भाकरीचे लाडू
एक गरीब कुटुंब. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते. दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते. त्या दिवशी कुठला तरी सण असतो आणि ते हिने लक्षात ठेवून आदल्या रात्रीच गूळ-भाकरीचे लाडू करून ठेवलेले असतात. आईच्या उरात लेकीविषयी अभिमान दाटून येतो. थोरलीमुळे कुटुंबाला गोडाचं जेवण घडतं.
लहानपणी आई आम्हाला बर्याच गोष्टी सांगायची, त्यातली ही एक. गोष्ट ऐकल्यानंतर थोरलीतल्या 'आदर्श मुली'ची मला फारच भुरळ पडली होती. त्यापेक्षा जास्त खुणावत होते भाकरीचे लाडू. ते खाण्याची फारच इच्छा होत होती. आईकडे एकदा भाकरीच्या लाडवांची मागणी करून बघितली. पण गोष्टीची एकूण पार्श्वभूमी बघता आईला ती कल्पना फारच अभद्र वाटली असावी. तिने अगदी 'धुडकावून लावणे' ची प्रचिती देत आणि आमची 'विशिष्ट' लक्षणे उद्धरत नकार दिला. तरी आम्ही भाकरीच्या लाडवांचं टुमणं सोडलं नाही. शेवटी आईने परवानगी दिली. उत्साहात भाकरी कुस्करायला घेतली पण भाकरी हाताने पोळीसारखी कुस्करली जात नाही हे लक्षात आले. मग आईने आम्हाला मिक्सर मधून भाकरी बारीक करून दिली. आईनेच त्या चुर्यात तूप आणि गूळ घालून झकास लाडू वळले. मस्तच लागले असणार कारण त्यानंतर आम्ही बरेचदा ते लाडू केले. बाजरीची भाकरी, तूप, गूळ हे जिन्नस आमच्या पोटात जाताएत बघून आईने पण मना नाही केले.
आज कुठे तरी भाकरी बद्दल लेख वाचला आणि एकदम हे भाकरीचे लाडू आठवले.
सिंडी, भाकरीचे लाडू !
सिंडी,
भाकरीचे लाडू ! यम्मी....ऑसम...! लहानपणी आम्ही भावंडांनी सुद्धा खूपदा खाल्लेत! त्याची आठवण ताजी झाली... धन्स!
य गो जोशींची गोष्ट आहे ती
य गो जोशींची गोष्ट आहे ती बहुतेक. आम्हाला बाल भारतीमधे धडा म्हणून होती ती गोष्ट !
पोळीचे लाडु माहिती
पोळीचे लाडु माहिती आहेत..
भाकरीचे लाडु करुन बघावे लागतील..
ही कथा शालेय अभ्यासात होती.
ही कथा शालेय अभ्यासात होती. पाडवा गोड झाला असे शीर्षक होते बहुतेक.
आम्हाला होती ही कथा शाळेत.
आम्हाला होती ही कथा शाळेत. त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणीने पण लाडू करुन खाल्ले होते.
वा, सिंडरेला, त्या गोष्टीची
वा, सिंडरेला, त्या गोष्टीची आठवण करून दिल्याबद्दल धन्स!
अजून कधी भाकरीचे लाडू करून खाल्ले नाहीएत. पण सध्या थंडीही आहे, घरी भाकर्याही बनत आहेत आणि तुझ्यामुळे ती भाकरीच्या लाडवाची गोष्ट पुन्हा स्मृतीत ताजी झाली आहे - तेव्हा भाकरीचे लाडू गट्टम् स्वाहा करण्यासाठी खासा मुहूर्त! 
वा गोष्ट आणि लाडू दोन्ही छान.
वा गोष्ट आणि लाडू दोन्ही छान.
हो ही आठवते आहे कथा. बाजरीची
हो ही आठवते आहे कथा. बाजरीची भाकरी उसाच्या रसातही करतात ना धुंधुरमासात? तशा भाकरीचे आणखी छान लागतील लाडू.

मी भैरप्पांचं पर्व वाचल्यावर असाच दुधात भात शिजवण्याचा प्रकार केला होता.
हो ही पाडवा गोड झाला ही कथा
हो ही पाडवा गोड झाला ही कथा वाचली आहे. मला आवडली होती भयंकरच. पण माझे पॅकेज तेव्हा बाळबोधपणाचे असल्याने आता जी एंशी कॅलिब्रेटकेलेला लॅक्टोमीटर त्या कथेत बुडवून तिचा दर्जा तपासला पाहिजे.
आमची 'विशिष्ठ' लक्षणे >>
आमची 'विशिष्ठ' लक्षणे >> भिकेचे डोहाळे का?
आमचा बराच सत्कार झाला आहे यावरुन
आम्हाला बाल भारतीमधे धडा
आम्हाला बाल भारतीमधे धडा म्हणून होती ती गोष्ट >>>> मला नव्हती. मला आईनेच सांगितलेली आठवते.
रैना,
छान. भाकरीचे नाही पण आईच्या
छान. भाकरीचे नाही पण आईच्या हातचे चपातीचे लाडू (आणि धम्मकलाडू पण) भरपूर खाल्लेत.
गोष्ट ऐकल्यानंतर थोरलीतल्या 'आदर्श मुली'ची मला फारच भुरळ पडली होती. त्यापेक्षा जास्त खुणावत होते भाकरीचे लाडू. >>> सह्हीच. त्या वयात कनवाळूपणा, सोशीकपणा वगैरे सुलोचना टाईप गुणधर्म अंगी बाणवण्याची उबळ यायची.
रच्याकने : कॉलेजात असताना चक्रधरस्वामींनी लिहिलेली 'साधेचे लाडू' नावाची गोष्ट होती. ती आठवली नाही पण तिची (म्हणजे गोष्टीची साधेची नाही) आठवण झाली.
भाकरीत तेल, मीठ, मसाला, बारीक
भाकरीत तेल, मीठ, मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून तिखट लाडू केल्याचं आठवतय. छान लिहीलं आहेस.