बालकविता

हत्तीदादा हत्तीदादा -

Submitted by विदेश on 12 March, 2011 - 04:24

हत्तीदादा हत्तीदादा
कसला आहार घेतो रे ?
अगडबंब शरीर बघून
शत्रू गार होतो रे !

ससेभाऊ ससेभाऊ
कुठला साबण वापरतो ?
शुभ्र रेशमी अंगाला
डाग एकही ना पडतो !

अस्वलकाका अस्वलकाका
कोणते तेल लावतो रे
केस नेहमी दाट काळे
गुपित काय सांग बरे ?

हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !

माकड माकड - हूप हूप
कुठली फळे खातो खूप ?
फांदीवरच्या कसरतीने
आम्हाला तू करतो चूप !

गुलमोहर: 

वार्‍याची फजिती

Submitted by पुरंदरे शशांक on 7 March, 2011 - 02:46

झाड मजेत उभे उन्हात
पाखरांसोबत गाणे गात

आला वारा इकडून तिकडून
सळसळ वाजली पानातून

वारा हळूच काढी खोडी
झाडासोबत झिम्माफुगडी

गरगर गरगर झाडा फिरवून
पाने दिली की भिरकावून

वार्‍याला वाटे मोठी मौज
सोबतीला घेई ढगांची फौज

पाहून वार्‍याची घुसळणकुस्ती
गरजले ढग - "बास ही दंगामस्ती"

ओरडूनही ऐकत नाही बेटा
पाठीत बसला वीजेचा रट्टा

वीजेचा रट्टा गारांचा मारा
वार्‍याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा

रडत रडत पळाला वारा
झाड म्हणाले "उतरला का तोरा ?"

गुलमोहर: 

का गं घातलास धपाटा ?

Submitted by माझिया गीतातुनी on 6 March, 2011 - 13:08

मला पण बाबा सारख
ऑफिस ऑफिस खेळायचय
रोज लवकर येतो सांगुन
रोज त्याला गंडवायचय

नको ना गं शाळेचा
तू सारखा पाढा वाचू
थांब थोडा वेळ
देना गाऊ खाऊ नाचू

दादाला कस्सं कधी कुण्णी नाई बोलत
नवीन मुली असतात त्याच्या अवती भवती डोलत

ताईचा तर अस्सा मला राग येतो आहे
"तो" देतो क्याड्बरी ...म्हणते मला आणली आहे

समजू नका मला लहान मी तर आहे मोठ्ठा
आईईईईग् आई आई !!!! का गं घातलास धपाटा ? का गं घातलास धपाटा ?

मयुरेश साने ....दि ०६-०३-11

गुलमोहर: 

एक छोटीशी मोठ्ठी कविता

Submitted by क्रांति on 6 March, 2011 - 08:05

का ग अशी अळीमिळी, काय झालंय ते सांग तरी!
"आत्ता माझा मूड नैये, सांगीन मी मग केव्हातरी!"

अग्गो बाई, हो का म्हणे? कुणीतरी भांडलं वाटतं!
खडीसाखरेचं हसू बागेमध्येच सांडलं वाटतं!
अशी कशी खेळ सोडून राणी एकटीच आली घरी?
"आत्ता माझा मूड नैये, सांगीन मी मग केव्हातरी!"

इवलासा नाकाचा शेंडा, राग मात्र एवढा मोठा
गालावरच्या फुग्यामधला खळीचा सागरगोटा!
काय तरी दिसतंय ध्यान, आरशात जरा पहा तरी!
"आत्ता माझा मूड नैये, पाहीन मी मग केव्हातरी!"

काय करू बाई आता, असला कसला हा फणकारा?
आज माझ्या चिमखडीचा मूड दिसतोय भलताच न्यारा!
टॊम, जेरी, नॊडी, हिला हसवा रे जरा कोणीतरी!

