गळा मोती एकावळी काळी वो माय...!

Submitted by अतुल ठाकुर on 15 October, 2019 - 19:26

22046614_1181926301952440_3280236477252208545_n.jpg

काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.

एखादी सभ्य शांत, मराठी मध्यमवर्गीय वस्ती असावी, रेडीयो वाजण्याचे दिवस असावेत, संध्याकाळची वेळ असावी घरात पिवळे बल्ब लावलेले असावेत आणि हे गाणे कानी पडावे. या गाण्याची चालही तशीच, सभ्य आणि शूचिर्भूत. हे गाणं जुन्या प्रेमळ शिक्षकाच्या घरातच जणू काही शोभावे. आता ही विशेषणे गाण्याच्या चालीला लागत नाहीत हे मला ठावूक आहे. पण तरीही हे गाणं ऐकताना असंच वाटतं. या अविस्मरणीय गाण्याविषयी आणखी काही वेगळं वाटत राहतं. ज्यांनी ही रचना केली ते विष्णूदास नामा आणि आपले नामदेव महाराज एकच का हे मला माहित नाही. मात्र ही रचना मला शंकराचार्यांच्या केवलाद्वैताची आठवण करून देते.

केवलाद्वैताची आठवण आली की संस्कृतचे वेदान्ताचे वर्ग आठवतात. वेदान्ताची परीक्षा दिली नाही. कारण तेवढे धाडस नव्हते. पण आम्हाला वेदान्त शिकवणार्‍या प्राध्यापिका डॉ. शकुंतला गावडे यांच्या वर्गात जाऊन बसत असे. तेथे ब्रह्म, माया, अध्यास, साधन चातुष्ट्य, केवलाद्वैत, मध्वाचार्य, निंबार्क, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, विशिष्टाद्वैत सत्य, मिथ्या, विवर्तवाद, सत्कार्यवाद, सांख्य, योग, बौद्धमत यांच्याबद्दल ऐकले. या विषयात रस होताच. पण सुदैवाने माझ्या असंख्य शंकांना शांतपणे, समाधान होईपर्यंत उत्तरे देणार्‍या शकुंतला मॅडमसारख्या शिक्षिका मला लाभल्या.

त्या जुन्या काळच्या शिक्षकांप्रमाणे आपल्या विषयाची चौफेर आणि परिपूर्ण तयारी करून येत असत त्यामुळे त्या वेदान्त शिकवत असताना मला एखादी सस्पेन्स फिल्म पाहिल्याचा फिल येत असे. शंकराचार्यानी कुणाचे मत कसे खोडले त्याबद्दल आधी पूर्व पक्ष मांडल्यावर शंकराचार्य त्याचे खंडन कसे करतात याची उत्सुकता लागून राहात असे. मग एखादे कोडे उलगडावे त्याप्रमाणे त्याचा उत्तरपक्ष त्या सविस्तरपणे मांडत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य जबरदस्त होते. या वेदान्ताच्या वर्गाचा कंटाळा कधी आलाच नाही. "रात्र काळी..." गाणे ऐकल्यावर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आठवल्या.

जगात दिसणार्‍या यच्चयावत गोष्टींमागे एकच एक तत्त्व आहे. आणि मिथ्या याचा अर्थ खोटे असा नसून अशाश्वत हा जास्त योग्य अर्थ अहे हे सांगणार्‍या केवलाद्वैताचे तत्त्वज्ञान यात सांगितले आहे असे वाटत राहते कारण, रात्र, घागर आणि यमुनाजळ या तिन्हींचा रंग काळा आहे. जी सखी पाणी भरायला गेली आहे तिचे बुंथ, बिलवर हे अलंकारही काळे आहेत. तिने नेसलेली वसनेही काळी आहेत.

आणि गाण्याच्या चरम सीमेला संत म्हणतात "कृष्णमूर्ती बहु काळी वो माय". या ओळीत हा अद्वैतप्रवास पूर्ण होतो अशी माझी समजूत आहे. हा काळीमा जणू ब्रह्मतत्त्व आहे. जे चराचराला व्यापून उरले आहे. जीव आणि जगतच नव्हे तर ज्याला आपण सगुण ईश्वर म्हणतो त्यालादेखील त्याच तत्त्वाने व्यापले आहे असेच या अभंगाच्या रचयित्याला म्हणायचे असावे.

साजणी एकलीच पाण्याला जाते आहे अशावेळी तिजसोबत सावळी मूर्ती पाठवा असे संत येथे म्हणतात. म्हणजेच जगात वावरत असताना ईश्वराचे स्मरण असावे, एकलेपणाने वावरू नये. येथे द्वैताचा आधार घेतलेला दिसतो. याचे कारण मानवी मर्यादा हे असावे. प्रत्येकाला सुरुवातीला अद्वैत झेपेलच असे नाही. मात्र हे सांगत असतानाच तात्त्विक दृष्ट्या भेद नाहीच. ज्याला मी माझी स्वामिनी मानतो ती देखील म्हणजेच भगवान कृष्णही काळाच आहे असे संत म्हणतात आणि अद्वैत सूचित करतात असे मला नम्रपणे वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://youtu.be/btRvQZn6F5A

दोन चार महिन्यापूर्वीच हे गाणे समजले , मग भरपूर वेळा ऐकून झाले , भूप देसकारचे स्वर आहेत , छान आहे

खूप छान लिहिलंय.
विष्णुदासनामा आणि नामदेव महाराज वेगळे. नामदेव महाराज तेराव्या-चौदाव्या शतकातले, तर विष्णुदासनामा सोळाव्या शतकातले.

