बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
प्लॅटफॉर्मवर तोबा वर्दळ होती. कुणी तिच्याकडे ढुंकून बघत नव्हतं. जो तो आपल्याच तंद्रीत!
त्याने तिच्यासारख्या छपन्न पाहिल्या होत्या.
ती तिकडे प्लॅटफ़ॉर्मच्या कोनाड्यात एकटीच बेफिकीर उभी. त्याने तिच्या आसपास नजर फिरवली. कुणी तिच्या सोबतीला नव्हतं. कुठून आली होती? कुठे जाणार होती? याची कुणालाही कसली कल्पना नव्हती.
तास उलटला. ती अजूनही तिथंच ढिम्म बेफिकीर!
समज!
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
हसऱ्या डोळ्याची, गोबऱ्या गालाची अगदी त्याच्या मितूसारखी..
तो जवळ जाऊन बसला. तिच्या हातात ‘बेबी अलाइव्ह’ होती. मितूला हवी होती तशी. परवा वाढदिवसाला द्यायची ठरवलं होतं त्याने..
खेळता खेळता तिच्या हातातली बाहुली खाली पडली. पटकन उठून त्याने ती उचलली. आणि तिच्या हातात देऊन तिचे दोन्ही हात घट्ट हातात धरले. ती ओरडली..
“मम्मा बॅड टच!”
त्याबरोबर मोबाईलवर बोलत असलेल्या मम्मीने त्याच्यावर जळजळीत नजर टाकत तिला उचलून घेतल़ं..
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
संमिश्र भावनांची सरमिसळ दिसत होती तिच्या चेहर्यावर. आनंद, उत्सुकता, धाकधुक, स्ट्रेस, अभिमान ... त्याला कल्पना होतीच. आतून तो बघत होता सगळं. बाकीचे आले, गाडीतून महत्वाची मंडळी आली. निरोपाचा क्षण जवळ येऊन ठेपला. विरहवेदना सहन करावीच लागणार जर पुढे 'सुखाचं चांदणं' अनुभवायचं असेल तर...निर्धार पक्का होता, 'उलटी गणना' सुरु झाली. तिचं रुप डोळ्यांत साठवत निघाला तो प्रवासाला. तिच्यासाठी कित्येक दिवस मैलोंमैल प्रवास करणार होता तो......
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले तसा तो चमकला "ही महामाया भर दुपारी आणखी काय करतेय इथे?? मेलो मी आता!"
तेवढ्यात तिचेही लक्ष त्याच्याकडे गेले. तिने पटकन नजर चुकवून मान फिरवली. मनात चरफडत "हे माकड आणि ऑफिस सोडून इथे काय करतंय?? आजच तडमडायचं होतं यालाही!"
दोघेही आपापल्या उबरमधून गंतव्य ठिकाणी पोचले.
उतरताना परत तेच!! "शी** सकाळी उठल्यावर कोणाचं तोंड पाहिलं होतं की या महामायेचं/ माकडाचं तोंड परत परत पहावे लागतेय" दोघेही परत मनात चरफडले.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. तिकडे बाल्कनीत बसून चहा पीत ती त्याच्या स्टॉपकडेच बघत होती.
त्याला मात्र वाटून गेले,"स्साला! सकाळ हवी तर अशी. नाहीतर इकडे, पंधरा मिनिटाच्या स्लॉटमधे पाणी भरा आणि पाच मिनिटात आंघोळ उरका. शांत बसून चहा प्यायचं स्वातंत्र्य नाही टाईमटेबलमधे. पगाराची ऊब इतकी महाग असावी?
बस आली आणि गेली.
आता रिकामा स्टॉप आणि रिकामी 'ती' दोघेच उरले.
पायपुसण्यावरचा प्राईस टॅग काढून तिकडे ती आत वळली तेव्हा नव्याने जाणवलं तिला तिने सोडून दिलेल्या 'पगाराचं मोल'.
" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
She was jamming to a song with her headphones on.
तिचा contagious उत्साह पाहून ...
Which song? - तो
जंबलाय - द कार्पेन्टर्स - ती
"द्या टाळी! मी सुद्धा फॅन." - तो
.
.
५० वर्षांनी -
मुला-नातवंडांच्या गराड्यात
ओळख
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं..
वेणीचा लांब शेपटा. केसात गजरा. कॉटनची कडक साडी. नक्की तीच!
नेहमी अशीच रहायची..
अजूनही तशीच दिसते.
“प्रसाऽऽद!”
तिने त्याच्या दिशेने पहात हात हलवला.
त्याचे डोळे भरून आले.. बारा वर्षांनंतरही तिने मला ओळखलं? आठ वर्षाचा होतो घरातून निघून गेलो तेव्हा..
तिच्यासोबत घालवलेला एक एक प्रसंग आठवून जीवाची घालमेल झाली.
वाटलं धावत तिच्याजवळ जावं आणि तिला घट्ट मिठी मारून सांगावं..
‘आई मी तुला..’
पाऊल पुढे पडलंही..
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
लाल रंगाची कांजीवरम त्यावर टेंपल जुलरीचा साज ल्यालेल्या तिच्यावरुन त्याची नजरच हटत नव्हती. लाल कांजीवरमने मनाचा ठाव घेतला होता.
"रमणीचा गृहप्रवेश लाल कांजीवरम नेसूनच व्हायला हवा. त्यासोबत हातभर लाल हिरव्या काचेच्या बांगड्याही हव्या."
त्याने एकवार डोळे मिटून घेतले.
रमणीचे रुप त्याच्या मिटल्या डोळ्यापुढे तरळले एखाद्या जुन्या स्वप्नासारखे.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
निघाल्यापासून धुसफुसतच होती . अजुनही रागाचा पारा तस्साच.
"मला नाही सांगीतली, अर्जुन, उद्धवाला सांगीतली."
"अर्रे! युगानुयुगापूर्वीचे काय्ये आता! बघ तर पृथ्वी कशी सजलीये आपल्या आगमनाकरता."
"हो!! सवत ना माझी. सजणारच."
"....!!"
.
.
"राम मंदिरात जयघोष चाललाय. चल लवकर दर्शन देउ."
"ऊं तुम्हीच जा. मी जाते तुळशीबागेत. एक तर चाणाक्ष गिर्हाईक माल उचलतं उशीर केला की गाळ उरतो. घासाघीस करायला लागते ते वेगळच. दोन तासानी इथेच."
.