पोहती दिव्यांचे सोन हंस हळू जली
चुबुकळती कल्लोळी दिपाली वरखाली
थरथरते चंद्र बिंब हळू स्पर्शे कमल दली
लाजेने चूर होत कळी खुलते हळू गाली
श्रांत नाव थकलेली डूलते घाटा जवळी
दोर जागता झुलवी तिस मंद झोपाळी
चुकलेला कुणी पक्षी धडपडत ये खाली
कळपाशी ये मिळता निःशंक होय पली
आठवते कोणीसे कातरशा ह्या वेळी
दरवळत्या धूपासम मारवा मन गंधाळी
थकल्या सगळ्या ह्या पाऊलखुणा
येशील पुन्हा ह्या वाटेवर ना?
वाटेत उन्ह ते अजुनी पडे
तू ऊब सावलीची होशील ना?
दारात प्राजक्त अजूनी उभा
तू बहर तयाचा होशील ना?
ते तळे कधीचे आसुसले
तू मेघ सावळा होशील ना?
तो मारवा कधीचा तळमळतो
तू षड्ज शेवटी होशील ना?
अडखळले प्राण डोळ्यांशी
तू दिठी तयांची होशील ना?
थकल्या सगळ्या ह्या पाऊलखुणा
येशील पुन्हा ह्या वाटेवर ना?
© निखिल मोडक
स्वित्झर्लंडमध्ये तो माझा एक अत्यंत आनंदाचा दिवस होता. दिवसभर युंग्फ्रौ च्या कुशीत मनमुराद फिरलो होतो. स्वच्छ उन्हात वारा थंडीला वाट मोकळी करून देत होता. हिमकण खूळ लागल्यासारखे वाऱ्यावर नाचत होते आणि आणि एखादा हलकेच येऊन माझ्या तोंडावर तंबू ठोकत होता. समोर प्रचंड मोठी हिमनदी होती, आणि युगानुयुगे ती वाहत होती, त्यातुन येणारे हे हिमकण मला आपलं मानत होते हे केवढं मोठं सुख! अनादी काळापासून सुरु असलेल्या जलचक्रातून वाहून आलेले ते कण आणि २४ वर्षांचा मी, तरी सानथोरपणा न मानता ते माझ्याकडे आले हे निसर्गाचं औदार्य! असे विचार नकळत मनात येत होते आजूबाजूच्या शुभ्र-धवलामुळे आणि शहारायला होत होतं.
अशीच मोकळ्यावर होते
श्वास घेत निवांत एकदा
सांजेचे सूर उमटले होते
पश्चिमेवर केशरी कशिदा
वाराही गुणगुणत होता
हाती घेऊन निलशलाका
त्यालाही गवसला होता
मारवा तो हलका हलका
रंगानी स्वैर गुंफले होते
अमूर्त ईश्वरी चित्र निराळे
सूर त्यांचेही जुळले होते
जरी छटांनी होते वेगळे
मी त्यांतील एक रेष होते
मन मारव्यात होते हरवले
श्वास आता निवांत होते
क्षितिजावर आत्म विसावले
गवसतो सूर अनेकदा
मोकळ्यावर विसावताना
स्वरावतो श्वास अनेकदा
पुन्हा आयुष्यात परतताना
http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Mayevina%20Bal%20Kshanbha...
मायेविन बाळ, क्षणभरी न राहे
न देखता होय, कासावीस ॥
आणिक उदंड, बुझाविती तरी
छंद त्या अंतरी, माऊलीचा ॥
नावडती तया, बोल आणिकांचे
देखोनिया नाचे, मायदृष्टी ॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली
आणिकांचे बोली चाड नाही ॥
दिवसभर तापानं फणफणलीये पोर. दोन क्षणही खाली ठेवता आलं नाही. कसं करणार घरचं सगळं? गाई-गुजी, झाड-लोट, स्वयंपाकपाणी...
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सी.डी.वर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं, काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी.