उपांड्या घाट - मढे घाट

Submitted by स्वच्छंदी on 6 September, 2012 - 07:53

१५.०७.२०१२

जून महिन्यात सुधागड परिसरात नाणदांड घाट - सुधागड ट्रेक केल्यानंतर जुलै महिन्यात कुठला ट्रेक करायचा हे ठरत नव्हते. ऑप्शन बरेच होते पण घाटवाट करायची म्हणजे जुलै महिना तसा गैरसोईचाच कारण ह्याच दिवसात वाटांवरचे गवत एवढे वाढते कि बस... पण शेवटी लाँग पेंडीग मध्ये असलेला मढे घाट आणि त्याला जोडून असलेला उपांड्या घाट करायचे असे ठरवले. ग्रुप मध्ये सर्वांना मेसेज टाकले पण बर्याच जणांना जमत नव्हते तरीही १२ जण जमलेच. मिपावर पण काही जणांना विचारले होते पण कोणाला जमत नव्हते पण अनपेक्षितरीत्या पिंगुचा "मी येतोय" असा रिप्लाय आला.

______________________________

सकाळी ५.३० वाजता स्वारगेट स्थानकावर आलो तेव्हा मुंबईहून येणारा सगळा ग्रुप आलेला होता. माझ्या बरोबर पुण्याहून येण्यार्‍या पिंगुला फोन केला तेव्हा तोही १० मिनिटात येतो म्हणाला. अरे.... आमचा सगळा ग्रुप एसटीच्या वेळे आधी हजर म्हणजे काहीतरी गडबड होती किंवा होणार होती.... आणि झालेही तसेच.
............................................

ठरवले असे होते कि १५ तारखेच्या रविवारी तोरण्याच्या पश्चिमेला असलेल्या मढे आणि उपांड्या घाटाचा ट्रेक करायचा. तोरणा आणि राजगड परिसरातून कोकणात उतरणारे बरेच घाट आहेत पण शिवथर परिसरात उतरणारे आणि महाड, बिरवाडी बंदरामुळे प्राचीन कालापासुन वाहते असणारे मढे आणि उपांड्या हे घाट ह्या घाटवाटांपैकी प्रमुख. त्यात तानाजी मालुसर्यांच्या घटने मुळे ह्या घाटाला अधिकच महत्व प्राप्त झाले. तसा मढे घाट हा खर तर त्याहून प्राचीन आहे. पूर्वापार कोकणच्या बंदरातून देशावर होत असलेल्या व्यापारात ह्या घाट वाटांना अनन्यसाधारण महत्व आहे आणी नाणे घाट, हातलोट घाट, देव (लिंग्या) घाट या आणी अश्या काहीच घाट वाटांवर असलेल्या बांधीव पायर्यांच्या खुणा मढे घाटात आहेत हे हा घाट तेवढाच प्राचीन असला पाहिजे हे सिद्ध करते. घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी गाव हे ह्या दोन्ही घाटांना जोडणारे असल्याने पुण्याहून एका दिवसात हे दोन्ही घाट सहज शक्य आहेत.
............................................

सगळा ग्रुप जमल्यावर सहज म्हणून स्थानकप्रमुखाकडे वेल्हा गाडीची चौकशी केली तर पहिला धक्का बसला. रविवारी म्हणे वेल्हा गाडी डेपो प्रमुखाच्या मर्जीवर सोडतात. म्हणजे कधी सोडतात तर कधी कॅन्सल. डेपोत जाउन चौकशी केली तर ज्याची भीती होती तेच झाले. म्हणे आज गाडी सोडायची नाही असे ठरले आहे.. Sad .. मग काय स्पेशल जीप करण्यापासून ते ट्रेक कॅन्सल करण्यापर्यंत सर्व शक्यतांचा विचार झाला. पण तेव्हढ्यात असे सुचले की मिळेल त्या बस ने नसरापूर फाट्यापर्यंत जाऊ आणि तिथे पाहु. आमच्या सुदैवाने भोरला जाणारी एक एसटी सुटतच होती, धावत पळत त्यात घुसलो आणि निघालो. नसरापुर फाटयावर उतरल्यावर एक जीपवाला वेल्ह्यात यायला तयार झाला आणि आम्ही वेल्हा एस्टीच्या अर्धातास आधीच वेल्ह्यात पोचलो. वेल्ह्यात पोचल्यानंतर अजुन एक जिपवाल्या बरोबर बोलणी करून, केळदची परतीची फेरी नक्की करून, केळदला गेलो आणी ट्रेक सुरु झाला... Happy

ह्या ट्रेक दरम्यान काढलेले काही फोटो...

