे पण लिवत जा ! दत्तू हाय तो.. लै बिझी नि तितकाच आळशी मानूस.. एकीकडेच लिवतो !
बाकी शेवत्या घाट नि उपांडया घाट ह्या दोन घाटवाटांची एकाच ट्रेकमध्ये मैफील कशी घडवून आणायची हा प्रश्ण आहे
झकास!!!
झकास!!!
जबरदस्त फोटो....
जबरदस्त फोटो....
अप्रतिम प्रचि , धन्यवाद.
अप्रतिम प्रचि , धन्यवाद.
यो, तिच मैफिल कशी जमवायची
यो, तिच मैफिल कशी जमवायची याचं मंथन सुरु आहे. शेवत्या-मढे- उपांड्या- गोप्या- शिवथर ... एकच बार उडवायचा. नासिकवरुन पुणे प्रवास म्हणजे एक्क्दम बोर्र्र्र्र्र्र! गांवी जायला काय नाय वाटत, पण नासिक- पुणे प्रवास म्हणजे काटाच येतो अंगावर!
.. म्हणून..!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त फोटो.
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम वर्णन!!!! मढे घाटात
अप्रतिम वर्णन!!!!
मढे घाटात पावसाळी पर्यटनाच्या नावावर चालू झालेली बेताल पर्यटकांची जत्रा, तळीरामांचा स्वैराचार अन् दारूच्या बाटल्यांचा खच मात्र अतिशय अस्वस्थ करून जातो.>>>> +१
मस्त प्रचि आणि पाऊसगाणी
मस्त प्रचि आणि पाऊसगाणी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम कातिल मित्रा.... च्यायला
एकदम कातिल मित्रा....
च्यायला काय ऐश करता रे तुम्हि लोक...
मस्त फोटो, मस्त वर्णन ....
मस्त फोटो, मस्त वर्णन ....
खुपच छान
खुपच छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम ! फोटो आणि वर्णन
अप्रतिम ! फोटो आणि वर्णन दोन्हीही !
बाकी शेवत्या घाट नि उपांडया
बाकी शेवत्या घाट नि उपांडया घाट ह्या दोन घाटवाटांची एकाच ट्रेकमध्ये मैफील कशी घडवून आणायची हा प्रश्ण आहे>>>> हेम शेवत्या घाटाने चढुन, भोर्डी-केळद मार्गे उपांड्या घाटाने खाली उतरता येईल, पण बरीच मोठी तंगडतोड आहे ती....
धन्यवाद साई, उत्तम लेख आणि
धन्यवाद साई,
उत्तम लेख आणि उत्तम छायचित्रं...
यो आणि हेम,
अर्रे एकंच माहिती दोन्हीकडे देऊ शकत नाही दादानू … ह्यापुढे BlogPost ची URL इथे देत जाईन…![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोप्पं आहे … मढ्यातून उतरायच्या ऐवजी उपांढ्यातून उतर आणि कर्णवडी तून पुढे पडळकोंड ला जा ...आणि साईने वर उल्लेख केल्याप्रमाणे पुढे नाणेमाची ला जा ...
शेवत्या घाटाची माहिती साठी इथे टिचकी मारा :
http://www.bankapure.com/2013/06/AagyaNaal-MadheGhaat-ShevtyaGhaat.html
ट्रेकळावे,
तुप्यांचा दत्तू
www.bankapure.com
दत्तू, ती पोष्ट वाचली रे
दत्तू, ती पोष्ट वाचली रे आधीच! शेवत्या-मढे-उपांड्या-गोप्या सगळंच हाण्ता यील कांय येकाच टोल्यात ??
अर्रे एकंच माहिती दोन्हीकडे देऊ शकत नाही दादानू … ह्यापुढे BlogPost ची URL इथे देत जाईन…![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे ब्लोग्ज आहेत नि सगळे इथेही देतात. उरल पेक्षा लेखच टाकायचा इथे!
Pages