सत्तरचे दशक अनेक अर्थाने वेगळे. भारताने या दशकात युद्ध पाहिले, आणखी एक फाळणी पाहिली, आणीबाणी पाहिली. समाजातल्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब चित्रपटात पडणे अपरिहार्यच होते. त्यामुळे या दशकात स्थलांतर करणार्यांची समस्या मुझफ्फर अलींच्या "गमन" मध्ये हाताळली गेली. फाळणी नंतरच्या मुस्लिम मानसिकतेवर आधारलेला "गर्म हवा" याच दशकातला. आर्ट फिल्मच्या चळवळीने याच काळात जोर धरला आणि "निशांत", भूमिका", "अंकूर" सारखे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे निरनिराळ्या समस्यांना हात घालणारे चित्रपट येत असतानाच याच दशकाने "शोले", "अमर अकबर अँथनी" सारखे ब्लॉकबस्टर्सची पाहिले. अमिताभचा अँग्री यंगमॅन याच दशकात "जंजीर" पासून समोर आला. त्याच्या "दिवार"ने तीच परंपरा पुढे चालवली.
मात्र या काळात काही चित्रपट असे आले की ज्यांना निव्वळ आर्ट फिल्म्स मानणे अवघड होते आणि त्यात फक्त धंद्याचे किंवा मनोरंजनाचेच गणित होते असेही म्हणता आले नसते. गुलजारच्या "मेरे अपने"ची गणना या प्रकारात करता येईल. किंबहूना गुलजारचे सर्वच चित्रपट या सदरात टाकता येतील. १९७१ साली "मेरे अपने" संतप्त युवकांची समस्या घेऊन पडद्यावर अवतरला. बेकारी, भ्रष्टाचार, शिक्षण घेऊनही कसलाही सकस पर्याय नसलेली गोंधळलेली तरुण पिढी, आणि त्यातच आपली राजकिय पोळी भा़जण्यासाठी त्यांना दावणीला बांधणारी नेते मंडळी असे परीणामकारक चित्र रंगवणारा हा चित्रपट फिरतो तो एका गावात राहणार्या वृद्धेभोवती. मीनाकुमारीने आपल्या अखेरच्या काळात आजारपणात रंगवलेली ही भूमिका. मीनाकुमारीची प्रेमळ नानीमा मनात ठसते. नवर्याच्या निधनानंतर एकाकी राहिलेली ही म्हातारी आपल्या दूरच्या नातेवाईकाच्या आग्रहावरुन आयुष्याच्य शेवटी आसरा लाभेल म्हणून शहरात येते आणि तिच्या लक्षात येते की या स्वार्थी नातेवाईकांना आपलं माणुस नको होतं तर म्हातारीच्या रुपात एक कामवाली हवी होती.
सत्य लक्षात आल्यावर धक्का बसलेली ही म्हातारी अक्षरशः रस्त्यावर येते. तिला आसरा देते ती भरकटलेली तरुण पिढी. मोठ्यांनी टाकलेली ही मुले त्यांना प्रेमाची गरज असते आणि लहानांनी टाकलेल्या म्हातारीलाही स्नेहाचा ओलावा हवा असतो. पुढे जे काही घडते ते पाहणेच योग्य. गुलजारने त्यावेळी नवीन असलेले कलावंत निवडले आहेत. प्रमुख भूमिकांमध्ये मीना कुमारीचा अपवाद वगळला तर विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा नवेच होते. शिवाय नंतर हिन्दी पडदा गाजवलेली असरानी, डॅनी, पेंटल, दिनेश ठाकुर ही मंडळीही या चित्रपटात समोर आली. चित्रपटाला संगीत सलील चौधरीचे होते आणि गाणी गुलजारची. त्यातील एक अतिशय सुंदर गाणं "कोई होता जिसको अपना". पडद्यावर किशोरच्या आवाजात विनोद खन्नाने गायिलं आहे.
