अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत त्याच्या अंगावर काटा आला. बांधकाम झाल्यावर नव्या-नवरीगत सजलय घर! कधीही कोसळू शकेल अशा घराच्या जोताकडे बघितलं. वणव्याने राखरांगोळी झाली. बाजुच्या झाडाकडे सवयीने बघितलं तर ते वाढून चांगलं आभाळात पोहोचलं होतं. बिया पेरुन दोन दिवसही झाले नसतील.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
पुलाखालून वाहून गेलेले पाणी
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि क्षणभर थबकलाच. आज एकटा असतानाही तो ते घर 'बघू' शकत होता! इकडे बाबाबरोबर कितीतरी वेळा तो आलेला. फ्रेम केलेले असंख्य फोटो, लांबसडक जिने आणि एकाच फ्रेमवर घातलेली चादर! ती चादर घातल्याने त्या फोटोतल्या आज्जीला बाहेरचं जग खरंच दिसत नसेल? आणि बाजूच्या अंधार्या खोलीत काढलेला तो वंशवृक्ष. ते बाबाचं घर असुनही वंशवृक्षात बाबाचं नाव नाही हा पडलेला प्रश्न! शेजारी राहुनही ते अदृष्य घर फक्त बाबा असतानाच कसं दिसतं हे कोडं! बाबा गेल्यावर आता आईला आधार द्यायला हवा विचार करतोय तोवर आईची हाक ऐकू आली अल्बस-सेव्हरस!
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ......
" तुझ्या अंगावर हा मोठ्ठा डाग कसला " पैठणीची शंका.
" छकुली मुलुखाची धांदरफळी. भाजी सांडलीन्. म्हणून तर इथे यावं लागलं ना. आता धुलाई नक्कीच होणार.पण तू इथे कशी "नारायणपेठी उत्सुकता.
"सुरकुत्या जाऊन तरूण व्हायला. हीःहीः. ते बोटॉक्स का काय म्हणतात ना तसं काहीसं." पैठणी.
"काही का असेना, आपण कपाटातून बाहेर तर आलो या निमित्ताने.
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि सुस्कारा सोडला. लागोपाठ दोन बिर्हाडं सोडून गेली होती गेल्या वर्षभरात. भाडं बंद झालंच, पण त्या घरात लहान मुलांना धोका आहे अशी वदंता पसरायला लागली होती पंचक्रोशीत. गावातली माणसं एकूण अडाणीच! परसातल्या विहिरीपाशी खेळताना मुलं तोल जाऊन पडली, यात घराचा काय दोष? तरी पहिल्या अपघातानंतर फळ्या टाकून विहीर बंद केली होती. नाहीतरी आटलीच होती.
आई म्हणते रुक्मिणीच्या शापाने. पाण्यात पडून गेली ना ती!
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
.........
"हे हरीण अगदी तुझा पाठपुरावाच करतंय गं ताई. " मैत्रेयीचा कौतुकभरला स्वर.
" अगं त्याच्या आईचं नि माझं फार गूज असे. काय करणार! स्वामींकडून मिळणाऱ्या आत्मज्ञानाच्या ओढीने तू आश्रमात केवळ देहाने उपस्थित आणि स्वामी तर नेहमीच ज्ञानयज्ञात गुंतलेले.शिष्यांनी वेढलेले.. . मला बापडीला तुम्हा दोघांशी जे बोलावंसं वाटे ते हरिणीजवळ सांगायची मी.. "
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
*************************************************
त्या बाकावरची नजर न हलवता तिने दुसरीला इशारा केला. दोघेजण तिथे बसले होते. आजूबाजूच्या जगाला विसरून. एकमेकांच्या नजरेत नजर, हातात हात आणि ओठही जुळलेले.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय!
पुलाच्या कठड्यापाशी कोणीतरी उभे होते. कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले, नजर शून्यात! चेहरा दिसला तशा दोघी हादरल्या!
हा... मेला होता ना?! कॉलेजमधला मवाली! शीतलशी अतिप्रसंग करताना दिसला तेव्हा सलोनीने डोक्यात धोंडा घातला होता त्याच्या. दोघींनी कसेबसे पोत्यात घालून वजन बांधून इथूनच पाण्यात ढकलले होते. तो बेपत्ता झाल्याची चार दिवस चर्चा झाली, मग विसरून गेले होते लोक.
सलोनीमात्र...!