स्वप्न माझे आसवांनी बुडवले
निष्ठेने माझ्याच एकटे पाडले
जीवनातली तहान नाही सरली
गीत प्रेमाचे न पूर्ण जाहले
वार त्याचा हा असेल अखेरचा
आशेवर या वार सारे सोसले
नष्ट केले मी जरी माझे मला
दोघांमधले अंतर नाही संपले
(हसन कमाल यांच्या 'दिल के अरमां' या प्रसिद्ध हिंदी गाण्याचं मराठी रूपांतर)
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.
नाही हरवत कोणीही
आपल्या स्वतःच्याच सावलीत ..
नाही जात हृदयच
स्वतःनेच उसळवलेल्या रक्तामधे वाहून ..
जीवनाला नसते प्रतीक्षा
दुसर्या कोणत्याही
जादुगाराची ..
कारण जीवनच आहे एक जादूचा पेटारा !
जीवनाची जादूची कांडी
फिरतच असते ..
काळजात जमा होत जाणारं
भुरकट राखाडी रसायन
हिरवंशार बनवून
पांचूसारखं चमकत ठेवणारी ही जादू
निसर्ग चैत्राला जसा चेतवतो
तशीच नित्य चेतवावी लागते !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मी केलेला हा मराठी मुक्त अनुवाद चैत्र नाटकासाठी.
तुझ्या वाहत्या पाण्याच्या लाटांवर
माझं चित्र कसं विखुरलय ...
तुझ्या काठावर मी उभा
अविचल, निश्चल
माझ्या फुलांच्या डोळ्यांचा मी !
माझ्या गंभीरतेतच आत
खोल खोल दडलंय माझं झुलणं ..
माझं पालवणं
बहरणं
आणि
एक अनामिक जीवनेच्छा !
गंभीर गाभार्यातून सरसरतो
फुलणारा पूर
भिडतो आभाळाला
आणि
नीरव शांततेची एक पहाट
छेदतो ..
पूर्व दिशेला !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त अनुवाद मी केला ''चैत्र'' या नाटकासाठी
तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता
अन्
आयुष्याचे कण मोजता मोजता
वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..
मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...
चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...
सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ
केसांत माळलेली फुलं ?
की
चांदण्यात हरवलेली ?
असे लाखो संभ्रम !
आणि
त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं
तुझं हे हंसू !
या तुझ्या दिसण्यात,
हसण्यात ..
मृत्यूने
आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?