या संपूर्ण चित्रपटातच विनोद खन्नाने आपल्या भूमिकेचे सोने केले आहे. त्याच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाला फिट्ट बसणारी भूमिका मिळाली की अगदी बच्चनलासुद्धा मागे टाकण्याची कुवत असलेला हा अभिनेता श्यामच्या रोलमध्ये भरकटलेल्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. श्यामची प्रेयसी त्याला सोडून गेली आहे. या प्रेयसीची छोटीशी भूमिका योगीताबालीने केली आहे. "भुला हुवा कोई वादा बीती हुई कुछ यादें तनहाई दोहोराती है रातभर.." म्हणत जुन्या आठवणी जागवत श्याम पडक्या घरातून फिरताना दाखवला आहे. भग्न हृदयाचे गीत भग्न, पडक्या घरात चित्रित करत गुलजारने कमाल परिणाम साधला आहे. गाण्यातील एका दृश्यात योगीताबालीला सायकलवर घेऊन येताना विनोदखन्ना दिसतो. हे सायकलवर प्रेयसीला फिरवताना देखिल सुरेख दिसणं हे विनोदखन्नालाच जमु शकतं. पुढे जवळपास अगदी हाच परिणाम "आरोप" चित्रपटात "नैनोमे दरपन है" गाण्यात साधला आहे. फक्त त्यावेळी योगीताबालीच्या जागी सायरा बानू आहे.
सायकलवर आनंदाने फिरणारे जोडपे दाखवल्यानंतर लगेचच पुन्हा भग्न घरात सायकलचे चाक फिरताना दाखवले आहे. अजुनही त्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत. हे गाणे संथ चालीच असले तरी तो एक आक्रोश आहे. कुणी आपले म्हणण्यासाठी हवे आहे. आणि कुणीच तसे दिसत नाहीय. हा आक्रोश संयत स्वरुपात विनोद खन्नाने व्यक्त केला आहे. त्याकाळात गालापर्यंत कल्ले ठेवण्याची फॅशन होती. काहीजण तसे कल्ले ठेवल्यास खलनायकच दिसतील पण खन्नाला ते शोभून दिसते. सलील चौधरीची सुरेख चाल. आणि गाण्यातील आक्रोश योग्य रित्या व्यक्त करीत खन्नाच्या व्यक्तीमत्वाला सजेल असा किशोरने लावलेला मर्दाना आवाज यामुळे या गाण्यातील दु:ख गडद झाले आहे.
आमच्या काव्यशास्त्रात करुण रसनिष्पत्ती होण्यासाठी योग्य असे वातावरण आवश्यक आहे असे म्हटले आहे. तसे वातावरण या गाण्यात दिग्दर्शकाने ठेवले आहे. पडके घर आहे. अजुबाजूची झाडेझुडपेही त्या उदास वातावरणात भर घालीत आहेत. घर नुसते पडकेच नाही तर त्या घराचे अवशेष, त्यातून निघालेली वाळलेली गवताची पाती सारेच काही वेदना अधोरेखित करणारे. काहीतरी संपल्याची भावना दाखवणारे. आणि गाण्याच्या शेवटी जणूकाही दु:ख अनावर होऊन खन्ना स्वतःला खाटेवर लोटून देतो. कुणीच नाही आता फक्त धरीत्रीचाच आसरा आहे. गाण्याच्या सुरुवातीला दुरुन दाखवलेले पडके घर. पुढे त्या घराचे काही भाग क्लोजप मध्ये दाखवत वरच्या भग्न अवशेषामध्ये झाडाच्या पार्श्वभूमीवर विनोद खन्नाला बसलेले दाखवले आहे. तेथून सुरु झालेला हा संयत आक्रोश गाण्याच्या शेवटी नानीमा येते तेव्हा संपतो. दु:खात पोळलेल्या या तरुणाच्या मनावर ही वृद्धाच आता मायेची फुंकर घालणार असते.
अतुल ठाकुर
छान लिहिलंय. आवडता पिक्चर आणि
छान लिहिलंय. आवडता पिक्चर आणि गित... किशोर कुमार च्या आवाजाची जादू.. काळजाला भिडतं गाणं.
धन्यवाद.
धन्यवाद.
छान लिहलंय. गमन, गर्म हवा आणि
छान लिहलंय. गमन, गर्म हवा आणि मेरे अपने हे चित्रपट मी अजून बघितले नाहीयत, बघेन कि नाही माहित नाही.
