Submitted by संतोष वाटपाडे on 21 January, 2015 - 23:29
मावळतीवर सुर्य उभा मग चंद्र कसा क्षितिजी दिसतो
घेत कडेवर शुभ्र ससा फसल्यागत किंचितसा हसतो..
ताम्रपटावर चंद्रसरी दिसतात सुरेख नभामधल्या
सोज्वळ सुंदर कैक पर्या फ़िरतात खुशाल ढगामधल्या..
नीळ तमातुन पाझरते नटतात दिशा बदलून छटा
लाजत सावरते अवनी पदरावरच्या अलवार बटा..
चांदणधूळ हवेसरशी हलकेच ढगांवर कोसळते
मावळता रविराज जरा चमकी क्षितिजावर ओघळते..
केशव वाजवुनी मुरली यमुनेवर रासक्रिडा करतो
रासक्रिडा अगदीच तशी गगनावर मारुतही करतो..
चादर घेत तनावरती घरट्यात हळूच रवी शिरतो
लाल उजेड ढगांमधला घसरून धरेवरती विरतो..
सागरलाट जणू उसळे गगनात तशा दिसती लहरी
उंच नभातुन कैक थवे निघतात पुन्हा अपुल्याच घरी..
शांत जलाशय शांत नदी खडकांवर येउन का बसले
रुंद तटासमवेत असे कुरवाळत दुःख बरे कसले...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही काही प्रतिमा लाजवाब....
काही काही प्रतिमा लाजवाब.... खूप आवडली!!!
चांदणधूळ हवेसरशी हलकेच ढगांवर
चांदणधूळ हवेसरशी हलकेच ढगांवर कोसळते>>>
चादर घेत तनावरती घरट्यात हळूच रवी शिरतो
लाल उजेड ढगांमधला घसरून धरेवरती विरतो..>>
शांत जलाशय शांत नदी खडकांवर येउन का बसले
रुंद तटासमवेत असे कुरवाळत दुःख बरे कसले...>>>>
मस्त आवडलीच! काय चित्र मस्त उभं करता तुम्ही कवितेतुन! एकदम भारी!
धन्यवाद महोदय....
धन्यवाद महोदय....