गुलमोहर: 

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

Submitted by सत्यजित on 3 March, 2011 - 12:05

आई बाबांचं घड्याळ झालंय
टीक टीक, टीक टीक, टीक टीक
क्षणा क्षणाला चालली असते
कीट कीट, कीट कीट, कीट कीट

वाजले सात, चालवा हात
वाजले आठ, गृहपाठ
सहाला उठून शाळेत जायचं
सातच्या आत घरात यायचं

वाजणार म्हणुन आईचा गजर
वाजले म्हणुन बाबांचा गजर
कशाला हवाय घड्याळाला गजर
गजरा आधी हेच हजर

घड्याळ तेवढं चालत असतं
घड्याळा शिवाय चालत नाही
वेळे आधी, वेळे नंतर
काही सुद्धा मिळंत नाही

चंद्रावरती देखिल मजला
दिसतात दोन काटे
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे

इतक्याच वाजता सुर्योदय
इतक्याच वाजता चंद्रोदय
मागे पुढे झालं तर
त्यांची देखिल नाही गय

जगणं म्हणजे सारखं

गुलमोहर: 

आईचा बर्थ डे

Submitted by पुरंदरे शशांक on 1 March, 2011 - 03:13

आईचा बर्थ डे

आईचा बड्डे आलाच की परवा
प्रेझेंटचे काय कुणीतरी ठरवा

साडी काय टॉप्स काय सारेच तिचे नावडते
ग्रीटिंग्ज - बांगड्यांना नाके मात्र मुरडते

फुलंच तिला आवडतात फार !
बुकेच आणूयात एक का चार !

केकचा तुकडा भरवताच तिला
डोळे का लागले तिचे वहायला

जवळ घेऊन म्हणते कशी मला
"मी का आता लहान आहे बाळा

कशाला प्रेझेंट, फुले नि केक
गोड पापी तुझी हीच मला भेट"

गुलमोहर: 

चांदोबाची गमाडी - गम्मत !

Submitted by पुरंदरे शशांक on 25 February, 2011 - 11:49

चांदोबाची गमाडी - गम्मत !

चांदोमामा गोलम गोल
गोल गोल ढोल मटोल

केला आईकडे हट्ट खूप
कमी झाले साखरतूप

साखरतूप कमी झाले
चांदोबा बिचारे रडू लागले

रडता रडता मुळुमुळु
चांदोबा वाळले हळुहळु

रुसुन चांदोबा दडून बसले
कोणालाही नाही दिसले

आईने पुन्हा देता खाऊ
चांदोबा हसून लागले डोकाउ

हसतात कसे ओठातून
चंद्रकोर दिसते उठून !

गुलमोहर: 

खारूताई, खारूताई !

Submitted by विदेश on 24 February, 2011 - 02:50

खारूताई, खारूताई!
पळापळीची कित्ती घाई !

झुपकेदार शेपटीची-
ऐट भारी हो तुमची !

बघुन टकमक इकडेतिकडे
तुरु तुरु पळता कुणीकडे ?

आज्जीची गोष्ट ऐकली आम्ही-
रामाला मदत केली तुम्ही !

इवलीशी ताई, काम खूप मोठ्ठे-
पाठीवर पाहू द्या ना रामाची बोटे !!

गुलमोहर: 

लटिके आसू......

Submitted by के अंजली on 22 February, 2011 - 04:20

वर्षाराणी मुग्ध बालिका
सृष्टीची ती गोडच कलिका..

छोटे ढगुले सखे सौंगडी
अन वादळवारे खेळगडी..

वीज असे ही मोठी ताई
दंगा करता फटके देई..

झरझर आसू डोळा झरता
सूर्य हासरा वाकून बघता..

इंद्राचे ते धनु कमानी
पाहून हासे वर्षाराणी..

रंगीत मोती असे उधळीता
वर्षाराणी रडे विसरता..

हसरी किरणें नभात भरती
लटिके आसू पानांवरती...!

गुलमोहर: 

चिमणुलिबाय, ओ चिमणुलिबाय

Submitted by एम.कर्णिक on 31 January, 2011 - 14:24

चिमणुलिबाय, ओ चिमणुलिबाय,
सायलीच्या वेलीवर करताय काय?

घरासाठि जागा शोधताय का?
अहो, बंटीची मदत मं घेताय का?

बंटीकडे घर आहे छप्परदार
चौकोनी भिंती नि गोलगोल दार

Ghar-1.jpg

चिंचेच्या झाडावर बांधलंय बघा
बघा नि सांगा, आवडलं का ?

बरं राहू द्या, मं ते वेलीवरलं घ्या
“भाड्याचं काय?” तुम्ही काय पण द्या

Ghar-2.jpg

काटक्याकुटक्यानी बांधलंय खरं
पण पानांच्या आडोशाला लपलंय बरं

कालच चिमणा एक गेला बघून
चिमणीला दाखवतो एवढंच म्हणून

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता