नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 November, 2010 - 02:40

अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.

अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच! सध्या पाकिस्तानात असलेल्या तलवंडी गावात माता तृप्ता व पिता मेहता कालू यांच्या पोटी गुरू नानक यांचा इ. स. १४६९ मध्ये कार्तिक महिन्यात जन्म झाला. नुकताच गुरू नानक जयंती सोहळा व प्रकाश पर्वाचा उत्सव देशोदेशीच्या सर्व शीख बांधवांनी साजरा केला. इतिहासाने ज्या ज्या व्यक्तींची द्रष्टे, संतशिरोमणी किंवा ज्ञानी म्हणून नोंद घेतली त्यांमध्ये गुरू नानकांचे स्थान व कार्य वादातीत आहे. एका महान कर्तृत्वशाली, साक्षात्कारी संतमहात्म्याच्या जन्माच्या जशा कहाण्या असतात तशाच त्या गुरू नानकांच्या जन्माचे बाबतीतही आहेत. माता तृप्ताला नानकांचा गर्भ उदरी जोपासताना झालेले भास, तिला दिसलेली स्वप्ने, संकेत इत्यादींचे उल्लेख शीख वाङमयात येतात. तृप्ता मातेबद्दल तपशिलांत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती स्वभावाने अतिशय सत्शील, कनवाळू व प्रेमळ असल्याचे उल्लेख आढळतात.

अमृता प्रीतमच्या प्रतिभाशाली लेखणीतून, कल्पनेच्या भरारीतून माता तृप्ताने गुरू नानकांच्या वेळी गर्भार अवस्थेत पाहिलेली स्वप्ने ''नौ सपने'' ह्या दीर्घ कवितेतून आपल्या भेटीला येतात. उदरीचा गर्भ तृप्ता मातेला विविध प्रकारे आपल्या अस्तित्वाचे, दिव्यत्वाचे संकेत देत राहतो. नऊ महिन्यांची ही नऊ स्वप्ने. उदरीचा गर्भ जसजसा आकार घेत जातो तसतसा स्वप्नांत आणि माता तृप्ताच्या मनोवस्थेत घडून येणारा बदल अमृताने मोठ्या नजाकतीने वर्णिला आहे. प्रत्येक स्वप्न तृप्ता मातेला पोटातील अंकुराविषयी काही ना काही दृष्टांत देत राहते. संकेत, भास-आभास, स्वप्न व संवाद यांचे हे तलम वस्त्र शब्दांमध्ये गुंफताना कवितेमधून ठायी ठायी अमृतामधील मातृत्वही डोकावताना दिसते. त्या काळातील स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील घटनांचा मोठ्या खुबीने वापर करून अमृता कवितेचे रंगही अधिक गडद-गूढ करत जाते. चंद्र-सूर्य-तारका, नदी-सरोवर, वृक्ष-वने आदींचे रूपक तिने रेखाटलेल्या शब्दचित्राचे सौंदर्य अजूनच खुलविते. तिने कवितेत योजलेले काही शब्द आणि त्यांचा प्रतीत होणारा अर्थ अधिक गहिराईचे संकेत देत मनात रुंजी घालत राहतात.

अमृताच्या आत्मचरित्रात हे काव्य तिला आपल्या आयुष्यातील एका प्रसंगावरुन स्फुरल्याचे ती सांगते. स्वतःचा दूरगावी गेलेला मुलगा जेव्हा आईशी संवाद साधतो तेव्हा त्या आईची होणारी अवस्था अमृतामधील माता आणि कवयित्री ज्या तरलतेने व ताकदीने अनुभवते तीच तरलता तिच्या ''नौ सपने'' कवितेतून रसिकांना खुणावत राहते. एका तेजस्वी गर्भाला उदरी पोसताना माता तृप्ताने नक्की काय अनुभवले असेल? काय स्वप्ने पाहिली असतील? येणार्‍या काळाच्या खुणा तिला जाणवल्या असतील का? त्या गर्भाने तिला काही संकेत दिले असतील का? या सार्‍या प्रश्नांचा वेध घेत अमृताची कविता एक वेगळाच अनुभव देऊन जाते.

माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते.

त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न :

नऊ स्वप्नं

भाग १

तृप्ता दचकून जागी झाली
ऊबदार दुलई हळूच सारखी केली
लाल लज्जेसमान पदर
सावरला तिने खांद्यावर

आपल्या धन्याकडे पाहिले
मग शुभ्र बिछान्यावरच्या
चुणीप्रमाणे हलकेच लाजली

आणि म्हणू लागली
आज माघाची रात्र
मी नदीत पाऊल ठेवले

गारठलेल्या थंड रात्री
कोमट पाणी नदीचे पात्री

अलौकिक काही झाले
पाण्याला अंगस्पर्श होताच
नदीचे दूध झाले!

त्या जादुई नदीत
मी दुधात न्हाले

या तलवंडी (गावा)त
ही कोणती नदी?
हे कसलं स्वप्नं?

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

आणि नदीचं पाणी
माझ्या रक्तात मिसळत गेलं
आणि तो प्रकाश
माझ्या उदरी तरंगत राहिला

-----------------------
भाग २

फाल्गुनाच्या कटोऱ्यात सात रंग मिसळले
पण मुखाने काही ना वदले

ह्या मातीच्या देहाचं सार्थक होतं
जेव्हा कोणी उदरी आश्रयाला येतं

हा कसला जप? हे कसलं तप?

की मातेला ईश्वराचा साक्षात्कार
गर्भाचे ठायी होतो....

---------------------------

भाग ३

कोवळ्या गर्भाची मळमळ
जीव घाबरा झाला केवळ

ताक घुसळायला बसले तर भासले जणू लोणी वर आले
मातीच्या घड्यात हात घातला
तर सूर्याचा वृक्ष निपजला

हा कसला भोग? कसला हा संयोग?

आणि चैत्राचे पुढे सरकणारे दिवस
हे असलं कसलं स्वप्नं?
-----------------------------

भाग ४

माझ्यात आणि गर्भात
हे स्वप्नांचं अंतर

जीव माझा फुलला आणि काळीज घाबरंघुबरं
वैशाखात कापलं जाणारं
हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....

---------------------

भाग ५

आज रात्रीचा हा तरल समय
आणि ज्येष्ठाचा महिना
हा कोणता आवाज होता?

जळीस्थळी
जणू एक नाद उमटे
हे मोह-मायेचे गीत
की ईश्वराच्या कायेचे संगीत?

कोणता दैवी सुगंध होता?
की माझ्या नाभीचा गंध होता?
मी घाबरले
शंका घेत राहिले
आणि त्या आवाजाच्या रोखाने
वनांच्या वाटा धुंडाळत राहिले

हा कोणता आवाज
कोणतं हे स्वप्नं?
कितीसं परकं?
कितीसं आपलं?

मी एक हरिणी
जशी बावरी होत राहिले
आणि माझ्या गर्भाला
कान लावून ऐकत राहिले
--------------------------------

भाग ६

आषाढाचा महिना
तृप्ताला आपोपाप जाग आली
जसे उमलणारे फूल
जसा पुढे सरकणारा दिवस

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे कसलं स्वप्नं?
की जाग आल्यावरही वाटतंय
जणू माझ्या गर्भात
त्याचा पंख फडफडतोय..... ""
-------------------------------------

भाग ७

कोणता वृक्ष वा मनुष्य
नाही माझ्या जवळ
तरीही कोणी माझ्या झोळीत
घातला हा नारळ?

मी नारळ वाढविला
तर लोक मलई न्यायला आले
कोवळ्या नारळाचे पाणी
मी कटोऱ्यात ओतले

ना कोणा सांगितले ना कळवले
ना आप-परभाव केला
दाराशी असंख्य लोक आले
पण नारळाची मलई
तरीही संपली नाही

असा कसा हा नारळ?
असे कसे हे स्वप्नं?
आणि स्वप्नाचे धागे किती लांबच लांब?

छातीतला हा पाऊस,
मी छातीला हात लावला
तर ते नारळाचं पाणी
दुधासारखं ठिबकू लागलं

-------------------------------

भाग ८

हा कसला भाद्रपद?
ही कसली जादू?

सगळ्याच गोष्टी न्याऱ्या
ह्या गर्भीच्या बाळाचं अंगडं-टोपडं
शिवणार तरी कोण?

ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

आश्विनाच्या महिन्यात
तृप्ता होती जागी आणि विरागी

''हे माझ्या जीवना!
तू कोणासाठी काततो आहेस हा मोहाचा धागा!

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

------------------------

भाग ९

माझ्या कार्तिक धर्मी,
माझं जीवन सुकर्मी
माझ्या गर्भाची धुनी
कातते पुढचा धागा जीवनी

देहाचा दीप उजळला
प्रकाशाचा किरण स्पर्शिला
धरतीच्या दाईला बोलावा
माझा प्रसवकाळ आला...

(पूर्ण)

**********************************************************************************************************************

मूळ काव्य येथे वाचा.

--- अरुंधती

गुलमोहर: 

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

वाह..!!अप्रतिम..!!! निवडक दहांत..!! Happy

<<हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....>> व्वा ! किती सुंदर,...

मयुरेश, दिनेशदा, अमित., १८व्या उंटा, आशूडी, विशाल, शैलजा, हंसा.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! Happy

शैलजा, इथे सेन्ट्रल अलाईनमेन्ट कशी करतात ते अजून माहित नाही गं, त्यामुळे ते लिखाण डाव्या बाजूला सरकल्यासारखे दिसत आहे.

हंसा.... त्या साईटवर अक्षरशः खजिना आहे! मी तर तिला बुकमार्क करुन ठेवले आहे. Happy

अनुवाद आणि प्रस्तावना, दोन्ही मस्त जमले आहेत. तू अमृता प्रीतमचं सगळं साहित्य मराठीत आणायचा प्रयत्न कर अकु, तुला छान जमेल Happy

अरु. खूप सुरेख अनुवाद केलायेस. मी अमृता प्रीतम ची ह्यूज फॅन आहे. उमा त्रिलोक ने इन्ग्लिश मधे लिहिलेलं हे पुस्तक कधी मिळालं तर जर्र्रूर वाच' अमृता इमरोझ - अ लव स्टोरी

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला...

सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं...
अप्रतिम Happy

रुणुझुणू, एक फूल, वर्षू नील, स्वाती, अगो, निलिमा, सावली, ऋयाम.... सर्वांना प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! Happy अमृताच्या कविता मी मधूनच कधीतरी वाचते. काही कविता पुन्हा पुन्हा वाचते. काही कविता मनात घर करतात. मग त्या कविता इतरांबरोबर शेअर कराव्याशा वाटू लागतात आणि त्यांचा भावानुवाद केल्याशिवाय राहवत नाही.

वर्षू, मी त्या पुस्तकाचा काही भाग वाचलाय. एकदम वेगळी आहे त्यांची स्टोरी. Happy

फार सखोल व आशयघन अशी सुंदर कविता दाखवून दिल्याबद्दल अत्यंत आभारी. असेच काही सुंदर मिळाले तर जरूर शेअर (नेमका मराठी शब्द काय?) करावे ही नम्र विनंती.
शशांक

_/\_