नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत

Submitted by चिनूक्स on 10 January, 2010 - 13:51

१ जानेवारी १९०८ रोजी, वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. संगीत मदालसा, संगीत दामिनी ही पुढची नाटकंही बरीच गाजली. वन्स मोअर घेत घेत केशवराव अख्खी रात्र प्रेक्षकांना गुंगवून ठेवत. आनंदराव मेस्त्री, बाबुराव पेंटर यांचं नेपथ्यही चर्चेचा विषय झालं होतं. १९१३ साली वीर वामन जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात प्रथमच कंपनीनं लाल, मखमली पडदा वापरला. असे अनेक पायंडे कंपनीनं पुढे पाडले, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणार्‍या एका लखलखत्या अध्यायाची ही सुरुवात होती.

संस्थेनं पुढे मामा वरेरकर, वीर वामन जोशी, यशवंतबुवा टिपणीस यांची अनेक नाटकं रंगमंचावर आणली. केशवरावांचा अभिनय आणि गाणं या दोहोंच्या जोरावर कंपनीनं मराठी प्रेक्षकाला पुरतं जिंकलं होतं. केशवरावांची लोकप्रियता इतकी की ते कंपनीबरोबर एखाद्या गावात येत तेव्हा वाटेत फुलांच्या पायघड्या घातल्या जात न. चिं. केळकर, पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या हस्ते केशवरावांचे भव्य नागरी सत्कार केले गेले. आणि तरीही कंपनीनं नवनवीन प्रयोग सुरूच ठेवले. छत्रपती शाहू महाराजांच्या विनंतीवरून कोल्हापुरात उघड्या रंगमंचावर प्रथमच संगीत मृच्छकटिकचा प्रयोग केला गेला. संगीत मानापमान कंपनीनं सादर केलं तेव्हा धैर्यधराची भूमिका केशवरावांनी साकारली होती, आणि भामिनी झाले होते बालगंधर्व.

एकूणच, मराठी रंगभूमीचा तो सुवर्णकाळ होता आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले या त्रयीनं त्या काळात मराठी रंगभूमीला नवीन झळाळ दिला होता.

४ ऑक्टोबर १९२१ रोजी केशवरावांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एकच हलकल्लोळ माजला. मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवणार्‍या ललितकलादर्श नाटकमंडळीचं पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र मृत्यूपूर्वी केशवरावांनी कंपनीची सारी सूत्रं श्री. व्यंकटेश बळवंत तथा बापुराव पेंढारकरांच्या हाती सोपवली होती.

१९१५ साली बापुरावांनी कंपनीत प्रवेश केला होता. शरीरयष्टी दणकट नव्हती, आवाजही मंजूळ नव्हता. पण अभिनय मात्र जोरकस होता. त्यातच त्यांच्या पल्लेदार आवाजानं प्रेक्षकांन भुरळ घातली. केशवरावांच्या नायिकेच्या रुपात मग बापुरावांनी रंगभूमी गाजवून सोडली. भामिनी, देवांगना, वसंतसेना, किशोरी, मंजिरी अशा अनेक स्त्रीभूमिका त्यांनी साकारल्या. केशवराव गेल्यानंतर मामा वरेरकरांनी लिहिलेलं संगीत सत्तेचे गुलाम बापुरावांनी रंगभूमीवर आणलं आणि त्यातली वैकुंठ ही नायकाची भूमिका साकारली. कृष्णार्जुनयुद्ध, वधुपरीक्षा, संगीत शिक्का कट्यार अशी अनेक नाटकं बापुरावांच्या कारकीर्दीत रंगमंचावर आली. कंपनीनं १९३३ साली सांगलीत आपला रौप्य महोत्सव दणक्यात साजरा केला.

