अशीच मोकळ्यावर होते
श्वास घेत निवांत एकदा
सांजेचे सूर उमटले होते
पश्चिमेवर केशरी कशिदा
वाराही गुणगुणत होता
हाती घेऊन निलशलाका
त्यालाही गवसला होता
मारवा तो हलका हलका
रंगानी स्वैर गुंफले होते
अमूर्त ईश्वरी चित्र निराळे
सूर त्यांचेही जुळले होते
जरी छटांनी होते वेगळे
मी त्यांतील एक रेष होते
मन मारव्यात होते हरवले
श्वास आता निवांत होते
क्षितिजावर आत्म विसावले
गवसतो सूर अनेकदा
मोकळ्यावर विसावताना
स्वरावतो श्वास अनेकदा
पुन्हा आयुष्यात परतताना
मावळतीवर सुर्य उभा मग चंद्र कसा क्षितिजी दिसतो
घेत कडेवर शुभ्र ससा फसल्यागत किंचितसा हसतो..
ताम्रपटावर चंद्रसरी दिसतात सुरेख नभामधल्या
सोज्वळ सुंदर कैक पर्या फ़िरतात खुशाल ढगामधल्या..
नीळ तमातुन पाझरते नटतात दिशा बदलून छटा
लाजत सावरते अवनी पदरावरच्या अलवार बटा..
चांदणधूळ हवेसरशी हलकेच ढगांवर कोसळते
मावळता रविराज जरा चमकी क्षितिजावर ओघळते..
केशव वाजवुनी मुरली यमुनेवर रासक्रिडा करतो
रासक्रिडा अगदीच तशी गगनावर मारुतही करतो..
चादर घेत तनावरती घरट्यात हळूच रवी शिरतो
लाल उजेड ढगांमधला घसरून धरेवरती विरतो..
सागरलाट जणू उसळे गगनात तशा दिसती लहरी