हातात वाफाळलेला चहा आणि डोक्यात धूसर विचार. घरातील खिडकीच्या ऐका कोपऱ्यात उभा राहून चहाचा एक एक घोट घेत पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या त्या चिमुकल्या मुलांना बघत असताना नकळतच त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य रेखाटले. कधी त्या मुलांना तो निरखत होता तर कधी आकाशाकडे बघत होता. जमिनीवर अचानक पडलेल्या गुळाला जश्या मुंग्यांनी घेरा घालावा तसं आकाशात ढगांनी दाटी केली. काही क्षणापूर्वी पांढरं शुभ्र वाटणारा आकाश आता काळकूट दिसू लागलं . खिडकीतूनच त्याची नजर बस स्टॊपवर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गेली. तिने बहुदा छत्री विसरली असावी.
झुंबर ढगांचे
झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात
सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद
थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात
दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी
उधळत खिदळत होतो
त्या नीलसागरात
सुवर्णमत्स्य संगतीने
पाण्याचे गीत गात
हातात हात माश्याच्या
पाण्यात सुरांची साथ
लव्हे डोलता किनारे
बिलगुनी आनंदात
पाण्याचे ऐकून गाणे
नभ व्याकुळतेने पुरता
बोलवित मजला तिकडे
लेऊन सफेद कुर्ता
मज कडेवरी घेऊनी
दिनकर मेघदूत झाला
निरोप देऊन सागरास
तो आभाळी आला
खूप खूप खेळुनी
मी नभाच्या समवेत
धुंद होऊन जावे
जिथे जिथे नभ नेत
खेळ खेळता खेळता
मळला तयाचा सदरा
हात फिरवूनी मायेने
घेतसे मजला उदरा
प्रेमळ कुशीत नभाच्या
होतो निजून शांत
ऐकून कोरडी हाक
मोडला ओला एकांत
पाहून हाक कोणाची
मन गलबलून आले
हिरव्यागार धरेचे
केवळ माळरान झाले
दरवाजावर कोणीतरी ठोठावलं अवेळी
फटीतून हळूच बघितलं मी कोण आलय लपून
थोडा ओलावा आलेला भेटायला सहजच
मी दरवाजा बंद करून घेतला हसून
एक थेंब तरी आलाच अन अनेक त्यामागुन!
थेंबात मी पाहिले, त्याचे अंग थरथरले
ओठावरचे हसू होते पण किंचित ताणलेले
कुठेतरी जायचे होते त्याला भेटायला
कोणीतरी असेल त्याची विचारपूस करायला
वेळेची वाट बघत होता तो इथेच गप्प बसून
पण एक थेंब आलाच अन अनेक त्यामागुन!
काय सांगू , चंद्र गाठायचा होता त्याला
प्रेमाचा स्वर्ग साधायचा होता त्याला
खुप खटपट पाहिली होती मी त्याची
कोंडलेल्या वेदनेला शांत करण्याची
संवेदना जिंकली अन बांध पडला तुटून