
काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.
काही गोष्टी पाहण्यात तुम्हाला रस नसला तरी पाहाव्या लागतात. घर लहान आहे त्यामुळे संध्याकाळी टिव्हीवर जे काही लागते ते कानावर मुद्दाम हेडफोन लावला तरी त्यातून झिरपत जाते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागत असल्याने ते अधून मधून दिसतही राहते. या मालिकेबद्दल माझे वैयक्तिक मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण २९८ भागांच्या या मालिकेला मिळालेली अमाप प्रसिद्धी मला सामाजिक दृष्ट्या विचार करायला लावणारी वाटली. "वय विसरायला लावते ते प्रेम" अशा आगळ्यावेगळ्या विषयाने सुरुवात झालेली ही मालिका पुनर्जन्म आणि सूडावर येऊन काल संपली.
संशोधनाच्या दरम्यान अनेक मनोगतं ऐकली. त्यांचा अभ्यास करावा लागला. त्यामुळे जुन्या समजूती मागे पडल्या. दु:खाच्या अतिरेकाने, प्रेमात वैफल्य आल्याने माणसे दारुला जवळ करून व्यसनी होतात असे हिन्दी चित्रपट पाहून वाटायचे. आजुबाजुला तसे कधी घडताना दिसले नाही. प्रत्यक्ष संशोधनाच्या वेळीही तसे दिसले नाही. बहुतेकांनी झिंग येण्यासाठी, उत्सुकता, गंमत म्हणून दारुचा प्याला जवळ केला होता. पण माणसे दारु कधी सोडतात, कशामुळे सोडतात हा भाग सुद्धा महत्त्वाचा होताच. ते अभ्यासताना मात्र काही पॅटर्न दिसून आला.
स्वमदत गट हा संशोधनाचा विषय घेतला तेव्हा हा विषय अफाट आहे याची थोडी कल्पना आली होती. मात्र या विषयात आजारागणिक प्रचंड गुंतागुंत आहे हे तेव्हा तितकेसे लक्षात आले नव्हते. प्रत्येक स्वमदत गट हा गंभीर समस्येसाठी कार्यरत असला आणि बहुतेक स्वमदत गटांची काम करण्याची पद्धत जी काही अंशी सारखी असली तरी त्यात खुप वैविध्य देखिल आहे. काम करण्याची पद्धत सारखी याचा अर्थ स्वमदत गटात विशिष्ट आजार असलेली किंवा समस्या असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात. त्यांच्या नियमित सभा होतात, त्यांच्या गटातर्फे तज्ञांना बोलावून व्याख्याने ठेवली जातात. त्यांच्या सहली निघतात.