वेल्ह्याकडे जाताना
१.

केळदकडे जाताना
२.

३.

केळद गाव
४.

केळद गावातून उपांड्या घाटाकडे जाताना
५.

केळदमधील भातांची खाचरे
६.

गाव सोडल्यानंतर लागणारा पहीला ओढा
७.

ओढा पार करून उपांड्याकडे जाताना
८.

९.

१०.

११.

उपांड्या घाट उतरताना
१२.

उपांड्या घाट अर्धा उतरल्यावर
१३.

घाटाच्या पायथ्याचे कर्णवाडी गाव. खरेतर घाट कर्णवाडी गाव उतरून तळातल्या रानवाडी गावापर्यंत जातो पण आम्हाला परत मढे घाट चढून यायचे असल्याने आम्ही कर्णावाडी पर्यंत गेलो.. ह्याच कर्णावाडीत आदल्या दिवशी मढेघात उतरून अजून एक मिपाकर जातिवंत भटका त्याच्या परसबाग उपक्रमाकरीता म्हणून येऊन थांबला होता पण त्याची आमची भेट केळदला झाली .
१४.

१५.

कर्णवाडीतून मढे घाटाच्या पायथ्याशी जाताना
१६.

कर्णवाडीतून दिसणारा उपांड्या घाट... फोटोत मध्ये दिसणारा इंग्रजी व्ही म्हणजेच उपांड्या घाट
१७.

१८.

मढे घाटाची सुरुवात
१९.

मढे घाटाचे अजून सौंदर्य.. घाटाच्या सुरुवातीला असलेला प्रचंड धबधबा. ह्याच धबधब्या साठी अनेक लोक मढे घाटात येतात. ह्या धबधब्याचे खालून पहीले दर्शन
२०.

मढे घाट चढताना
२१.

वाटेत लागणारा अजून एक छोटा धबधबा
२२.

घाटातल्या मुख्य धबधब्याचा खालून फोटो
२३.

२४.

ह्या धबधब्या जवळूनच वाट वर चढते आणी पठारा वर येते. ह्या धबधब्याचे पठारावरून अफलातून दर्शन होते आणी ह्या घाटवाटेचा एकंदर पसार लक्षात येतो.
२५.

२६.

२७.

२८.

पठारावरून होणारा मढे घाट, कर्णवाडी, रानवाडी आणी शिवथरघळ परीसराचा नजारा
२९.

३०.

अजून ह्या घाटवाटांवर बरेच लिहावयाचे होते पण सध्या वेळे अभावी लिहीता येत नाहीये...
ह्या लेखातले कही फोटो विशालने काढले आहेत अ बाकीचे सर्व फोटो मी काढले आहेत.

पुन्हा पुढच्या ट्रेकला भेटू....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून ह्या घाटवाटांवर बरेच लिहावयाचे होते पण सध्या वेळे अभावी लिहीता येत नाहीये... >> जल्ला तुझ्या नावावर लेख दिसला तरी खूप बरे वाटते... इतका प्रयास घेतलास तेच आमच्यासाठी खूप आहे.. Happy वेळ मिळेल तसे एडीट करून लिहित जा.. तेवढीच आमच्या ज्ञानात भर... फोटु मस्त !

उत्कृष्ट फोटो. सह्याद्रीचे सौन्दर्य मान्सूनमधे सर्वात जास्त भरात असते. हिरव्या रंगाच्या इतक्या समृद्ध छटा अन्य कुठे दिसतील असे वाटत नाही. पावसामुळे स्वच्छ धुऊन निघालेले ते खडक आणि त्यावरील धो धो वाहणारे पाणी! जबरदस्त रंगसंगती!

इतकी मेहनत घेऊन तुम्ही फोटो काढलेत आणि ते आठवणीने येथे डकवलेत याबद्दल आभारी आहे.