१९३७ साली बापुरावांचं अकाली निधन झालं आणि १९४२ साली बापुरावांचे चिरंजीव, श्री. भालचंद्र व्यंकटेश तथा अण्णा पेंढारकरांनी, वयाच्या सोळाव्या वर्षी, कंपनीची सूत्रं हाती घेतली. बापुरावांच्या मृत्यूनंतर कंपनीची घडी पार विस्कटली होती. कर्जही भरपूर होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी अण्णांनी जुनीच नाटकं काही काळ सादर केली. सत्तेचे गुलाम, भावबंधन, संगीत सोन्याचा कळस ही नाटकं प्रेक्षकांना आवडतील असा अण्णांचा कयास होता. शिवाय या नाटकांत काम करायला चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले अशी कसदार गायक-नटमंडळी होती. भावबंधनमध्ये तर लतिकेचं काम लता मंगेशकरांनी केलं होतं. मात्र प्रेक्षकांची अभिरुची आता बदलली होती. एकेकाळी अफाट गाजलेली ही जुनी नाटकं प्रेक्षकांना आता पसंत पडत नव्हती. श्री. पु. भा. भाव्यांनी लिहिलेलं स्वामिनी हे सामाजिक नाटक मग अण्णांनी ललितकलादर्शतर्फे सादर केलं आणि कंपनीची घोडदौड सुरू झाली. बाळ कोल्हटकरांचं दुरितांचे तिमिर जाओ, श्री. विद्याधर गोखल्यांचं पंडितराज जगन्नाथ, बावनखणी, जय जय गौरिशंकर, आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे अशी अनेक नाटकं भरपूर गाजली. आणि यात अण्णांचा मोलाचा वाटा होता.

अण्णांचं अभिनय व गानकौशल्य वादातीत होतं. ग्वाल्हेर घराण्याच्या पं. रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून त्यांनी तालीम घेतली होती. केशवराव भोसले व बापुराव पेंढारकरांनाही वझेबुवांनीच तालीम दिली होती. या जोमदार गाण्याच्या जोरावर अण्णांनी अनेक नाटकांत नायकाच्या भूमिका अप्रतिम रंगवल्या. अभिनय, गाणं याबरोबरच अण्णांचं व्यवस्थापनकौशल्यही वाखाणलं गेलं. कर्जबाजारी झालेल्या नाटककंपनीला अण्णांनी वैभवाच्या शिखरावर पोहोचवलं. अनेक पराक्रम गाजवले. कंपनीच्या अनेक नाटकांनी हजार प्रयोगांचा टप्पा गाठला.

ललितकलादर्श हा भारतीय रंगभूमीचा एक गौरवशाली ठेवा आहे. आज ललितकलादर्श १०२ वर्षांची आहे. अण्णांनी नव्वदी ओलांडली आहे. कंपनीनं आणि अण्णांनी या प्रचंड मोठ्या काळात अनेक परिवर्तनं अनुभवली. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, बालगंधर्व, मामा पेंडसे, बापुराव पेंढारकर हे नटश्रेष्ठ कंपनीच्या मंचावर वावरले. बाबुराव पेंटर, मा. विनायक, व्ही, शांताराम, भालजी पेंढारकर यांनीदेखील कंपनीत काही काळ काम केलं होतं. विजया मेहता, दामू केंकरे, सुधा करमरकर, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांनीही आपल्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे कंपनीतच गाठले.

झाला अनंत हनुमंत हे श्री. विजय तेंडुलकरांचं पहिलं नाटक अण्णांनी ललितकलादर्शतर्फे रंगभूमीवर आणलं होतं. दिग्दर्शन श्री. अरविंद देशपांडे यांनी केलं होतं. त्यांचंही हे पहिलंच व्यावसायिक नाटक. एका उडू शकणार्‍या सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं व्यंगात्मक चित्रण या नाटकात केलं होतं.

या नाटकाबद्दल सांगत आहेत नटश्रेष्ठ भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर...

