#कविता

पल्याड

Submitted by अभिषेक_ on 17 August, 2023 - 03:53

एक धुंद सकाळ
प्रकाशाने सजलेली
अंधार मागे सारता सारता
दवबिंदुंनी भिजलेली..

एक तप्त दुपार
उन्हामध्ये विरलेली
झाडाखालील सावलीच्या
शोधामध्ये सरलेली..

एक हळवी संध्याकाळ
अस्ताकडे झुकलेली,
अंधाराची सोबत करण्या
प्रकाशास मूकलेली..

एक अकेली रात्र
काळोख विणण्यात जूंपलेली,
उजेडाची वाट बघत
अंधारातच संपलेली..

एक सूखी माणूस
हसताना दिसलेला,
अन् एकांतात डोळ्यांचे
काठ पुसत बसलेला..

शब्दखुणा: 

आवाहन - ऑनलाईन कविसंमेलनासाठी

Submitted by अ. अ. जोशी on 7 August, 2023 - 02:58
तारीख/वेळ: 
8 August, 2023 - 02:51 to 14:29
ठिकाण/पत्ता: 
हा कार्यक्रम ऑनलाईन Google Meet वर असणार आहे. त्याबद्दल नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
पुण्याचे माजी चीफ ऑफिसर व लोकमान्य टिळकांनी गौरविलेले सामाजिक कार्यकर्ते कै आप्पासाहेब भागवत यांच्या १४१व्या जन्मदिनानिमित्त...

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

प्रतिबिंब

Submitted by अभिषेक_ on 28 July, 2023 - 12:20

डोळ्यात तुझिया दिसले आज
माझेच प्रतिबिंब मला,
परी न दिसला भवती एकही
प्रेमाचा तरंग मला..

प्रतिबिंब ही कसे म्हणावे?
हे तर केवळ रेखाटन!
आकृत्यांची रटाळ जुळवण
नाही कुठली रंगकला..

रेघाही सोडून संहती
झाल्यात पुसट जराश्या,
तुझ्या रंगांनी कधी श्रीमंत
वाटे आज भणंग मला..

बरं हार मानुनी; खंबीर मनाची
घ्यावी थोडी सोबत तर;
तोही बापुडा, आठवांत तुझ्या,
दिसे आज दंग मला!

शब्दखुणा: 

पाऊसधारा

Submitted by अभिषेक_ on 24 July, 2023 - 10:16

आभाळातून आल्या दोऱ्या
सरसर सरसर पाण्याच्या
अन् हलकेच लगेच उमटल्या
मनात ओळी गाण्याच्या

हितगूज करण्या सूर्याशी
ढग आड तयाच्या आले
आनंदाश्रू अन् या भेटीचे
पृथ्वीवर बरसून गेले

पानांचे घेत थांबे
थेंब ठिबकत खाली आले
मातीचीच ओढ मनात
मातीतच मिसळून गेले

थेंब टपोरे पडता खाली
सूक्या मातीतही जीव आला
अन् मृद्गंध जो दरवळला
ओढ पृथ्वीची लावी नभाला

वीज बेधुंद नाचे आभाळी
अन् झाडांची तिला साथ
हिरवळलेले डोंगर माथे
देती ढगांच्या हातात हात

शब्दखुणा: 

जशी वाट नेते..

Submitted by अभिषेक_ on 23 July, 2023 - 01:30

मना मानूनी कधी स्वच्छंद होतो
जना मानूनी कधी पाबंद होतो
परि अंती नशिबावरी सोपवूनी
जशी वाट नेते तसा जात राहतो..

मनासी न पटता कधी क्रुद्ध होतो
कधी मतलबी तर कधी शुद्ध होतो,
कधी वाटते द्यावे दुनियेस काही
कधी फक्त मिळण्याची का वाट पाहतो..

कधी लागते सहप्रवाशांची रांग
कधी जिंदगी देते विरहाची बांग,
किती आले गेले जरी जीवनात
तरी कुणी येण्याची का वाट पाहतो..

कधी चालता चालता थकतो फार
अन् मग येते डोळ्यांतूनी संथ धार,
कधी होते ओठावरी हास्य स्वार
कधी सून्न होउनी दूनियेस पाहतो..

शब्दखुणा: 

निर्विकार मी

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 15:01

अंधाराच्या आडूनही
धुंडत होतो प्रकाश मी,
मिट्ट झाले काहीदा पण
झालो नाही हताश मी!

प्रतिकुलतेच्या अरण्यातही
चालत होतो खुशाल मी,
नैराश्याची ठिणगी पडता
त्याची केली मशाल मी!

श्वापदांचे जत्थे भोवती
पण झालो नाही शिकार मी,
किंकाळ्यांनी गुंजले अंबर
पण मनातूनी निर्विकार मी!

तारांगणही विस्कटले जेव्हा
माझाच ठरवला ध्रुवतारा मी,
उत्तरेच्या शोधार्थ फिरवला
दक्षिणेचा वारा मी!

शब्दखुणा: 

हुंदके

Submitted by अभिषेक_ on 20 July, 2023 - 15:00

संवाद झाकलेले
हे शब्द मापलेले,
अन अंतरी मनाच्या
हे भाव गोठलेले

दडपून भावनांना
उरती सवाल अंती,
का बंद ही कवाडे?
उभ्या कशास भिंती?

अडवू शकेल गाणे
ऐसी ही भिंत नाही,
आलाप देण्या परंतु
कोणा ऊसंत नाही

चक्रात जीवनाच्या
अडकून श्वास मेले,
स्वर छेडिताच ओठी
का हुंदकेच आले?

शब्दखुणा: 

अधुरं प्रेम

Submitted by शब्दवेडा on 10 July, 2023 - 10:19

प्रेम नाही म्हणतेस मग गालात का हसतेस
जरा काही बोललं की रुसून का बसतेस
शब्द देतात नकार तुझे डोळे मात्र वेगळच बोलतात
सूर्याकडे पाहून जणू सूर्यफूल डुलतात
प्रेम नाही म्हणतेस मग लाडात का येतेस
लालचुटुक ओठांनी आमंत्रण का देतेस
कसं सांगू तुला किती प्रेम करतो मी
तुझ्या डोळ्यात पाहताच स्वतः ला विसरतो मी
दुःख जरी तुझं असलं डोळे मात्र माझे रडतात
तुला खुशीत पाहून माझे सुध्दा गाल हसतात
माझ्या इतकं प्रेम तुझा साजण तरी करतो का ग
तुझे आश्रु टिपण्यासाठी रुमाल तरी धरतो का ग
खूप झालं प्रेम आता दूर जायला हवं

एक कवी

Submitted by अक्षय समेळ on 29 June, 2022 - 09:46

नखशिकांत भिजतात पावसात वेदनांच्या
गुंफतात भाव-भावना मैफिलीत शब्दांच्या
एकांतात कुठे कुरवाळतात कवी दुःखाना
जाहीर प्रदर्शन मांडतात सभेत प्रेक्षकांच्या

वेळ त्यांचा संपूर्णपणे समर्पित एकांताच्या
चित्त त्यांचे सदा अधीन इंद्रधनू कल्पनेच्या
लेखणी वेगवान पळते पवनापरी जेधवा
मन घाली प्रदक्षिणा भ्रमरापरी वसुंधरेच्या

यत्न करुनी थकल्या मेनका नानापरीच्या
तरी न भंगते विश्वमित्रापरी कवींची तपस्या
निश्चल असते ध्येयाप्रती त्यांची मानसिकता
काय करणार तिथे अप्सरा स्वर्गलोकाच्या

© अक्षय समेळ

निशाणी

Submitted by गणक on 7 April, 2022 - 13:24

निशाणी

तुकडे करण्या आले तेव्हा पाणी झालो
गाडले तरी मी रत्नांच्या खाणी झालो

ती गळचेपी चालू होती स्वातंत्र्याची
मी पंचाहत्तरची आणीबाणी झालो

मीच महाराष्ट्राच्या कंठी कंठी वसतो
गोंड वऱ्हाडी मालवणी अहिराणी झालो

कर्मकांड करुनी धर्माचा श्वास कोंडला
खरा धर्म वदण्या संतांची वाणी झालो

संकटात शिकलेल्यांच्या हाती कॅमेरा
मदत तयांची करुनी आज अडाणी झालो

परंपरा अन् इतिहासाला जपण्यासाठी
सनवाराची , जात्यावरची गाणी झालो

अवघा भारत शिवरायांचा झाला जेव्हा
अटकेवरची भगवी एक निशाणी झालो

Pages

Subscribe to RSS - #कविता