चैत्र चिल्लीका-
लहडेल पुष्पांनी निदसुरा कुंज
नवल गात्रात भरेल चैत्र फ़ुंज
रसनेला फ़ुटेल वाचा
स्पर्श बोलेल भाषा
येई उधाण गंधांच्या कोशा
वाजे सृष्टीचा पायरव
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
अवकाशी कूजन ध्वनींची दाटी
पक्षी उडती प्रणय नदीचे काठी
पाण्यास येई सुगंध
नजरेचा उडे मिलींद
रानी भुंग्यांचा वैखर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
येई फ़ांदीवर पोपटी लव
अनंत रंगांचे तरू वैभव
लुटण्यास त्या सुटेल
मादक उष्ण सलील
सांडेल मोहराची कुसर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
अधीर किती शोधीती विरहिणी
तृप्त रसाची ती पुष्करणी
मिळता घालीती उडी
नाही हरवत कोणीही
आपल्या स्वतःच्याच सावलीत ..
नाही जात हृदयच
स्वतःनेच उसळवलेल्या रक्तामधे वाहून ..
जीवनाला नसते प्रतीक्षा
दुसर्या कोणत्याही
जादुगाराची ..
कारण जीवनच आहे एक जादूचा पेटारा !
जीवनाची जादूची कांडी
फिरतच असते ..
काळजात जमा होत जाणारं
भुरकट राखाडी रसायन
हिरवंशार बनवून
पांचूसारखं चमकत ठेवणारी ही जादू
निसर्ग चैत्राला जसा चेतवतो
तशीच नित्य चेतवावी लागते !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मी केलेला हा मराठी मुक्त अनुवाद चैत्र नाटकासाठी.
तू गेल्यावर
तुझे इथे
हे प्रेम कसे राहिले ?
रस्ते हरवून
तुझे परतणे
दूर कसे राहिले ?
हृदयामध्ये
तुला घेऊनी
फिरतो आता दुनिया ...
खळखळ पाणी
अवखळ पाने
वसंतवेडी माया !
सांडून गेलेले
प्रेमाचे तारे
वरती हसले ..
तिथेच कोठे
तुझ्या घराचे
दार मला का दिसले ?
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त मराठी अनुवाद मी चैत्र या नाटकासाठी केला.
तुझ्या वाहत्या पाण्याच्या लाटांवर
माझं चित्र कसं विखुरलय ...
तुझ्या काठावर मी उभा
अविचल, निश्चल
माझ्या फुलांच्या डोळ्यांचा मी !
माझ्या गंभीरतेतच आत
खोल खोल दडलंय माझं झुलणं ..
माझं पालवणं
बहरणं
आणि
एक अनामिक जीवनेच्छा !
गंभीर गाभार्यातून सरसरतो
फुलणारा पूर
भिडतो आभाळाला
आणि
नीरव शांततेची एक पहाट
छेदतो ..
पूर्व दिशेला !
मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त अनुवाद मी केला ''चैत्र'' या नाटकासाठी
तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता
अन्
आयुष्याचे कण मोजता मोजता
वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..
मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...
चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...
सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ
केसांत माळलेली फुलं ?
की
चांदण्यात हरवलेली ?
असे लाखो संभ्रम !
आणि
त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं
तुझं हे हंसू !
या तुझ्या दिसण्यात,
हसण्यात ..
मृत्यूने
आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?