BP.jpg

झाला अनंत हनुमंत या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक २ जानेवारी १९६८ रोजी संगीत, नाट्य व प्रयोगशीलता यासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या ललितकलादर्श या संस्थेच्या हीरकमहोत्सवात झाला. व्यावसायिक रंगभूमीवरील तेंडुलकरांचं हे बहुतेक पहिलंच नाटक होतं. या प्रयोगाला आणि त्यांच्या लेखनाला गौरवपूर्ण दाद द्यायला श्री. पु. ल. व सौ. सुनीताबाई देशपांडे आवर्जून हजर होते. अशा या नाटकाची पार्श्वभूमी सांगण्याआधी मला तेंडुलकरांविषयी जरा सांगावंसं वाटतं. त्यांचा आणि माझा खरा संबंध आला तो १९५२-५३च्या सुमारास. तेव्हा ते वसुधा मासिकात संपादक म्हणून होते. तेव्हा ते सेंट्रल सिनेमाजवळ राहत असत. तेव्हापासून त्यांची माझी जवळीक. त्यावेळी घराबाहेर या आचार्य अत्रे यांच्या नाटकात भैय्यासाहेबांची भूमिका त्यांनी केली होती व त्या नाटकाचा मार्गदर्शक मी होतो. (एखाद्याला रंगभूमीचा साक्षात अनुभव मिळाला आणि त्याच्यात लेखनाचे गुण असल्यास तो चांगला नाट्यप्रकार घडवू शकतो, अशी खूप उदाहरणं आहेत.) एखादा नट, एखादा लेखक आपल्याला आवडतो, पण प्रत्यक्षात आपला त्याच्याशी संबंध आलेला नसतो. तरीही आपण त्याच्यावर प्रेम करीत असतो. आपल्याला तो का आवडतो हे त्यावेळी सांगता येत नाही.

तेव्हा ते जे काही लेख लिहीत असत ते वाचून त्यांच्याविषयी माझ्या मनात एक चांगली भावना निर्माण झाली होती. अशात दादर स्टेशनावर एक प्रसंग घडला, तो गंमत म्हणून गप्पागोष्टींत मी त्यांना सांगितला. त्यावर त्यांनी अगदी गमतीदार एक लेख लिहिला. त्यावेळी मनात आलं की हा एक चांगल्या तर्‍हेचा लेखक आहे.

१९५४ साली मी एक नाट्यविषयक चळवळ संघटीत केली होती. ती चळवळ नाटकावरचा करमणूक कर रद्द व्हावा यासाठीची होती. मी प्रत्यक्ष प्रत्येकाला भेटून, सह्या गोळा करून वैयक्तिक पातळीवरती आणि नाट्यपरिषद वगैरे ज्या संस्था आहेत, त्या पातळीवरही प्रयत्न केले. प्रचाराचा भाग म्हणून नाटकाच्या प्रयोगप्रसंगी रंगभूमीवर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. साधारण वीस मिनिटांचा हा कार्यक्रम मी स्वत: लिहून सादर केला होता. लोकांमध्ये अन्याय्य कारभाराविषयी जागृती व्हावी, हा त्या मागचा उद्देश. या चळवळीला, मी सादर केलेल्या कार्यक्रमाला तेंडुलकरांनी उत्तम प्रसिद्धी दिली. वसुधामध्ये एकदोन स्फुटंही लिहिली.

माझ्या वडिलांचा म्हणजे बापुराव पेंढारकरांचा १५ मार्च हा स्मृतिदिन. या पुण्यतिथीला मी तीन प्रयोगांनी तो साजरा केला, ते साल होतं १९५६. १५ मार्चला कृष्णार्जुनयुद्ध या संगीतनाटकाचा प्रयोग होता. खरं तर ते नाटक साडेचार तासांचं. पण त्याचा प्रयोग संकलित स्वरूपात अडीच तासात केला - अंक न पाडता. १६ मार्चला, म्हणजे दुसर्‍या दिवशी राजसंन्यास व त्याबरोबर मादी या तेंडुलकरांच्या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. एका हौशी संस्थेने मादी हा प्रयोग केला व माझ्या आठवणीप्रमाणे त्याचं दिग्दर्शन विजया जयवंत (आताच्या मेहता) यांनी केलं होतं.