> बेकारी, भ्रष्टाचार, शिक्षण घेऊनही कसलाही सकस पर्याय नसलेली गोंधळलेली तरुण पिढी, आणि त्यातच आपली राजकिय पोळी भा़जण्यासाठी त्यांना दावणीला बांधणारी नेते मंडळी > हे असे चित्र कोणत्या काळात नव्हते/ नसेल?
खरं आहे.
खरं आहे.
लहानपणी हा चित्रपट पाहिलाय,
लहानपणी हा चित्रपट पाहिलाय, आता फारसे आठवत नाही.
पण, हे डायलॉग (दृश्य) मनात एकदम फिट्ट आहे
शत्रुघ्न : श्याम कहा है
मीनाकुमारी : वह तो बिट्टु को लेके दवाखाने गया है
शत्रुघ्न : आये, तो उसे कह देना कि छेनु आया था ......
https://www.youtube.com/watch?v=N0bYl1sxba4
कोई होता, जिसको अपना ....... हे गाणं माझ्या प्लेलिस्ट वर आहे, ऐकतो कधीमधी.
गाणे आवडते पण मेरे अपने मधील
गाणे आवडते पण मेरे अपने मधील आहे हे माहीत नव्हते. विनोद खन्नाचा अभिनय अतिशय सहज असायचा, खूप प्रयत्न केल्यासारखे कधी जाणवले नाही.
छान लिहील आहे.
छान लिहील आहे.
गाणे अतिशय आवडते. अजून एका
गाणे अतिशय आवडते. अजून एका लेखात ह्या गाण्याचा उल्लेख झालेला आठवतोय.
चित्रपट टिव्हीवर लहानपणी बघितला होता, काही कळले नव्हते, त्यामुळे कंटाळा आलेला.
बहुतेक या गाण्यानंतर मीनाकुमारी त्याला विचारते इतके उदास गाणे गात होतास, काय झाले? त्यावर तो काही नाही, असेच गात होतो म्हणतो एवढे लक्षात आहे. तेव्हा ते खरेच वाटले होते. आता वरचे वाचून तो खोटे बोलला होता असे वाटते
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Sanjeev.B , श्याम आणि छेनू
Sanjeev.B , श्याम आणि छेनू खुप प्रसिद्ध नावे झाली त्या चित्रपटापासून.
विनोद खन्नाचा अभिनय अतिशय सहज असायचा,
नरेनजी काही विशिष्ट रोल्स हे विनोद खन्नासाठीच होते असं मला नेहेमी वाटतं. "मेरा गांव मेरा देश" हा त्यातलाच एक चित्रपट.
धन्यवाद जागुताई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधनाजी तुमचा अंदाज अचूक आहे. मला वाटतं ती पुढे म्हणते "हम क्या तेरे अपने नही है?"
मला वाटतं ती पुढे म्हणते "हम
मला वाटतं ती पुढे म्हणते "हम क्या तेरे अपने नही है?">>
बरोबर असंच म्हणते ती यावर तो म्हणतो कि युं ही गाणा है सिर्फ.
मस्तच !!
मस्तच !!
छान लेख. मला ह्यातले हाल
छान लेख. मला ह्यातले हाल चाल ठीक ठाक है जास्त आव्डते.
धन्यवाद विनिताजी
धन्यवाद विनिताजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमा, हालचाल ठीकठाक है वर कधीतरी स्वतंत्रपणे लिहायचंय. सुरेख गाणं आहे.
आबोहवा देश की बहोत साफ है
कायदा है कानून है इन्साफ है
अल्लामिया जाने कोई जिये या मरे
आदमी को खूनवून सब माफ है
और क्या कहूं मौत का तमाशा
चला है बेतहाशा
जीने की फुरसत नहीं है यहां...आपकी दुवा से बाकी ठीकठाक है ...:)
हालचाल ठीक-ठाक है वर
हालचाल ठीक-ठाक है वर फारएण्डाने लिहीलय मागे. दोन्ही गाणी मस्त आहेत.
https://www.maayboli.com/node/62470