मी शाळेत होतो तेव्हा तेंडुलकरांच्या पुस्तकांशी ओळख झाली. रातराणी, कोवळी उन्हे, हे सर्व कोठून येते? हे ललित गद्य मी वाचलं होतं. आवडलंही होतं. तेंडुलकरांशी खरी ओळख मात्र जरा नंतर झाली.
भारतीय नाट्यसृष्टीला ज्या नाटककारांनी वेगळं वळण दिलं, त्यांत श्री सतीश आळेकर व श्री महेश एलकुंचवार अग्रभागी होते. तेंडुलकरांनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या नाटकाचं कौतुक झालं, ते हे दोन नाटककार.
१ जानेवारी १९०८ रोजी, वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. संगीत मदालसा, संगीत दामिनी ही पुढची नाटकंही बरीच गाजली. वन्स मोअर घेत घेत केशवराव अख्खी रात्र प्रेक्षकांना गुंगवून ठेवत. आनंदराव मेस्त्री, बाबुराव पेंटर यांचं नेपथ्यही चर्चेचा विषय झालं होतं. १९१३ साली वीर वामन जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात प्रथमच कंपनीनं लाल, मखमली पडदा वापरला. असे अनेक पायंडे कंपनीनं पुढे पाडले, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.
तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.
मित्राची गोष्ट या तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकाचं दिग्दर्शन श्री. विनय आपटे यांनी केलं होतं. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचीच ती सुरूवात होती. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या श्री. विनय आपटे यांना मित्राची गोष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटतं.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. विनय आपटे यांचं हे मनोगत...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
रंगभूमीची अप्रतिष्ठा होईल, वा तिचं पावित्र्य बिघडेल म्हणून मी माणसांचे हे जिणे नाटकाबाहेर ठेवायला मी तयार नाही. रंगभूमीपेक्षा माझ्या दृष्टीने माणसे आणि त्यांचे आयुष्य कधीही महत्त्वाचे आहे. एखाद्या प्रकारचे आयुष्य बाहेर ठेवून रंगभूमी पवित्र राहणार असेल, तर त्या पावित्र्याविषयी मला प्रेम नाही. माझी मराठी रंगभूमी मेलेल्या ’काल’ची किंवा ’आज’ची आहे म्हणून तिने एका सुस्थित जगाचीच स्वप्नरंजनात्मक वातड चित्रे रंगवीत जगता कामा नये. तिने आजचे, या घटकेचे खरेखुरे जगणे, काहीवेळा त्यातील उघडेवागडेपणासकट, सच्चेपणाने, अर्थपूर्णपणे व समर्थपणे दाखविले पाहिजे. सच्चेपणात मला तिची ताकद वाटते. - श्री.
रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.