द्वादशैतानि नामानि
अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
भक्त्तांसी करावे, थोडे सूज्ञ II १ II
अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II
कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II
अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II
अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II
अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II
विघ्नराजेंद्रा रे, जल आणि वात
दोन्ही प्रदूषित, कैसे झाले II ७ II
अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव भक्तांची, वाढवावी II ८ II