आपल्याकडे काळा रंग दु:ख, दारिद्र्याचे प्रतिक समजले जाते.
परंतु संत नामदेवांना तोच रंग अद्वैताचा भासला. विठ्ठलाशी एकरूप होण्याचा तो मार्ग सापडला.
गाणे ऐकतांना अनेक भावनांचा कल्लोळ आपल्या मनात झाला. गाण्याशी तो रिलेट झाला.

मस्त मस्त लेख व गाणे. पहिल्यांदा आम्ही हे पूर्वी आशोक हांडे ह्यांचा मंगल गाणी दंगल गाणी कार्यक्रम होत असे त्यात व पुढे त्याची कॅसेट आम्ही हैद्राबादला नेउन प्रचंड वेळा ऐकलेली आहे. कोरस मध्ये तर ऐकायला अजोन भारी वाटते. आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद. आता ऐकेन परत. मला हे चांगले गाता पण येत असे.

आज छान काळी फुलांचे ब्लॉक प्रिंट वाली साडी नेसली आहे सो पार्ट रात्र काळी घागर काळी. एकद्म व्हांटा ब्लाक फीलिन्ग.

आज छान काळी फुलांचे ब्लॉक प्रिंट वाली साडी नेसली आहे सो पार्ट रात्र काळी घागर काळी. एकद्म व्हांटा ब्लाक फीलिन्ग.
>> अमा तुम्ही नेसले गं चंद्रकळा... हे गाणं गाऊ शकता.

छान विश्लेषण .
या गाण्याला जो वेगळा सुंदर पोत आला आहे तो केवळ गायकांच्या आवाजामुळे ! निर्मळ , सोज्वळ या शब्दांचा अर्थ सांगणारा आवाज.

सकाळपासून हेच गाणे मनात घोळतंय. BLACKCAT ह्यांनी दिलेल्या दुव्यामुळे ऐकलेही गेलेय. धन्यवाद BLACKCAT

या गाण्याला जो वेगळा सुंदर पोत आला आहे तो केवळ गायकांच्या आवाजामुळे ! निर्मळ , सोज्वळ या शब्दांचा अर्थ सांगणारा आवाज. >>>> +१

हया गाण्यातले आवाज गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर ह्यांचे आहेत असे नेटवर लिहिलेले आढळले. संगीत दत्ताराम गाडेकर ह्यांचे आहे. तसेच स्त्री गायिकांच्या आवाजाला कोरस म्हणून टाकले आहे. मला तरी स्त्री गायिकाही दोनपेक्षा जास्त वाटत नाहीयेत. त्यांचीही नावे द्यायला हवी होती. कोणाला माहित आहेत का त्यांची नावे? सुरेल आहेत त्यांचेही आवाज.

मी माझया स्मरणशक्तीच्या भरवाशावर आजगावकारांचे नाव घेतले. माझी चूक असू शकते नव्हे असणारच; जर तशी नावे दिली असतील तर. पण तरीही आवाजाबद्दलची माझी भावना तीच राहील.

अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व !

या गाण्याला जो वेगळा सुंदर पोत आला आहे तो केवळ गायकांच्या आवाजामुळे ! निर्मळ , सोज्वळ या शब्दांचा अर्थ सांगणारा आवाज.>>>>> अगदी अगदी!

ब्लॅक कॅट यांना लिंकबद्दल धन्यवाद!

त्या गाण्यातला बुंथ म्हणजे काय? त्या व्हिडियोत बुंथ म्हणजे veil सांगितले आहे.पण खटकतंय.

अतुल, लेख मस्तच आहे. पण फोटो अप्रतिम आहे.

बुंथीवरची चर्चा इथे वाचा. त्यावेळेस मायबोलीवर वाद कमी चर्चा जास्त व्हायच्या Wink

https://www.maayboli.com/node/2229?page=26

छान आहे गाणे, रच्याकने, आठवणीतली गाणी वेबसाईटवर ब्लॉग आहे यावर.. छान आहे तो पण.

किती अप्रतिम, ओघवतं, समजेल अशा शब्दांत लिहिलंय. दंडवत तुम्हाला.

BLACKCAT लिंक बद्दल धन्यवाद. अप्रतिम गाणं. अगदी लहानपाणी ऐकलं आहे रेडीओवर आणि tv वर पण बहुतेक हांडे यांच्याकडून ऐकल्याचं आठवतं.