विजया जयवंत, सुधा करमरकर, नंदकुमार रावते, आनंद पै, दामू केंकरे हे तरुण मंडळी तेव्हा नुकतीच पुढे आली होती. त्यावेळी हौशी संस्था फारशा नसायच्या. या मंडळींनी ललित कला केंद्र ही संस्था काढायची योजना आखली. ही संस्था ललितकलादर्श या व्यावसायिक संस्थेची हौशी विंग अशी कल्पना! या संस्थेला विजय तेंडुलकर, रघुनाथ तेंडुलकर ही मंडळीही येऊन मिळाली. सर्वानुमते या संस्थेचा मला अध्यक्ष करण्यात आलं. रावते सेक्रेटरी व आनंद पै खजिनदार. संस्था तर स्थापन झाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला केंद्राचा अध्यक्ष करताय, माझ्याकडून जे जे काही साहाय्य तुम्ही मागाल ते मी देईनच. पण नाटक ठरवणं, त्यातील पात्रं ठरवणं वगैरे बाबतीत माझा हस्तक्षेप कुठंही असणार नाही!

ललित कला केंद्रातर्फे नाटकं चालू झाली. तेंडुलकरांचं माणूस नावाचं बेट हे नाटक (ज्यात डॉ. काशिनाथ घाणेकरांनी भूमिका केली होती), तसंच सौभद्र या नाटकाचा नवीन धर्तीवर प्रयोग (स्थळ : भारतीय विद्या भवन, नेपथ्यकार : आनंद पै), जोगांचं तीन अंकी हॅम्लेट (दिग्दर्शक : दामू केंकरे) असे आणखी काही प्रयोग केले.

ललितकलेच्या सहवासात
हे पुस्तक ललितकलादर्शचे नेपथ्यकार श्री. पु. श्री. काळे यांनी लिहिलं व त्याचा प्रकाशक मी होतो. या पुस्तकाच्या संपादनापासून तपासणीपर्यंत सर्व काम तेंडुलकरांनी अतिशय जिव्हाळ्यानं केलं. ते पुस्तक १९५६ साली प्रसिद्ध झालं. असं करता करता ललितकलादर्शचा सुवर्णमहोत्सव आला १९५८ साली. मी तेंडुलकरांना सांगितलं की, या उत्सवाला तुमचं नाटक मला पाहिजे.पण काही कारणाने ते लिहू शकले नाहीत. म्हणून मग बाळ कोल्हटकरांचं आकाशगंगा हे कल्पनारम्य नाटक रंगभूमीवर आणलं!

इथपासून तेंडुलकरांचा नाट्यलेखनाविषयीचा माझा संबंध तुटला. नंतर त्यांनी नाट्यस्पर्धेसाठी नाटकं लिहिली. माझा तेंडुलकरांशी संबंध जवळजवळ आला नाहीच पण तरी मी जिंकलो! मी हरलो! हे नाटक त्यांनी मला अर्पण केलं, त्यावरून ते मनानं माझ्या जवळच होते, असं म्हणायला पाहिजे. तेंडुलकरांचं झाला अनंत हनुमंत हे नाटक मी ललितकलादर्शसाठी पुढे निवडलं त्याला ही अशी पार्श्वभूमी आहे.

मी एकदा मालवणला गेलो असता तिथल्या एका शिक्षकांनी (श्री. आ. ना. पेडणेकर) मला एक नाटक वाचायला दिलं. त्यातली मध्यवर्ती कल्पना मला आवडली. एका इंग्रजी कथेच्या आधारे त्यांनीते लिहिलं होतं. पण पेडणेकरांना नाट्यतंत्राचा अनुभव नसल्यानं ते खूप कच्चं होतं. पेडणेकरांना मार्गदर्शक सूचना करूनही त्यांना पुनर्लेखन करता आलं नाही. दोन महिने त्या नाटकावर विचार करत होतो. माझ्या कल्पनेतलं नाटक होण लिहू शकेल? तेंडुलकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली.

