थकल्या सगळ्या ह्या पाऊलखुणा
येशील पुन्हा ह्या वाटेवर ना?
वाटेत उन्ह ते अजुनी पडे
तू ऊब सावलीची होशील ना?
दारात प्राजक्त अजूनी उभा
तू बहर तयाचा होशील ना?
ते तळे कधीचे आसुसले
तू मेघ सावळा होशील ना?
तो मारवा कधीचा तळमळतो
तू षड्ज शेवटी होशील ना?
अडखळले प्राण डोळ्यांशी
तू दिठी तयांची होशील ना?
थकल्या सगळ्या ह्या पाऊलखुणा
येशील पुन्हा ह्या वाटेवर ना?
© निखिल मोडक
पाऊलखुणा
या, मित्रांनो या !
तरंगत या
मनाच्या माझ्या
भुसभुशीत मातीवर
पाऊलखुणा उमटवू नका
मैत्रीचा पुरावा ठेवू नका
आणि,
एकटं सोडून जातांना ....
तरंगत जा
आठवण कधी झालीच तर
मागेही वळून पाहू नका
विरहाचे गीत गावू नका
आठवणींना जागवू नका
मनाच्या माझ्या
भुसभुशीत मातीवर
पाऊलखुणा उमटवू नका.
इथवर कधी आले कळलंच नाही
मागे वळून पाहिलं तर माझ्या पाऊलखुणा
रस्त्यावर पसरल्या होत्या
काही स्पष्ट , काही धूसर ,
मातीवर विखुरल्या होत्या
उद्या यांचा माग घेत कोणी इथे येईल
मी कशी होते हे डोकावून पाहील
सगेसोयरे, गणगोत आणि असेच कुणीही
आणि अवचित कधीतरी तूसुद्धा येशील
सहजच घेतल्यासारखी माझी वही हातात घेशील
पण खरं तर माझ्या वहीत तुझं नाव शोधशील
ओळींवरून जेव्हा बोटं फिरवशील
तेव्हा ओळींच्या मध्येसुद्धा बघशील ना
हे स्वप्न
माझं की तुझं
कुणास ठाऊक कुणाचं?
आपण मात्र काम करायचं
स्वप्नामध्ये रंग भरायचं
ह्याच कामात मी रमले होते
पुढे पुढे जात होते
तुझ्या पाऊलखुणांचा मागोवा घेत होते
शेजारीच तर माझ्या पावलांच्या
खुणा होत्या
आणि तू मात्र प्रारंभालाच उभा होतास
स्वप्नासारखा!
मी मेल्यावर काय होईल
स्वप्न बघते एक दिवशी
माझी कविता अनाथ होईल
शब्दही सारे पोरके होती्ल
कुठे गेली माय म्हणूनी
काळीज खोल बडवून घेतील
कल्पनेच्या पंखा्वर बसूनी
शोध माझा घेत फ़िरती्ल
आकाशाचे ही फ़ाटेल ह्रुदय
धरतीला पण कणव येइल
पापणी पापणी ओली होईल
कवितेचाही मग उदय होईल
माझे बरेच गुणगान होईल
आठवाची मग रित होईल
दोन दिवस हाय होईल
आल्या दिवसाची साय होईल
आत तळाला सय जाईल
पातळ पाण्यासम प्रेम होईल
उकळत्या पाण्याची वाफ़ होईल
मला ढगात सोडून येइल
कल्पी जोशी
कुणीतरी आपलही असावं
डोळ्यातुन आत शिरणारं असावं
काळजाला हात घालणारं असावं
प्रेमाची कवाड खोलणारं असावं
कुणीतरी आपलही असावं
पाऊलोपावली सोबत चालणारं असावं
सावली होउन घेरणारं असावं
प्रेमासाठी झुरणारं असावं
कुणीतरी आपलही असावं
सुखात सोबत नाचनारं असावं
दु:खात पाठीवर हात फ़िरवणारं असावं
प्रेमाची भाषा जाणनारं असावं
कुणीतरी आपलही असावं
स्वरात स्वर आलापणारं असावं
मारव्याचे सूर झेलणारं असावं
प्रेमाचे सप्तसुर गाणारं असावं
कुणीतरी आपलही असावं
वादळ वारे थोपवणारं असावं
विजेची चाहुल जाणनारं असावं
प्रेमाचा पाऊस देणारं असावं
कुणीतरी आपलही असावं
आडपडदा मनात ठेवणारं नसावं