माझे संगीताचे प्रयोग
घरी भीमसेन जोशींच्या अभंगांच्या पलिकडे फार काही संगीत नसायचे. तिसरी-चौथीत शाळेतल्या एका बाईंकडे काही दिवस पेटी शिकायला गेलो होतो. मग सातवी-आठवीत असतांना शेजारी रहाणार्या एका दादामुळे हिंदी सिनेमातील गाणी ऐकायची सवय लागली. या शिवाय संगीताशी फार काही संबंध तिशीपर्यंत आला नाही. सर्व प्रकारची गाणी ऐकणे सुरु असायचे, पण त्या बद्दल फार काही विचार न करता. शाळेत असतांना चित्रकला जमत नाही म्हणुन सोडलेली, तर संगीत प्रयत्न न करताच सोडलेले. त्यामुळे पॅसॅडेनाला आल्यावर कधीतरी ठरवले की आपणही पहायचे संगीत हा काय प्रकार आहे ते.