हा विषय तेंडुलकरांशिवाय दुसरा कोणीही चांगला लिहू शकणार नाही, असं मला ठामपणे वाटलं. पेडणेकरांच्या पूर्ण संमतीनं मी तेंडुलकरांना भेटलो - विचारलं. त्यांना कल्पना आवडली. मला खात्री होतीच. मी त्यांना म्हणालो, ललितकलादर्शच्या सुवर्णमहोत्सवात तुम्ही लिहू शकला नाहीत, पण आता ललितकलादर्शचा हीरक महोत्सव साजरा होतो आहे. त्यात एकीकडे कवीकर्य ग. दि. माडगूळकर लिखित गीत सौभद्र या संगीतिकेचा प्रयोग होणार आहे (संगीत दिग्दर्शक : वसंत देसाई). दुसरीकडे हे तुमचं प्रायोगिक नाटक होऊ द्या.

पहिला अंक त्यांनी वाचून दाखवला, त्याचं जाहीर वाचन झालं - माझ्यासहीत सर्वांना आवडला. नाटकाची रीतसर घोषणा झाली. नंतर विचार आला की, या नाटकाला न्याय देईल असा दिग्दर्शक कोण? एकच दिग्दर्शक डोळ्यासमोर आला - अरविंद देशपांडे. अरविंदना विचारलं, त्यांनी होकार दिला. देशपांडे यांचं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं दिग्दर्शन होतं. त्यांना नाटक आवडलं. पण ते म्हणाले, अण्णा, हे नाटक तुम्ही रंगभूमीवर आणता आहत खरं, प्ण ते व्यवसाय कितपत करील याविषयी मी साशंक आहे. मी म्हटलं, एका मान्यवर लेखकाचं नाटक एका मान्यवर दिग्दर्शकाला घेऊन मी रंगभूमीवर आणतो आहे. विषय चांगला आहे. उत्तम निर्मिती आणि प्रायोगिकता यांसाठी ललितकलादर्श प्रसिद्ध आहे. त्यातूनही तिच्या हीरकमहोत्सवाला धाडस करायचं नाही तर कधी? व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक चाललं नाही तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही. कारण त्या दृष्टीकोनातून हे नाटक मी निवडलेलंच नाही. अरविंद, तुम्ही तीन अंकी हॅम्लेटमध्ये भूमिका करत होतात - त्या वेळच्या माझ्या अनुभवाला अनुसरून सांगतो की, लेखन, दिग्दर्शन यांत मी ढवळाढवळ करणार नाही. तुम्हांला पाहिजे ते मिळेल. पात्रयोजना तुम्ही ठरवायची, नेपथ्यकार तुम्ही ठरवायचा.

नाटकाची प्रक्रिया सुरू झाली. नेपथ्यकार म्हणून तळाशीलकरांची नियुक्ती अरविंद यांनी केली. पात्रयोजनेच्या वेळी थोडा गमतीदार प्रसंग घडला. अरविंदने माझ्या सौ. म्हणजे मालतीबाईंना बोलावलं, मेहुणीला बोलावलं, मुलगी गिरीजाला बोलावलं. तेव्हा मी म्हटलं, काय सगळी घरचीच मंडळी जमा केलीत! तर त्यांनी त्यांच्या मिष्कील आवाजात सांगितलं की, अण्णा, मी तुम्हांलाही सोडणार नाही. त्या नाटकात जो कीर्तनकार आहे, तो तुम्ही करायचा. या नाटकातल्या कीर्तनकाराचं नाव तेंडुलकरांनी पंढर असं ठेवलं आहे. पेंढारकर या आडनावाशी नाटककारानं अशी जवळीक साधली होती. मी महोत्सवाच्या व्यापात असूनही भूमिका करायचं मान्य केलं. प्रमुख भूमिकेसाठी गणेश सोळंकी यांची नियुक्ती आणि साइड रोलसाठी एका कल्पक कलावंताची निवड झाली. हा कलावंत म्हणजे सखाराम भावे. असं ते नाटक उभं राहिलं.