डिजिटल फोटोग्राफीचेही आभार मानले पाहिजेत ज्यामुळे असे डोळे भरून पहावेसे वाटणारे फोटो काढता आले!

काय नजारा आहे या धबधब्यांचा ! व्वा ! डोळे निवतात अगदी. ते १४ नं फोटोमधली घरे आवडली, जाम लक्की आहेत ते लोक. खेड्यामधले घर कौलारुं....

उपांड्या आणि मढेघाट.. तानाजी मालुसर्‍यांचे शव या घाटाने नेले म्हणून मढे घाट नांव आहे. राजधानी रायगडाकडे किती घाट उतरून जाता येईल याची यादी मागे तयार केलेली... !
देवघाट- कावळ्या घाट- बोचे घळ- निसणीची वाट- बोराटा नाळ- सिंगापूरची नाळ- फडताड नाळ- शेवत्या घाट- मढे घाट- उपांड्याची नाळ...
आता यात आणखी कांय भर ? आणि पुढे यातले कुठले करायचे बेत असतील तर कळवत रहा..
जीव पिसवतो रे असले धागे वाचून ..! छ्या:!!!!!!!!!!!!

यो रॉक्स + १
हल्ली मला किल्ल्यांपेक्षा सह्याद्रीतल्या घाटवाटांनीच भटकणे अधिक आवडायला लागलं आहे..

सर्वांचे प्रतिसादा करता धन्यवाद..

रोहीत> प्रयत्न करतो लिहायचा...
यो> तुला तर माहीत आहे..माझ्यासाठी ट्रेक वृत्तांत लिहायचा म्हणजे किती कठिण काम आहे ते.. Happy
रोहन> आयला तु असा म्हणलास म्हणजे झालच...

उपांड्या आणि मढेघाट.. तानाजी मालुसर्‍यांचे शव या घाटाने नेले म्हणून मढे घाट नांव आहे. राजधानी रायगडाकडे किती घाट उतरून जाता येईल याची यादी मागे तयार केलेली... !
आता यात आणखी कांय भर ? आणि पुढे यातले कुठले करायचे बेत असतील तर कळवत रहा..
>>>>> हेम... होय मढे घाटाला ह्या घटने मुळे तसे नाव मिळाले खरे पण घाटवाट त्याहीपेक्षा जुनी आहे त्यामुळे त्या आधी ह्याचे काहीतरी नाव असेलच.
देवघाट- कावळ्या घाट- बोचे घळ- निसणीची वाट- बोराटा नाळ- सिंगापूरची नाळ- फडताड नाळ- शेवत्या घाट- मढे घाट- उपांड्याची नाळ...
>>>हेम खरेय.. रायगड परीसरात कोकण आणी देश जोडणारे अनेक घाट पुर्वापार वाहते आहेत. काही व्यापारी म्हणजे बैलांचे तांडे जाऊ शकतील असे, काही लोकांच्या पायी वाहतुकीतले तर काही पावसाळा सोडलातर सुरु असणारे..ह्यातले काही घाट सोडले तर बरेचसे घाट अजूनही आजूबाजूच्या लोकांत वापर असलेले आहेत..
तुझ्या यादीत कुंभ्या घाट (मानगड - घोळ), कावल्या-भावल्या खिंड (गारजाई वाडी - सांदोशी), एकलनाळ/एकलदरा नाळ जोडलेस की रायगड परीसरातील घाटवाटांची यादी झाली.
आणी उपांड्याच्या पुढे, गोप्या घाट आणी खुटे घाट जोडलास की ताम्हीणी ते वरंधा पर्यंत घाटवाटांची यादी झाली. यात स्थानीक लोकांत वापरात असलेले, पट्टीचे ट्रेकर्स लोक जाणारे आणी मला माहीत नसलेले धरले नाहीतच :)....
आता गोप्या घाट आणी खुटे घाट करायचा ठरवतोय...

नचिकेत> :). गेली काही वर्षे घाटवाटा आणी लेण्या असेच ट्रेक बरेचसे केल्याने माझेही काहीसे तसेच झाले आहे...

