मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले
उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे
किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले
या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे
तुमच्या जाण्याने जग सुने झाले
सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||
किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||
रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||
कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान
दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून
रिक्त राहीले स्वतः केले दुसर्यांचे भले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३||
डोकं जरा कर थंड
मन जरा हलकं
काय सांगू देवा तुला
आभाळ झालं परकं
कळतं तर सगळंच
फक्त वळता वळत नाही
डोळ्यांतलं दुखरं पाणी
खळता खळत नाही
शब्दाचं स्पेलिंग ठरवूनसुद्धा
एकदाही चुकत नाही
हात थरथरला तरी
अशुद्ध लिहिणं जमत नाही
पण नजरेतली अबोल शाबासकी नसेल
तर सारंच ठरतं व्यर्थ
बदलून गेलेत आता
सगळ्या शब्दांचेच अर्थ
स्मरणातल्या बाप्पा
बाप्पाला आणायचात तुम्ही
भक्तीनं अन् हौसेनं
तुम्ही देखणे आणि बाप्पाही
आम्ही पळायचो मस्तीनं
आताच्यासारखी तेंव्हा
सजावट नसायची खूप
जुन्याच मोत्याच्या माळेने
बाप्पांचं खुलायचं रूप
एक रंगीत लाईटचा दिवा
तुम्ही सांभाळून लावलेला
बाप्पांपुरताच कोनाडा
डिस्टेम्परने सजलेला
मोठमोठ्यानं म्हणायची
तुमच्यासोबत आरती
शब्द विसरायचा एखादा
नजर जायची खालती
भूलवायचा आम्हाला
मोदकांचा ढीग
घरोघरच्या प्रसादाची
लावायची रीघ
जुनाच कागदाचा पंखा
आणि टिकल्यांचे तोरण
तेंव्हा तुमची आठवण येते
जेंव्हा उन्ह निर्दयपणे भाजून काढतं
जमीन सोसते मुकाट पोळणारे वार
जीव तडफडतो पाण्याच्या एका थेंबासाठी
आतल्या काहिलीला सोसणं असह्य होतं
तेंव्हा तुमची आठवण येते
जेंव्हा लहानपणीच्या ओळखीचा आभाळातला राक्षस गडबडा लोळतो
नुसताच गडगडाट, नुसतीच हूल
न संपणारी प्रतीक्षा आणि फसवी चाहूल
आतला पाऊस आत आणि वरचा पाऊस वर गोठलेलाच राहतो
तेंव्हा तुमची आठवण येते
कळतं तर सगळंच
फक्त वळता वळत नाही
डोळ्यांतलं दुखरं पाणी
खळता खळत नाही
मनात हिंमत
डोळ्यांत जरब
निग्रही ओठ
आणि देणारे हात
असा होता माझा बाप !
कणा ताठ
रक्तात स्वाभिमान
मोजकेच शब्द
खोलवर परिणाम
मान आमची सर्वांची
सदैव ठेवली ताठ
असा होता माझा बाप !
झिजला लेकरांसाठी
कष्टला अपार
धैर्याने तुडवले
संकटांचे डोंगर
माया फक्त पोटात
पण ओठांवर ठेवला धाक
असा होता माझा बाप !
झळाळता तारा आहात तुम्ही माझा
खूप जवळ पण तरीही खूप दूर
स्पर्शतच असेल ना तुम्हालाही
अश्रूंचा अदृश्य महापूर
पण या जगात भावनेला किंमत नाही
आणि सत्य स्वीकारण्याची माझ्यात हिंमत नाही ….