नाटकाच्या वाचनातून जे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, म्हणजे मला जे पाहिजे होतं, जे मूळ लेखकाकडून मी मिळवू शकलो नाही, ते सामाजिक व्यंगचित्रात्मक नाटक तेंडुलकरांनी उभं केलं. मध्यवर्ती कल्पना तशीच ठेऊन ते नाटक लेखनात असं काही रंगवलं की बस्स! सुरुवातीला पाऊस पडतोय... मध्यांतरात माणूस कपाटावरून खिडकीतून पळून जातोय आणि..उडतो..उडतो म्हणजे काय? तर माणूस उडतो! हा उडणारा माणूस म्हणजे अनंत - पावसातून भिजून उशिरा घरी येतो - पण त्याची बायको आल्या आल्या विचारते - काय, पगाराचं पाकीट सांभाळून आणलंस ना? - असे कितीतरी व्यंगचित्रात्मक प्रसंग सांगता येतील. सुरेख! प्रयोग मला वाटला होता त्यापेक्षाही उत्तम झाला. पण.. पण लोकांना भावला नाही. हां, त्याची कारणं मात्र तांत्रिक आहेत. नाटक ही गोष्टच मुळात खोटी. नट अभिनय करत असतो, ते सत्य भासवैणं हे त्याचं कौशल्य. आता नाटकात अनंत म्हणतो, तुम्हांला खरं नाही वाटत मी उडतो ते? हा पहा मी उडालो! असं म्हणून तो उडून कपाटावर जाऊन बसतो. पहिल्या प्रयोगात हे प्रत्यक्ष घडलंच नाही. जेव्हा तो सारखा सांगतो, मी उडू शकतो, मी उडू शकतो, मी उडतो - पण प्रत्यक्षात ते दाखवता आलं नाही तर? तर काय, प्रेक्षकांचा पूर्ण अपेक्षाभंग. या प्रयोगात ही तांत्रिकता न जमल्यानं नाटकाच्या क्ल्यायमॅक्स सीनला - मैदानावर हजारो लोक त्याचं उड्डाण पहायला जमले आहेत - या दृश्याच्या पार्श्वभूमीवर त्याला दोरीनं ओढून घेतला गेला आणि त्यामुळे तो हास्यास्पद झाला. लेखकानं लिहिलेला भावनात्मक प्रसंग वाया गेला, नाटकाची मध्यवर्ती कल्पनाच बिघडली. नाटकात उभं राहिल्यानंतर माझं पाठांतर झालं नाही, तालमी झाल्या नाहीत, हे सांगण्यात जसा अर्थ नसतो, तसंच हे.

असं का घडलं (सर्व योजना आखूनही) हेही सांगण्यात अर्थ नाही. त्या दिवशी प्रयोग फसला. पण मी, अरविंद आणि सखाराम भावे यांनी जिद्द सोदली नाही. तिसर्‍या प्रयोगाला ते उड्डाणतंत्र यशस्वी झालं. कल्पक भावे यांनी सायकलीच्या पॆडलचा उपयोग करून अनंताला लोकांच्या डोळ्यादेखत खुर्चीवरून कपाटावर अलगद बसवला. टाळ्यांचा प्रचंड कडकडात झाला. या नाटकात अरविंदही भूमिका करत होते, त्यांनी दाद दिली. प्रेक्षकांना कल्पना भावली. असं वाटलं, आता हे नाटक चालेल. पण नाही. ते घसरलं ते घसरलंच. जेमतेम २५-३० प्रयोग झाले.

तेंडुलकरांना मी प्रतिभावंत, दर्जेदार नाटककार मानतो. त्यांची श्रीमंत, मी जिंकलो! मी हरलो! वगैरे पुष्कळ नाटकं बघितली. त्याचंचं संवादलेखन हे फार धारदार-टोकदार असतं, त्यात काव्यगुणही आहेत. त्यांचं सरी गं सरी हे नाटक पाहताना विचार आला, हे तेंडुलकर का? त्यांची आणखी काही नाटकं पाहिली, तेव्हा असं कधी वाटलं नाही. सखाराम बाइंडर पाहताना तर मला वाटलं की, नाटक कसं लिहावं या तंत्राची जाण या लेखकाला पुरेपूर दिसते. आता तेंडुलकरांच्या नाटकांसंदर्भात बोलतो आहे म्हणून सांगतो, घाशीराम कोतवाल या नाटकाविषयी...

