एका प्रेमाची गोष्ट
एक डॉलर आणि सत्यांशी सेंट्स. बास! त्यातले सुद्धा साठ सेंट्स नुसतीच एक एक पैशाची सुट्टी नाणी. कधी वाण्याशी, कधी भाजीवाल्याशी आणि कधी बेकरीत घासाघीस करून त्यातला एक एक पैसा जमला होता. डेलाने ते पैसे तीन तीन वेळा मोजले. एक डॉलर आणि सत्त्याऐंशी सेंट्स. क्रिसमस एक दिवसावर येऊन ठेपला होता. अतीव दु:खात डेलाने तिथल्या जुन्या जीर्ण सोफ्यावर झोकून देत हुंदक्यांना वाट करून दिली. याखेरीज ती करू तरी काय शकत होती. आयुष्य हे असेच सुख दु:खानी विणलेले असते ह्याची टळटळीत शिकवणच तिला मिळत होती जणू. सुख थोडे आणि दु:ख भारी!