सह्याद्रितील एकुण घाटवाटा किती? २१९? की अजुन जास्त?
सर्व करायच्या म्हटले तर किती दिवस / महिने / वर्ष हवीत?

दर शनिवार-रविवार एक घाट वाट करायचे म्हटले तरी किमान ४ वर्ष हवीत... Proud
.
.
.
किल्ले ३५०. ते दर शनिवार-रविवार एक करायचे म्हटले तरी ७ वर्ष हवीत. Happy
.
.
कोकण फिरायला १ वर्ष पुर्ण. Happy

पुर्ण कालावधी १२ वर्ष... Happy एका तपाची साधना होईल.. Proud

पाळंदेंच्या डोंगरयात्रामध्ये २२० घाटवाटांची यादी असली तरी त्यापेक्षाही ही यादी वाढू शकेल. या पुस्तकाच्या २ र्‍या आवृत्तीत २०५ वाटांची यादी होती, त्यांत १५ ची भर पडलीये..
बसगड-उटवडच्या अगदी अंगाला लागून एक घाटवाट कोकणातल्या शेरीच्या पाड्यातून वर चढते. त्या वाटेचे नांव डोंगरयात्राच्या यादीत नाहीये.. पावसाळ्यात आम्ही वर्षाविहार म्हणून ही घाटवाट करतो. उटवडची वाट असं जरी स्थानिक सांगत असले तरी त्या वाटेचे नांव अजून वेगळे असले पाहिजे असं मला सारखं वाटतंय.. कारण माहित नाही. . पण मिळेल..!
मध्यंतरी पाळंदेकाकांची नासिकलाच एका कार्यक्रमांत भेट झाली त्यावेळी घाटवाटांवरून विषय निघाल्यावर त्यांनी या वरच्या भागांत अजूनही बर्‍याच वाटा आहेत, त्यांची माहिती गोळा करायला हवी असं सांगितलं होतं..

दर शनिवार-रविवार एक घाट वाट करायचे म्हटले तरी किमान ४ वर्ष हवीत...
२ दिवस हाताशी असतील तर, एका वाटेने चढून दुसर्‍या वाटेने उतरायचे असे केल्यावर ही वर्षे अजून कमी होतील.. Happy मनोजने आता केलंय तसे...!

हेम, मनोज, हे असं माहितीपूर्ण काही वाचलं की आपण किती अज्ञानी आहोत हे वाटून भयंकर ओशाळायला होतं.. Happy

किती किती किती भटकंती बाकी आहे अजून!!!

पुर्ण कालावधी १२ वर्ष... एका तपाची साधना होईल.. >>>> रोहन, अरे तेव्हढ्याने पण हे पुर्ण होणारे नाहीयेय्....जसे जसे अधीक फिरावे तसे तसे अधीकच नवीन समजत जाते आणी वाटते की अरे हे राहीलेय करायचे Happy

पाळंदेंच्या डोंगरयात्रामध्ये २२० घाटवाटांची यादी असली तरी त्यापेक्षाही ही यादी वाढू शकेल. या पुस्तकाच्या २ र्‍या आवृत्तीत २०५ वाटांची यादी होती, त्यांत १५ ची भर पडलीये..>>>>हेम खरेय.. कितीतरी अजून अश्या घाटवाटा आहेत की ज्यांचा पुस्तकात उल्लेख नाही...जसे की सुधागड एरीयातला घोणदांड घाट.. हा घाट आम्ही केला तेव्हा त्याची काहीही माहीती कुठेही मिळाली नव्हती... गावकर्‍यांच्या माहीतीवरच आम्ही गेलो होतो..

मध्यंतरी पाळंदेकाकांची नासिकलाच एका कार्यक्रमांत भेट झाली त्यावेळी घाटवाटांवरून विषय निघाल्यावर त्यांनी या वरच्या भागांत अजूनही बर्‍याच वाटा आहेत, त्यांची माहिती गोळा करायला हवी असं सांगितलं होतं>>>>> अगदी अगदी.. ह्या भागातल्या बर्‍याश्या घाटवाटा उपेक्षितच आहेत...

मनोज... सुंदर!
हेम आणि मनोज घाटांच्या माहिती बद्दल धन्यवाद... तुम्हा सगळ्यांन सोबत एक ट्रेक झालाच पाहिजे.