मित्राची गोष्ट या तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकाचं दिग्दर्शन श्री. विनय आपटे यांनी केलं होतं. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचीच ती सुरूवात होती. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या श्री. विनय आपटे यांना मित्राची गोष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटतं.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. विनय आपटे यांचं हे मनोगत...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
तेंडुलकर एका साप्ताहिकात कार्यकारी संपादक होते तेव्हाची गोष्ट. पुलं त्याच साप्ताहिकात एक सदर लिहीत असत. एकदा ते आपल्या एका मित्राला घेऊन तेंडुलकरांच्या कचेरीत गेले. मित्राची ओळख करून दिली - हा वसंता सबनीस. कविता करतो. पण मर्ढेकरांसारखा कवडा नव्हे, कवी आहे. तेंडुलकरांना मर्ढेकरांबद्दलचे हे अपशब्द खटकले नाहीत. पुढे पुलं आणि सुनीताबाईंनी मर्ढेकरांच्या कवितांचं जाहीर वाचन केलं. काव्यवाचनाचा हा कार्यक्रम बराच गाजला. तेंडुलकरांनीही पुलंच्या या कार्यक्रमाबद्दल लिहिलं. मर्ढेकरांच्या कवितांबद्दल लिहिलं. तेंडुलकर लिहितात - मर्ढेकर तेच होते. त्यांच्या कविताही त्याच होत्या.