कै. वसंतराव देशपांडे यांनी (मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षस्थानी असताना) असं विधान केलं की, आजच्या युगाचं संगीत नाटक कोणतं असेल तर ते घाशीराम कोतवाल. या त्यांच्या विधानावर मी त्यांच्याशी वाद केला. सभा-मंचावर एकत्र बोलण्याचीही तयारी दर्शविली. त्यांच्या या मतशी मी मुळीच सहमत नव्हतो. माझ्या मते घाशीराम हे नाटक विष्णुदास भाव्यांच्या प्रथेची सुपरफाइन आवृत्ती आहे. त्याच्यात संगीताचा वापरही प्रथेला धरून आहे. जब्बार पटेलांनी एक चांगली कलाकृती निर्माण केली आहे, यात वादच नाही.

घाशीराम कोतवालविषयी ज्या लोकांनी आक्षेप घेतले त्यांत मीही होतो.माझा आक्षेप प्रयोगाविषयी नव्हता, लेखनाविषयी नव्हता, तर लेखकाच्या वृत्तीविषयी होता. तेंडुलकरांनी पुढाकार घेऊन सांगायला हवं होतं की, होय, मला हेच म्हणायचं आहे.असं न करता ऐतिहासिक-अनैतिहासिक असं हे नाटक आहे वगैरे शब्दप्रयोग करून त्यांनी पलायनवाद स्वीकारला. यामुळे आविष्कारस्वातंत्र्याचा पाठपुरावा करणार्‍या त्यांच्यासारख्या दर्जेदार लेखकानं (असाच पाठपुरावा करणार्‍या अनेकांप्रमाणे) सोयीनुसार पळपुटेपणा केलेला पाहून मन खट्टू झालं. लेखनकलेत खरा, पण वृत्तीनं खोटा असा हा लेखक आहे, असं मला वाटून गेलं.

तेंडुलकर जेव्हा हौशी रंगमंचावरून व्याव्सायिक क्षेत्राकडे वळले तेव्हा हा दोष, ही वृत्ती निर्माण झाली का? दोष त्यांच्या दृष्टीनं नसेलही - दोष असा की एखादा भडक विषय घ्यायचा, जेणेकरून त्यांच्यावर सार्वत्रिक चर्चा होईल - आशयापेक्षा विषयाला महत्त्व प्राप्त होईल! त्यांची सगळी नाटकं घेतली तर त्यांतली खरी प्रायोगिक किती आणि वरवर यशस्वी, म्हणजे खूप चर्चा वगैरे लाभलेली किती, याचा कुणीतरी आढावा घ्यायला हवा.

मात्र आजही मला माझ्या संस्थेतर्फे तेंडुलकरांचं नाटक करायाला आवडेल. कारण त्यांच्या लेखनकौशल्यात आणि माझ्यात अजिबात दुरावा निर्माण झालेला नाही. कलाकृती वेगळी आणि एखाद्या विषयीची वैयक्तिक मतं वेगळी. तेंडुलकरांना अनेक मानसन्मान मिळाले, त्यांची लेखनपताका जगभर फडकली याचा मला अतिशय आनंद वाटतो.

*********

विशेष आभार - श्रीमती सुलभा देशपांडे व श्री. अरुण काकडे

वरील मनोगतातील काही भाग श्री. भालचंद्र पेंढारकर यांनी श्री. अरविंद देशपांडे स्मृतिमहोत्सवात केलेल्या एका भाषणावर आधारित आहे. या भाषणावर आविष्कार, मुंबई यांचा प्रताधिकार आहे.

श्री. भालचंद्र पेंढारकर यांचं छायाचित्र ललितकलादर्श यांच्या सौजन्याने. प्रताधिकार राखीव.

Group content visibility: 
Public - accessible to all site users